पावलस मुगुटम

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्याच महिन्यात राज्यात पावसाच्या असमान वितरणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कुठे सरासरीपेक्षा कमी, तर काही ठिकाणी सरासरीच्या दुपटीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मुंबई, ठाणे आणि सातारा परिसरात जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून, नाशिक, नगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, अकोला आदी जिल्हे पावसाची सरासरीही पूर्ण करू शकलेले नाहीत. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग रडतखडत पावसाची सरासरी पूर्ण करू शकले आहेत.

राज्यात यंदा मोसमी पावसाने वेगाने प्रगती केली. ५ जूनला कोकणातून दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांतच त्याने राज्य व्यापले. राज्यात १ जूनपासून सप्टेंबरच्या अखेपर्यंत पावसाचा हंगाम समजला जातो. राज्याच्या अनेक भागांत यंदा पूर्वमोसमी पाऊस झाला. मोसमी वारे सक्रिय झाल्यानंतर अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळाच्या परिणामासह कमी दाबाचे पट्टे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यात बहुतांश भागात पाऊस झाला.

जूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात पावसाचा जोर अधिक होता. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आणि प्रामुख्याने घाटक्षेत्राजवळील विभागांत अतिवृष्टीचीही नोंद झाली. त्यामुळे एकूण राज्यात सरासरीपेक्षा अधिक ४० टक्के पाऊस झाला असल्याचे दिसत असले, तरी पावसाचे वितरण मात्र असमान झाले असल्याने काही भाग अद्यापही कोरडे आहेत. तेथे पाणीसाठा आणि खरिपाच्या पेरण्या आणि पिकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागातील नोंदींनुसार कोकण विभागात जूनमध्ये सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांनी महिन्यातच १००० मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबई उपनगरांमध्ये सरासरीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे ११३ टक्के पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिकपासून सोलापूपर्यंतच्या पट्टय़ात पावसाचे असमान वितरण दिसून येते आहे.