29 May 2020

News Flash

ना-लायकांचे निर्दालन

स्वत:चे रूपांतर जनरोषाच्या प्रतीकात करण्यात मोदींना यश आले आणि त्यांना जातीयवादी ठरवणारे विरोधक हे विकासाला खीळ घालताहेत हा मोदींचा कांगावाही लोकांनी आधी गुजरातमध्ये, मग देशभर

| May 17, 2014 01:19 am

स्वत:चे रूपांतर जनरोषाच्या प्रतीकात करण्यात मोदींना यश आले आणि त्यांना जातीयवादी ठरवणारे विरोधक हे विकासाला खीळ घालताहेत हा मोदींचा कांगावाही लोकांनी आधी गुजरातमध्ये, मग देशभर मान्य केला. पक्षांची वैचारिक गाठोडी वाहण्यात लोकांना रस नाही आणि काम करा नाही तर घरी जा, असे सांगणारे मतदार भारतात आहेत, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे.  
हे होणारच होते. सत्तासातत्यामुळे येणाऱ्या सुस्तीत मश्गूल राहून जनतेच्या आशा-आकांक्षांकडे पूर्णपणे कानाडोळा करणारी काँग्रेस आणि तिचे सुमार समर्थक यांच्यावरील संताप मतदारांनी या निवडणुकीत खणखणीतपणे व्यक्त केला असून जनरोषाचे हे रौद्ररूप अभूतपूर्वच म्हणावे लागेल. मतपेटीतील या उद्रेकाचे वर्णन केवळ काँग्रेसचा नेत्रदीपक पराभव वा नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा भव्य विजय इतक्याच मर्यादित परिघातून करणे अयोग्य ठरेल. याचे कारण हे की एखाद्या व्यक्तीस स्वत:चे रूपांतर जनरोषाच्या प्रतीकात करण्यात यश येत असेल तर त्या यशामागील कारणे केवळ राजकीय नसतात. त्यास आर्थिक आणि सामाजिक परिमाण असते. असे परिमाण मोदी यांनी स्वत:स मिळवून दिले होते आणि त्या अर्थाने ते एकमेव या निवडणुकीचे नायक ठरतात. मोदी यांचा हा विजय देशातील राजकारणास आतापर्यंत कधीही न मिळालेले वळण देणारा असून या विजयामुळे राजकीय समीकरणांची परिमाणेच पूर्णपणे बदलली जाणार आहेत. तशी ती बदलणे मोदी यांना शक्य झाले त्याची प्रमुख कारणे दोन.     
यातील एक व्यक्तिगत आहे तर दुसरे सामाजिक. व्यक्तिगत कारण म्हणजे आपण स्वत:, निदान मुख्यमंत्रिपदाच्या सुरुवातीच्या काळात तरी, व्यवस्थेकडून नाडल्या आणि नागवल्या जाणाऱ्यांतील एक आहोत, असे दाखवून देण्यात मोदी यशस्वी झाले. भारतीय मानसिकतेत कोणही ‘बिचारा’ ठरल्यास पुढील काळात तो मोठे यश मिळवतो. मोदी यांनी स्वत:चे रूपांतर अशा बिचाऱ्यांत करून घेतले होते. या विधानाचा संदर्भ अर्थातच आहे तो २००२ साली गोध्रा आणि त्यानंतर गुजरातेत जे काही झाले त्याच्याशी. जे झाले ते मानवतेला काळिमा फासणारे होते आणि कोणाही सुज्ञ व्यक्तीची मान त्यामुळे खालीच जाईल यात शंका नाही. गोध्रा आणि त्यानंतरच्या दंगलकांडात मोठय़ा प्रमाणावर अल्पसंख्याकांचे शिरकाण झाले आणि मोदी यांच्या कारकिर्दीवरील तो काळा डाग आहे, हे अमान्य करता येणार नाही. त्या दंगलींचा ठपका त्यानंतर सतत मोदी यांच्यावर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि राजकारणाच्या मर्यादित चौकटीत त्यात काही गैर होते असे म्हणता येणार नाही. परंतु नंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही मोदी यांना कायद्याच्या कचाटय़ात अडकवणे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विरोधकांना शक्य झाले नाही. तेव्हा मग देशातील कुडमुडे निधर्मीवादी पुढे सरसावले आणि आपल्या माध्यमी पांडित्याच्या आधारावर मोदी यांचे हात कसे रक्ताळलेले आहेत, हे सांगू लागले. येथपर्यंतही हे