आपल्यासारख्या प्रापंचिक साधकाच्या जीवनात स्वामींचा खऱ्या अर्थानं प्रवेश व्हावा, यासाठी ही ओवी आहे! या प्रवेशाच्या आड काय येतं हो? तर आमचा कर्तेपणाचा भ्रामक भाव येतो आणि हा भाव नुसता सांगोवांगी नष्ट होणारा नाही. म्हणून नित्यपाठातली ही २५वी ओवी सांगते की, ‘‘स्वरूपाचा भाव टिकवून तुझ्याकडून जे जे कर्म घडेल त्यावर ते अवघं माझ्याच इच्छेनं झालं या भावनेची मोहोर उमटवून मलाच ते अर्पण कर.’’ आता यात ‘स्वरूपाचा भाव टिकवून’ म्हणजे काय, हे नंतर पाहू, प्रथम कर्माचा भाग पाहू. यात ‘तुझ्याकडून जे जे कर्म घडेल’ हा शब्दप्रयोग अगदी मार्मिक आहे. कर्म निपजेल म्हटलं आहे. कर्म आपण करीत नाही, ते आपसूक घडतं. आपण निमित्तमात्र असतो. माणूस मात्र कर्तेपणाच्या भावनेतून तसं मानत नाही. त्यातही गंमत अशी की चांगल्या कृतीचं श्रेय कर्तेपणानं तो लगेच घेऊ पाहतो. वाईट कृतीची जबाबदारी टाळू पाहतो. पाहा बरं! आपल्याकडून चूक झाली तर आपण म्हणतो, ‘माझ्याकडून असं कसं काय घडलं बुवा?’’ पण जरा चांगलं काही घडू द्या, आपण लगेच म्हणतो, ‘‘मी होतो म्हणून अमुक गोष्ट पार पाडलीच!’’ तर खरं पाहता आपलं जीवन कर्ममय आहे. अनंत प्रारब्धकर्मानी भरलेलं आहे. त्या कर्माचा प्रवाह वेगानं वाहत आहे. त्यातली आपल्या वाटय़ाला आलेली र्कम आपल्याकडून होत आहेत. कर्माच्या या वेगवान प्रवाहात आपण मात्र आत्मीयतेनं आणि कर्तेपणाच्या अहंकारानं असे काही गुंतलो आहोत की त्या कर्माची गती सुटत नाहीच, पण किंचित मंदावतदेखील नाही. र्कम इतक्या सहजपणानं मला चिकटली आहेत की ती सोडून देऊन निव्वळ उपासना करण्याचा विचारही मला करवणार नाही. सारं काही सोडून नाम घ्या, असं सांगितलं तर कोण ऐकायला उभा राहाणार आहे? त्यामुळे ही ओवी एक मानसशास्त्रीय रहस्य पोटात ठेवून बोध करीत आहे. खाणं-पिणं, येणं-जाणं, चालणं-बोलणं यांची ओढ संपत नाही. ते सारं सोडून जप कर, म्हटलं तर कोणी ऐकणार नाही. म्हणून समर्थही काय सांगतात? की, येता-जाता, खाता-पिता, चालता-बोलता नाम सोडू नये! त्या त्या कर्मामधील आसक्तीने गुंतण्याची गती केवळ याच उपायानं खुंटणार आहे. नामच हळुहळू माझी मर्यादेबाहेर चालण्या-बोलण्याची, खाण्या-पिण्याची, येण्या-जाण्याची ओढ नष्ट करणार आहे. अगदी त्याचप्रमाणे ही ओवी सांगते की, कर्म सुटत नाही ना, हरकत नाही. किमान कर्तेपणा सोड, फळाची आशा सोड आणि ती र्कम मलाच अर्पण करून टाक! आता हे करताना एक शिवधनुष्यही उचलायला मात्र सांगितलं आहे! ते म्हणजे, हे सारं कसं कर? तर ‘स्वरूपाचं भान टिकवून’! आता ज्याचं स्वरूपाचं भान सहज टिकतं त्याला खरं तर आणखी करण्यासारखं काय उरलं? त्याला कसली आली आहे उपासना आणि कसल्या बोधाची गरज आहे? तेव्हा स्वरूपाचं भान टिकत नाही, याचं भान आणण्यासाठी ही अट आहे! आता हे स्वरूपाचं भान म्हणजे आहे तरी काय? प्रपंच न सुटलेल्या माझ्यासारख्या साधकाला हे स्वरूपाचं भान जपणं इतकं सोपं तरी आहे का? मग त्यावर उपाय काय?