News Flash

आंब्यांची पाक-कथा

पाकिस्तानातील ‘सुंदरी’ आणि ‘चौसा’ जातीचे आंबे त्या देशाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतातील उच्चपदस्थ नेत्यांना धाडले आहेत.

| September 6, 2014 02:57 am

पाकिस्तानातील ‘सुंदरी’ आणि ‘चौसा’ जातीचे आंबे त्या देशाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतातील उच्चपदस्थ नेत्यांना धाडले आहेत. हे आंब्यांचे राजकारण पाकिस्तानात फार.. तेथील जनरल झियांना आंब्याच्या एका पेटीने ठार केले, असा पाकिस्तान्यांचाच तर्क आहे आणि यावर एक कादंबरीही आधारित आहे.. त्यापुढे आता शरीफ यांची काय कथा?
आंबे ते आंबेच. पारखून घ्यावे लागतात म्हणा, पण फळ म्हणाल तर पारखलेले सगळे सारखेच. आणि आंब्यात कसले राजकारण करायचे? आंब्याच्या एकेका झाडापायी कोकणात कज्जेदलालीही झाली असेल, पण अखेर ते भावाभावांचे भांडण.. त्याला राजकारण नाही म्हणता यायचे. तरीही हे पाकिस्तानी लोक असे की, आंब्यांना राजकीय कटकारस्थानांमध्ये वाव देणारे कथानक रचून, एक कादंबरीच एका मूळच्या पाकिस्तानी लेखकाने इंग्रजीत लिहिली. तीही आज नव्हे, पाच वर्षांपूर्वीच. ‘द केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज’ – अर्थात, स्फोटक आंब्यांचे प्रकरण- असे तिचे नाव. पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया यांच्या काळात घडणारी ही कादंबरी आहे. तिची गोष्ट मोठी रंजक आणि रहस्यप्रधान. अली शिगरी हा पाकिस्तानी हवाई दलातील नवशिका कॅडेट तिचा कथनकार आणि एकप्रकारे नायकही, परंतु या नायकास बराच काळ तुरुंगात काढावा लागतो. त्या तुरुंगातील किस्से या कादंबरीत आहेतच.. उदाहरणार्थ, महिलांच्या विभागात दाखल झालेल्या एका नेत्रहीन बलात्कारितेलाच दोषी ठरवून तिला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा दिली जाते, वगैरे. परंतु कादंबरीचा मूळ विषय तो नव्हे. जनरल झिया यांचा अधिकृत विमानात झालेला कथित ‘अपघाती’ मृत्यू आणि त्यामागील रहस्य, हा या कादंबरीचा खरा विषय. याचा कादंबरीच्या नावाशी काय संबंध? आंब्यांशी जनरल झियांच्या मृत्यूचा काय संबंध? ती गोष्ट मोठय़ा कल्पकतेने आणि जादूई वास्तववाद या शैलीच्या लिखाणातून कादंबरीने मांडली आहे. पण इथे आपला विषय केवळ या कादंबरीपुरता नव्हे.. या कादंबरीची आठवण होण्याजोगी परिस्थिती उद्भवली आहे, तीही पाकिस्तानातूनच. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी स्वत:च्या डळमळीत खुर्चीची आणि त्या देशातील कथित लोकशाही मोडून काढण्यास सरसावलेल्या लष्करी शक्तींची पर्वा न करता शांततावादी राजकारणाचे प्रयोग सुरू ठेवले आहेत.. या प्रयोगांचा ताजा अंक म्हणजे शरीफ यांनी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अशा इन्यागिन्या उच्चपदस्थांकडे गुरुवारीच आंब्यांच्या पेटय़ा-करंडय़ा धाडून दिल्या आहेत. पाकिस्तानच्या या आंब्यांना कसला न्याय द्यायचा, हा सर्वस्वी भारताचा अंतर्गत आणि त्यातही आपल्या उच्चपदस्थ नेत्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु पाकिस्तानात आंबे कसे स्फोटक ठरू शकतात, याचे कादंबरीमय वर्णन करणाऱ्या मोहम्मद हनिफ यांनी केल्यानंतर पाच वर्षांनी वास्तवातही आंब्यांची राजनीती होते आहे, त्या निमित्ताने या कादंबरीबद्दल थोडे आणखी बोलले पाहिजे.
पाकिस्तानच्या सत्तालोलुप राज्यकर्त्यांवर, त्यांच्या निर्बुद्ध हुकूमशाही कारभारावर आणि त्यामुळे सामान्य माणसाचा जीव कसा स्वस्त होतो यावर टीकेचे कोरडे ओढण्यासाठी उपरोधिक विनोदाचा तसेच सूचक किंवा रूपकात्मक प्रतीकांचा वापर लेखक हनिफ यांनी केला आहे. त्यामुळेच, कथा झिया यांच्या विमानातील आंब्याच्या एका पेटीत स्फोटके असावीत, या तेव्हापासूनच गाजणाऱ्या तर्कावर आधारित असली तरी अनेक कल्पित पात्रे या कादंबरीत आहेत. म्हणजे ही गोष्ट सांगणारा अली शिगरी, ‘आत्महत्या’ अशी नोंद ज्यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल झाली आहे ते त्याचे वडील, नायकाचा बेपत्ता झालेला सहकारी कॅडेट ओबैद, पाच-सहा अमेरिकी अधिकारी आणि त्यांपैकी एक सीआयएचा अधिकारी.. ही सारी कल्पित पात्रे. इतकेच काय, आंबे खाण्याचे व्यसन असलेला एक कावळादेखील कादंबरीच्या अनेक प्रकरणांत मध्येच शिरतो, या कावळ्याच्या आम्रप्रेमाची आणि गरजेपेक्षा जास्त आंबे खाल्ल्यावर येणाऱ्या सुस्तीची अगदी साग्रसंगीत वर्णने लेखक करतो. पण कावळ्याला तिथेच सोडून लेखक वळतो खुद्द झियांकडे आणि त्यांच्या आंबेप्रेमाकडे. आंबे झियांना इतके प्रिय की, ‘पाक वन’ या आपल्या खास विमानात आंब्यांच्या पेटय़ाच्या पेटय़ा साठवून ठेवण्याचा त्यांना सोस. या पेटय़ा कालपरवा शरीफ यांनी भारताकडे धाडलेल्या पेटय़ांपेक्षा किती तरी जास्तच असणार.. कारण, कादंबरीतील कळीचे कथानक असे की, या आंब्यांच्या पेटय़ांपायी विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद पडू शकते, विषारी वायू साठून वैमानिक आणि खाशा स्वाऱ्यांसह साऱ्यांनाच बाधा होऊ शकते आणि त्यापायी विमानाचा जीवघेणा अपघात होऊ शकतो! याखेरीज याच कादंबरीत आंब्यांची उपकथानकेदेखील आहेत.. पाकिस्तानातील एक माओद्वेष्टा डावा नेता आंबे उत्पादकांची संघटना बांधतो. ती संघटना पाकिस्तानात वाढतेच, शिवाय भारत आणि मेक्सिको या देशांतील आंबे उत्पादकांशी मैत्रीपूर्ण सहकार्याचे करार करण्यापर्यंत ही संघटना मजल मारते. पुढे या मैत्रीपूर्ण करारांचे काहीच होत नाही हा भाग वेगळा, पण त्या करारांचा या नेत्याला कोण अभिमान. शिवाय, झियांना त्यांच्या त्या आंबेयुक्त विमानात खास निमंत्रितांसह आंबेपाटर्य़ा झोडण्याची हौस असते, त्यातही अमेरिकी अधिकाऱ्यांना अशा पाटर्य़ा देण्यात झियांना धन्यता वाटते. पाकिस्तानचा वापर एक लष्करी सोयीचा तळ म्हणून करणाऱ्या या अमेरिकी अधिकाऱ्यांना भारतीय उपखंडातील सांस्कृतिक नियम कसे अनिच्छेने पाळावे लागतात आणि अखेर आंब्यांमुळेच झियांच्या विमानाचा घात होणार असल्याची पक्की खबर हेरगिरीद्वारे मिळाल्यामुळे हे अमेरिकी अधिकारी आंबापार्टीतून कसे अंगच काढून घेतात, अशी कथानकाची वीण लेखकाने ठेवली आहे.