सर्व दुर्लक्ष करावे असे होते. परंतु पुढे या कुडमुडय़ा निधर्मीवाद्यांचा तोल सुटला आणि यांना मते देणारा प्रत्येक जण हिंदू आणि प्रत्येक हिंदू हा धर्माध असे ठरवण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ लागली. वादासाठी ते जरी खरे मानले तरी या विधानाचा व्यत्यास.. प्रत्येक अहिंदू हा निधर्मी.. हादेखील तितकाच खरा मानावा असा आग्रह या मंडळींकडून धरला जाऊ लागला. मोदी यांच्या ताकदीचा गुणाकार व्हायला प्रारंभ झाला तो तेव्हापासून. बरे, हे निधर्मीवादी प्रामाणिक आहेत, असे म्हणावे तर तेही नाही. १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांची हत्या होणे हे नैसर्गिक आहे असे निर्लज्जपणे म्हणून या कांडाचे प्रत्यक्ष समर्थन करणारे केवळ काँग्रेसी आहेत म्हणून निधर्मी, अशी ही सोयीस्कर मांडणी होती. या अशा सोयीस्कर संतांत ज्ञानपीठ मिळवणारे अनंतमूर्ती यांचादेखील समावेश होतो. काँग्रेस जे काही करते ते सर्व निधर्मी आणि काँग्रेसला विरोध करणारे सर्व जात्यंध आणि धर्माध इतकी निर्बुद्ध मांडणी या कुडमुडय़ा निधर्मीवाद्यांकडून केली जात होती आणि आपल्या माध्यमपांडित्याच्या आधारे ती सर्वाच्या गळी उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो आधी गुजरातने तीन वेळा अपयशी ठरवला. आज त्यावर राष्ट्रीय शिक्कामोर्तब झाले. हे मोदी यांना शक्य झाले कारण कुडमुडय़ा निधर्मीवाद्यांचा विरोध म्हणजे एका लोकहितैषी नेत्यावरील अन्याय असे रूप देण्यात त्यांना यश आले. ‘‘माझा प्रयास जनहिताचा आहे पण विरोधकांना मात्र मला जातीयवादी ठरवून त्यात खीळ घालण्यात रस आहे,’’ अशा स्वरूपाची कांगावखोर भूमिका मोदी यांनी घेतली आणि आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कामातून ती जनतेच्या गळी उतरवली. हे मोदी यांना सहजसाध्य झाले कारण त्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस वा अन्यांच्या जमा रकान्यात काहीही नोंद नव्हती म्हणून. म्हणजे मोदी हे धर्माध आहेत हे सिद्ध करताना विरोधकांना देशात अन्यत्र निधर्मीवादाचा एखादा सद्गुणी पुतळा दाखवता आला असता तर मोदी यांच्या मर्यादा अधोरेखित करता आल्या असत्या. परंतु आमच्याकडे काहीही सुयोग्य पर्याय नाही पण तरी तुमचा पर्याय मात्र अयोग्य असे विरोधकांचे म्हणणे होते. ते जनतेस अमान्य होते परंतु याची कोणतीही चाड कुडमुडय़ा निधर्मीवाद्यांना नव्हती. त्याचमुळे सत्ताधीश असूनही मोदी यांनी स्वत:चे रूपांतर यशस्वीपणे बळीमध्ये केले आणि त्याचे उत्तम भांडवल करून विरोधकांचा डाव उलटवला.
त्यात त्यांना यश सहज मिळाले कारण सत्ताधाऱ्यांची अकार्यक्षमता. हे मोदी यांच्या यशामागील दुसरे कारण. सत्तेची कवचकुंडले आपणास जणू जन्मजात मिळालेली असून आपण कितीही बेजबाबदार वर्तन केले तरी ती कोणी काढून घेऊ शकत नाहीत असे काँग्रेसजनांचे वर्तन होते. त्यातही विशेषत: दखल घ्यावी इतके बेमुर्वतखोर होते ते राहुल गांधी. बाराच्या भावात निघालेल्या गावच्या जमीनदाराच्या पोराने मिशीवर पालथी मूठ फिरवत गावात फुशारक्या माराव्यात असेच ते वागत होते. वास्तविक त्यांच्या कौटुंबिक सुभेदारीच्या रक्षणासाठी मनमोहन सिंग यांच्यासारखा इमानी आणि सालस पंतप्रधान असतानादेखील त्यांच्यावर डाफरायला राहुल गांधी यांनी कमी केले नाही. वास्तविक त्याच वेळी आपले