23 February 2020

News Flash

आकाशी झेप घेती पाखरे

पक्ष्यांची खासियत आहे त्यांचा उडाणटप्पूपणा. दिवसाकाठी आपल्या नित्यपरिचयाचे मना-राघू अगदी सहजी तीस-चाळीस किलोमीटरची भटकंती करतात, तर अल्बेट्रॉससारखे सागरपक्षी हजार-हजार किलोमीटरचे अंतर काटतात.

| October 24, 2014 03:01 am

गगनसंचारी पक्षी उपजतच
ध्रुव तारा तर ओळखतातच
पण उत्क्रान्तीच्या ओघात
त्यांच्या मेंदूत एक दिशादर्शक
होकायंत्र बसवले गेले आहे!

पक्ष्यांची खासियत आहे त्यांचा उडाणटप्पूपणा. दिवसाकाठी आपल्या नित्यपरिचयाचे मना-राघू अगदी सहजी तीस-चाळीस किलोमीटरची भटकंती करतात, तर अल्बेट्रॉससारखे सागरपक्षी हजार-हजार किलोमीटरचे अंतर काटतात. बार-हेडेड गॉडविट हा पाणटिवळ्याचा छोटेखानी भाईबंद अलास्कात पिल्ले वाढवून अकरा हजार किलोमीटरचे न्यूझीलंडपर्यंतचे अंतर ओळीने न थांबता काटतो. या सगळ्या उनाडगिरीसाठी अंगात भरपूर जोम पाहिजे, सळसळते गरम रक्त पाहिजे. जोशिल्या मोरीमाशांच्या, शार्काच्या अंगातही गरम रक्त खेळते; पण त्यांचे तापमान खाली-वर होत राहते. आजमितीस सतत एका तापमानाच्या गरम रक्ताचे प्राणी आहेत पक्षी आणि आपल्यासारखे सस्तन पशू. पक्षी आणि सस्तन पशू डायनोसॉरांबरोबर सायनॉप्सिड पूर्वजांपासून तीस-बत्तीस कोटी वर्षांपूर्वी उपजले, तेव्हा असा अंदाज आहे की, डायनोसॉरांचे रक्तही गरम होते. या गरम रक्ताचे जसे अंगातला जोश वाढवण्यात फायदे आहेत, तसेच तोटेही. हत्तींना नुसते जगण्यासाठी रोज पंधरा-पंधरा तास चरत राहावे लागते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा दख्खनच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने आणि पृथ्वीवर एक प्रचंड उल्का आदळल्याने सगळे जग दीर्घकाळ अंधारात बुडून गेले तेव्हा हे गरम रक्ताचे प्राणी अडचणीत आले. त्यातल्या डायनोसॉरांचा तर र्निवशच झाला; पण पक्षी, सस्तन पशू तगून राहिले. हजारो वर्षांची ही काळरात्र संपल्यावर पक्ष्यांचे, सस्तन पशूंचे फावले. आता त्यांचे आधीचे वरचढ स्पर्धक डायनोसॉर संपुष्टात आले होते, त्यांना नवनवे आहार-विहार उपलब्ध झाले होते. अशा वेगवेगळ्या आहार-विहारांशी मिळते-जुळते घेऊन पक्ष्यांचे, सस्तन पशूंचे वैविध्य फोफावले.
आपल्या जलद हालचालींचा फायदा उठवत पक्षी ज्यांच्यावर जगणे इतर मंद प्राण्यांना अशक्य आहे अशी विरळ, विखुरलेली, काही विशिष्ट ऋतूंतच उपलब्ध असलेली संसाधने वापरू शकतात. सागरसंचारी अल्बेट्रॉस मासे, िझगे, माणक्यांसारखे खूप विखुरलेले भक्ष्य शोधत िहडतो. यासाठी त्याला दिवसाकाठी हजार-हजार किलोमीटरची भटकंती करायला लागते. या साऱ्या उड्डाणासाठी तो वाऱ्याची शक्ती मोठय़ा sam07खुबीने वापरतो. वाळवंटात राहणारे घोडतित्तर किंवा