श्रीसद्गुरू हे ज्ञानाचं माहेर आहेत आणि त्या माहेरी शिरायचा मार्ग, त्यांच्या अंतरंगाचा उंबरठा म्हणजे सेवा आहे. त्यांच्या सेवेत राहणं, हेच मुख्य भजन आहे. या सेवेची ही थोरवी आणि ही सेवा नेमकी काय आहे, हे स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील दोन ओव्या सांगतात. या ओव्या, त्यांचा नित्यपाठातला क्रम, ज्ञानेश्वरीतला क्रम, प्रचलित अर्थ व विशेषार्थ विवरण आता पाहू. या ओव्या अशा:
जे ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंटा। तो स्वाधीन करी सुभटा। वोळगोनी।। ४८।। (ज्ञा. ४ /१६६) तरी तनुमनु जीवें। चरणासी लागावें। आणि अगर्वता करावें। दास्य सकळ।। ४९।। (ज्ञा. ४/१६७).
प्रचलितार्थ :  ते ज्ञानाचं घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, सेवा करून तो तू स्वाधीन करून घे (४८). एवढय़ाकरिता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावं आणि अभिमान सोडून त्यांची सेवा करावी (४९).
विशेषार्थ :  श्रीसद्गुरूंचं अंतरंग हे ज्ञानमय आहे. त्या अंतरंगात शिरण्याचा मार्ग सेवा हाच आहे. त्यासाठी तन-मन आणि जीव त्यांना समर्पित व्हावा आणि त्या सेवेत अहंकार तीळमात्र असू नये.
विशेषार्थ  विवरण:  श्रीसद्गुरू हे ज्ञानमयच आहेत. ‘केवलं ज्ञानमूर्तिम्’ असं त्यांचं एक विशेषण आहे. आत्मस्वरूपाचं हे ज्ञान आहे आणि त्यात द्वैताचं कस्पटही टिकू शकत नाही. तेव्हा त्या ज्ञानस्थितीत प्रवेश करायचा असेल, ती ज्ञानस्थिती साधायची असेल तर त्यांच्या आणि माझ्यात माझ्या बाजूनं कणमात्रही भेदबुद्धी न उरता ‘स: एव’  भावानं माझं जगणं व्यापणं हाच एकमेव मार्ग आहे. हा खरा सेवक! एकदा सद्गुरू म्हणाले की, ‘‘दास आणि सेवक यांच्यात अगदी सूक्ष्मसा भेद आहे आणि सेवक हा श्रेष्ठ आहे!’’ का? तर दास हा मालकाची प्रत्येक आज्ञा पार पाडतोच, पण सेवक हा आज्ञेचा उच्चार होण्याआधीच ती आज्ञा प्रत्यक्षात पार पाडतो! इतकं त्याला आंतरिक ऐक्य साधलं असतं. स्वामींनी ज्यांच्या निवासात आपलं अनंतत्व प्रकट केलं आणि आपल्या क्षीण प्रकृतीचं निमित्त करून ज्यांना उत्तुंग सेवेची संधी दिली, त्या पावसच्या देसाई कुटुंबीयांच्या सेवेचा आदर्श उलगडताना पं. महादेवशास्त्री जोशी म्हणतात की, ‘‘ सेवाधर्म: परमगहन: असं म्हणतात, पण तो गहन कसा, ते जाणून घ्यायला पावसला जायला हवं. सांगितलं ते बिनचूक करतो, तो सेवक खरा, पण मध्यम. न सांगता आत्मौपम्यबुद्धीनं इष्ट अन् आवश्यक ते करतो तो उत्तम सेवक होय. देसाई यांची उत्तमात गणना आहे.’’ (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ४३). स्वामींची सेवा हाच जणू ज्यांच्या जगण्याचा एकमेव हेतू होता त्या भाऊराव देसाईंना सौ. कमल जोशी यांनी फार चपखल उपमा वापरली आहे. ती म्हणजे, ‘‘स्वामींना जिवाप्राणापलीकडे जपणारे भाऊ म्हणजे स्वामींचा बहिश्वर प्राणच होते,’’ ही! खऱ्या सेवकाचं अंतरंग आणि त्याच्या जगण्याची पूर्ण समर्पित रीत ‘बहिश्वर प्राण’ या शब्दाइतक्या समर्थपणे दुसऱ्या शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही!