पुणे : मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) एप्रिल आणि मे महिन्यात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवून हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या आणि अनवधानाने स्थानकात राहिलेल्या २३५ बालकांचा शोध घेत त्यांना पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवले.

मध्य रेल्वे विभागांतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली ही स्थानके असून, या स्थानकांवर नेहमीच गर्दी असते. या रेल्वे स्थानकांवर काही बालके भांडण किंवा रागावल्यामुळे घर सोडतात. तसेच ग्रामीण भागातील काही मुले ही शहराच्या आकर्षणापोटी घर सोडून शहरात येतात. अशा बालकांसाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबविण्यात आली. मध्ये रेल्वे विभागातील ‘आरपीएफ’ आणि ‘जीआरपी‘ विभागाने या मोहिमेंतर्गत चाइल्डलाइन या स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एप्रिल महिन्यात ११४ आणि मे महिन्यात १२१ अशी एकूण २३५ बालकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले.

या माहिमेत भुसावळ आणि नागपूर रेल्वे स्थानक परिसरात प्रत्येकी ६२ बालके आढळून आली. मुंबई आणि पुणे रेल्वे स्थानकावर अनुक्रमे ५३ आणि ५१ बालके आढळली. सोलापूर रेल्वे स्थानकावर आठ बालके सापडली. या बालकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यात आले असल्याचे मध्य रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी या कालावधीत १४९ बालके आढळून आली होती.

पालकांच्या स्वाधीन केलेल्या बालकांची संख्या

विभाग – वर्ष २०२४ – वर्ष २०२५
मुंबई – ५२ – ५३

भुसावळ – ४५ – ६२
नागपूर – ३६ – ६१

पुणे – १० – ५१
सोलापूर – ६ – ८

एकूण – १४९ – २३५

बारा प्रवाशांना वाचविण्यात यश

प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे रेल्वे स्थानकावर घडणाऱ्या अपघातांमध्ये ‘ऑपरेशन जीवनरक्षक’अंतर्गत ‘आरपीएफ’ जवानांनी १२ प्रवाशांचा प्राण वाचवला. त्यांपैकी तीन महिला आहेत. मागील वर्षी याच कालावधीत सात जणांचा प्राण वाचविण्यात यश आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे स्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये प्रवास करताना आढळून आलेल्या बालकांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ‘आरपीएफ’ आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष शोधमोहीम राबविण्यात येते. घाबरलेल्या अवस्थेत किंवा एकट्या आढळून आलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांची ‘चाइल्ड वेलफेअर’ समितीसमोर चौकशी करण्यात येते. चौकशीदरम्यान पळून आल्याचे आढळून आल्यास बालकांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात देण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, पुणे, कोल्हापूर, मिरज रेल्वे स्थानकातून मेअखेरपर्यंत १६० बालके सापडली आहेत. – प्रियंका शर्मा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग