scorecardresearch

गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा अभियान; स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पिंपरी पालिकेचे पुढचे पाऊल

महिला बचत गट व नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जाणार

गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा अभियान; स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पिंपरी पालिकेचे पुढचे पाऊल
पिंपरी पालिकेची २६ विसर्जन घाटांवर पथके ; आजपासून रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथके तैनात

उघड्यावर पडणारा कचरा, कचऱ्याभोवती पसरलेली दुर्गंधी, भटकी जनावरे असे नेहमीचे चित्र बदलण्याचा निर्धार पिंपरी पालिकेच्या ‘स्वच्छाग्रह’ मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक अधिकाऱ्याने नवकल्पना मांडून शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरीत नेहरूनगर लगत गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा अभियान राबवण्यात येणार आहे.

शून्य कचरा म्हणजे ज्या परिसरात कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी अथवा परिसरामध्ये त्याची विल्हेवाट लावणे होय. यासाठी गवळीमाथा झोपडपट्टीची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली. अशा प्रकारचा प्रयोग पालिकेने प्रथमच केला आहे. महिला बचत गट व नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जाणार आहे.

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोगही सुरू करण्यात येणार –

सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी क क्षेत्रीय कार्यालयांचे हद्दीत शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रम सुरू करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून नियोजन केले. शून्य कचरा मोहीम राबविण्याबरोबरच या झोपडपट्टीमधील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोगही सुरू करण्यात येणार आहे. झोपडपट्टीमधील ओला कचरा नेहरूनगर येथील गुलाब पुष्प उद्यानात आणला जाणार आहे व त्यातून खत निर्मिती करण्यासाठीची तयारी पालिकेने केल्याचे बोदडे यांनी सांगितले.

‘मिशन झीरो वेस्टेज’ राबवण्यात येणार –

‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२-२३ मध्ये पिंपरी पालिका सहभागी आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात झोपडपट्टीमधील कचऱ्याबाबत जनजागृती व्हावी, या दृष्टीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे, नागरिकांची खासगी संस्थेमार्फत कचरा अलगीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. सध्या या झोपडपट्टीमधील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ‘बीव्हीजी’ या संस्थेच्या वाहनांद्वारे मोशी कचरा डेपोत नेण्यात येतो. यात वाहतूक खर्चाबरोबरच वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे येथे ‘मिशन झीरो वेस्टेज’ राबवण्यात येणार आहे, असे बोदडे म्हणाले.

दरम्यान, येत्या काही दिवसांत बचत गटाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इतर झोपडपट्टी भागातही असा उपक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या