सॅन्डग्राउज पक्षी गवताचे अगदी कोरडे बी खाऊन उदरनिर्वाह करतात. अर्थातच त्यांना सपाटून तहान लागते. वाळवंटात पाण्याचे अगदी मोजके साठे असतात. हजारो घोडतित्तर रोज सकाळ-संध्याकाळ साठ-साठ किलोमीटर दूरच्या पाणवठय़ांवर पोचतात आणि पुन्हा तेवढेच अंतर कापत अन्न, निवारा शोधायला लागतात. हवेत उडणाऱ्या कीटकांवर गुजराण करणाऱ्या आभोळ्या एकदा सकाळी पंख पसरले, की रात्री आपल्या निवाऱ्यावर परतल्यावरच मिटतात, तर रातवे अशाच पद्धतीने रात्री उडणाऱ्या किडय़ा-मकोडय़ांचा समाचार घेतात.
इतर पक्षिजाती ऋतुमानानुसार भटकत राहतात. बगळे, ढोकरी, चाटू, ढोक हे पाणपक्षी कुठल्या तळ्यात, ओढय़ात, नद्यात पाणी आहे हे धुंडाळत फिरतात. उलट पिवळ्या गाठीची टिटवी आणि धावीक पक्षी कोरडय़ा जागा शोधत िहडतात. डोंगरी धनेश, मोठा अबलख धनेश हे हॉर्नबिल जंगलात कुठे, कुठली फळे पिकली आहेत याच्या मागावर फिरतात. हिमालयातले कावळे, तांबट, तित्तर, चुम्बू हिवाळ्यात पायथ्याकडे उतरतात, तर उन्हाळ्यात डोंगरमाथ्याकडे कूच करतात.
पण खरी मोठी भटकंती करतात उन्हाळ्यात थंड प्रदेशात पिल्ले वाढवून हिवाळ्यात उष्ण कटिबंधात गुजराण करणारे पक्षी. पृथ्वीवर उत्तर गोलार्धात बरेच क्षेत्र जमिनीने व्यापलेले आहे, तर दक्षिण गोलार्धात पाण्याने. म्हणून हजारो पक्षिजाती आशिया, युरोप व उत्तर अमेरिका खंडांच्या उत्तरेकडच्या मुलुखांत किंवा हिमालयासारख्या उंचावरच्या थंड पर्वतराजीत मार्च-एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात कच्च्या-बच्च्यांचे लालन-पालन करतात आणि उरलेले महिने या खंडांच्या जास्त दक्षिणेकडच्या प्रदेशांत किंवा sam06आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडांत व्यतीत करतात. ध्रुव प्रदेशातली कुररी (आíक्टक टर्न – स्पेलिंग टीईआरएन) पक्षीण उत्तर गोलार्धातल्या उन्हाळ्यात अमेरिका, युरोप व आशिया या तीनही खंडांतल्या उत्तर ध्रुवाला लागून असलेल्या प्रदेशांत पिल्ले पोसते. इथे जसे शिशिराचे आगमन होते तशी ती वीस हजार किलोमीटर दूरच्या अन्टाíक्टक खंडाकडे प्रयाण करते; पण सरळ रेषेत नव्हे, तर वाऱ्यांचा फायदा घेत घेत ती तीस-चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करते. मग दक्षिण गोलार्धात तिथल्या उन्हाळ्यात सागरी प्राण्यांचा फडशा पाडून ही पुन्हा उत्तर ध्रुवाकडे झेप घेते. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा दर वर्षी लख्ख सूर्यप्रकाशात जास्त वेळ काढणारे हे पाखरू सरासरी वीस वर्षांच्या आयुष्यात पंचवीस लक्ष किलोमीटर भटकते.