असो. ही कादंबरी काय किंवा एकंदरच
कथा-कादंबऱ्या आदी ललित साहित्य काय, राजकीय वास्तवाबद्दल लिहिताना कल्पिताच्या भराऱ्या मारण्याची मुभा तेथे असते. वास्तवात अशा भराऱ्या शक्य नाहीत, त्यामुळेच पाठवले आंबे की झाली मैत्री, अशी कल्पना आंबेधाडू नवाझ शरीफदेखील लढवणार नाहीत. तरीही प्राप्त परिस्थितीत आंबे पाठवण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली हेच फार झाले. पाकिस्तानच्या राजधानीत इम्रान खान आणि ताहिर उल काद्री यांच्या चिथावणीनंतर अराजकतावाद्यांनी आठवडाभर ठाण मांडले, अखेर लष्कराने ताबा घेतला म्हणून लष्करी मेहेरनजरेने इस्लामाबादेतील सरकारच्या तातडीच्या बैठका तरी होऊ शकल्या. आक्रस्ताळ्या आंदोलकांशी बोलण्याची घाई न करण्याचे फळ सरकारांना नेहमीच मिळत असते, तसे ते पाकिस्तानातही मिळू शकेल अशी परिस्थिती सध्या आहे. पण या आंदोलनाच्या काळात लष्कराची सत्तावासना जागी झाल्याचे दिसले, ती परिस्थिती आंदोलन शमले म्हणून पालटणार नाही. खुर्ची नाही मिळाली तरी, भारत-पाकिस्तान संबंधांवर आम्हीच वचक ठेवणार अशी वखवख पाकिस्तानच्या लष्करी आणि अनधिकृत बिनलष्करी फौजांना सुटल्याचे गेल्या तीन महिन्यांत तर जवळपास दररोज दिसू लागले आहे. यावर भारताने शरीफ यांनाही झिडकारण्याची भूमिका घेऊन, आमच्याशी वागण्याची ही पद्धत नव्हे असा संदेश दिला. या परिस्थितीतही भारताकडे आंबे धाडल्याने किमान प्रसारमाध्यमांचे तरी लक्ष दुसरीकडे वळेल, अशी चाल करणारे शरीफ हे गेलाबाजार कल्पकतेच्या बाबतीत ठीक म्हणावे लागतील.
परंतु शरीफ यांच्या पाकिस्तानामध्ये आंबे स्फोटक ठरू शकतात आणि राज्यकर्त्यांनाच या आंबेस्फोटाचा तडाखा बसू शकतो. निसर्गत: आंबा फुटतो, तो झाडावरच राहून पिकल्याने गळून मातीत मिळताना. लष्करशाही हे पाकिस्तानातील जुने खोड आहे. लोकशाहीचे आंबे अधूनमधून लागतात, पिकतात आणि फुटतात. तशा अप्रिय बातम्या शरीफ यांच्याबाबत येत्या दिवसांत वाचावयास मिळोत वा न मिळोत. आज पाकिस्तानी आंबे-पाठवणीच्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांना शरीफ यांची काय कथा होणार, हे पाहण्यात आणि सांगण्यात
अधिक रस आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:57 am

Web Title: nawaz sharifs aam diplomacy tries to sweeten ties with modi with crates of mangoes
टॅग : Nawaz Sharif
Next Stories
1 स्मृती, श्रुती, पुराणोक्त..
2 वीज म्हणाली कोळशाला..
3 विवेकाला सायोनारा
Just Now!
X