सुधीर जन्नू

बारामती : ‘ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी बारामती तालुक्यात आगमन झाले. तालुक्यात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही. मात्र यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. दोन वर्षांच्या खंडाने पालखी बारामती तालुक्यात येत असल्याने पालखी मार्गावर स्वागतासाठी स्वागत कमानी, रांगोळी, पताका, फलक लावण्यात आले. तहसीलदार विजय पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी मार्गावर तालुक्यातील सामाजिक संघटना, संस्था, स्थानिक मंडळांनी वारकऱ्यांसाठी चहा, न्याहरी, जेवण आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली. टाळ, मृदंग आणि ग्यानबा तुकारामच्या घोषात पालखी मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी भक्तिभावाने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. सोमवारी उंडवडी गवळ्याची येथे पालखीने मुक्काम केला. यंदा अजून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना बळीराजा विठ्ठलाकडे करत आहे. पालखी मंगळवारी बारामतीकडे मार्गस्थ होईल. बारामती नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगण येथे पालखी मुक्कामी राहील. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी गणेश भाजी मंडई येथे वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दीत चोरी किंवा किमती वस्तू गहाळ होऊ नयेत, यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.