आपल्या महाराष्ट्रातही असे अनेक हिवाळी पाहुणे मुक्कामी येतात. मी शाळेत असताना आमच्या बागेतल्या हिरवळीच्या ओलसर तुकडय़ावर एक करडय़ा डोक्याची धोबीण नेमाने हजर व्हायची. जवळ जवळ दोन महिने आमच्याकडे मुक्कामाला असायची अन् मग पसार व्हायची. ती एप्रिल ते ऑगस्टदरम्यान कुठे तरी स्वीडन ते सायबेरिया या युरोप – आशिया खंडांच्या उत्तर सीमेवरील प्रदेशात एखाद्या नदीकाठी बीळ खोदून त्यात आपल्या चिल्लापिल्लांना वाढवून थंडीचे दिवस आले की ऊब, अन्नाच्या शोधात भारताकडे झेप घेत होती. भारतात आपल्या पसंतीच्या ठरावीक ठिकाणी, ठरावीक दिवस काढून उन्हाळ्याच्या तोंडाशी पुन्हा उत्तरागमन करत होती. तिच्या पायात वाळे घातले नव्हते म्हणून खात्रीने सांगता येत नसले तरी निदान सात-आठ वष्रे तरी दर वर्षी तीच धोबीण आमच्या बागेत मुक्कामाला येत असावी. एकोणिसशे बासष्ट ते चौसष्टच्या दरम्यान केरळात पायात वाळा घातलेल्या अशा चार धोबिणी चार ते सोळा महिन्यांनंतर सुमारे चार हजार किलोमीटरच्या अंतरावर मध्य आशियातल्या कझाकस्तानात आणि किíगझिस्तानात सापडल्या होत्या.
या पक्ष्यांना एवढा लांबचा प्रवास कसा नेटकेपणे जमतो? त्यांना बरोबर दिशा कशी समजते? पुण्यातल्या एका घरातल्या हिरवळीवर नेमके कसे पोचता येते? पक्ष्यांची दृष्टी आपल्याहूनही तीव्र आहे. शिवाय त्यांना प्रकाशाच्या लहरींच्या कंपनपातळीची, पोलराइज्ड प्रकाशाची जाण असते. पोलराइज्ड प्रकाशातून सूर्य ढगांनी पूर्ण झाकला असला किंवा अस्ताला गेला असला, तरी त्याची दिशा समजू शकते. रात्री पक्षी उपजतच ध्रुव तारा ओळखतात आणि उत्तर दिशा ताडतात; पण कमाल म्हणजे पक्षी होकायंत्राच्या सुईप्रमाणे चुंबकीय क्षेत्र, त्याची दिशा, त्याची तीव्रता ओळखतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र वेळोवेळी दिशा पलटवते. जगभरच्या साऱ्या खडकांत ते जिथे जेव्हा बनले त्या वेळच्या चुंबकीय क्षेत्राची निशाणी असते. महाराष्ट्राचा काळा फत्तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून घडत असताना भारतीय भूखंड दक्षिण गोलार्धात होता. त्याचे चुंबकीय क्षेत्र व तीव्रता त्या वेळच्या परिस्थितीत ठरली, भारतातल्या दुसऱ्या फत्तरांहून वेगळी आहे. शिवाय हिच्यात स्थानिक खडकांच्या रचनेमुळे, रासायनिक घटनेमुळे सूक्ष्म फरक असतात. म्हणून जगभरच्या खडका-खडकांचे चुंबकीय क्षेत्र वेगवेगळे आहे. हे पारखत पारखत पक्षी हजारो किलोमीटर पार करून पुण्यातल्या हिरवळीसारख्या अगदी नेमक्या स्थळी नेटकेपणे पोचू शकतात. अशी आहे उत्क्रान्तीची अजब किमया!
*लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

First Published on October 24, 2014 3:01 am

Web Title: evolution of birds
टॅग Birds
Next Stories
1 चंचल अमुची धरणीमाता
2 चटकचांदण्या, विषकन्या आणि मायावती!
3 बुरसली अन् बहरली भूमी अशी!
Just Now!
X