सरदारत्व जागवत मनमोहन सिंग यांनी अरे बाळा तुझी औकात काय.. असे प्रत्युत्तर राहुलबाबास दिले असते तर ते कदाचित भानावर आले असते आणि आज जी काही वाताहत त्या पक्षाची झाली आहे, ती झाली नसती. बिहार असो वा उत्तर प्रदेश वा अन्य. या राहुलाने ज्यास हात घातला तेथे पक्षासाठी पराभवाची निश्चिती करून दिली. तरीही त्याचे डोके ताळय़ावर आले नाही आणि ते यावे म्हणून एरवी पंतोजीपणा करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी प्रयत्न केले नाहीत. स्वपक्षाच्या पंतप्रधानास हे असे असहाय करणे अखेर काँग्रेसच्या अंगाशी आले आणि आता स्वत:च्या गळय़ास नख लावून घ्यायची वेळ पक्षावर आली. राहुल गांधी यांना ताळय़ावर आणू न शकणारी मनमोहन सिंग यांची असहायता ए राजा, सुरेश कलमाडी यांनाही मोकळे रान देत गेली आणि त्यातील प्रत्येक गैरव्यवहारातून पक्षाच्या पराजयाचे एके क बीज पेरले जाऊ लागले. परंतु याची कोणतीही जाणीव पक्षनेतृत्वास नव्हती. त्यामुळे आर्थिक असो वा राजकीय. काँग्रेस सरकार प्रत्येक आघाडीवर अधिकाधिक आणि उत्तरोत्तर अपयशी ठरत गेले. आज अखेर ते गेलेच. होते तोपर्यंत या सरकारात अडीच व्यक्ती निर्णय घेत. पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि पावपाव सरकारी आणि विरोधक अशा भूमिका एकाच वेळी बजावणारे राहुल गांधी. शेवटची दोन वर्षे या अडीचांतून पंतप्रधान सिंग कमी झाले आणि हे सरकार दीड पायांवर चालणारे ठरले. त्या क्षणीच त्याचे पडणे अटळ होते. दरबारी राजकारणात मुरलेल्या काँग्रेसला जनतेकडून मायबाप असे म्हणवून घेण्याची सवय. सामान्य जनतेचे हे मायबाप सरकार बघता बघता मायलेकाचे सरकार बनले. तेव्हा अशा सरकारचा पराभव होणे ही काळाची गरज होती. प्रशासकीय पातळीवरचा धोरणलकवा अधिकाधिक गंभीर होत चाललेला आणि या सगळय़ाची सूत्रे हाती असलेले पंतप्रधान स्थितप्रज्ञावस्थेकडे निघालेले. अशा वेळी कोणत्याही पक्षाच्या भल्याबुऱ्यापेक्षा देशाच्या हितासाठी या मंडळींचा पराभव होणे गरजेचे होते. तेव्हा तो होणार ही काळय़ा दगडावरचीच रेघ होती. परंतु तो इतका खोल आणि गंभीर असेल असे मात्र विरोधकांना देखील वाटले नव्हते. पराभवाच्या या व्याप्तीवरून जनतेच्या उद्वेगाचा अंदाज यावा. भारतीय जनता पक्षाला फक्त उत्तर प्रदेशात जितक्या जागांवर विजय मिळालेला आहे तितकी काँग्रेसच्या देशभरातील विजयी उमेदवारांची संख्या आहे, यावरून या पराभवाचा घाव किती खोल आहे, ते कळावे. पराभव जेव्हा इतका दारुण असतो तेव्हा तो मूलभूत चुकांचा निदर्शक असतो. मग तो महाराष्ट्रातील दिग्गजांचा असो वा दिल्ली वा अन्यत्र केंद्रीय मंत्र्यांचा असो. सर्व निष्क्रिय, मुजोर आणि मस्तवालांना मतदारांनी सार्वत्रिकपणे घरी पाठवले. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास भाजपच्या या दिल्ली दिग्विजयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांची झाकलेली मूठ जशी उघडी पाडली आहे तशीच शिवसेनेच्या कळपातही धडकी भरवली आहे, यात शंका नाही. सेना नेत्यांच्या लपाछपीच्या राजकारणास यापुढे भाजप काडीचीही किंमत देणार नाही, असाच या विजयाचा अर्थ आहे.
आम आदमी पक्ष आणि तिसऱ्या आघाडीतील भुरटे यांचे पानिपत हेदेखील यामुळे महत्त्वाचे ठरते. माध्यमांनी फुगवलेला आपचा आचरट फुगा या निवडणुकीने निर्णायकरीत्या फोडला. हे बरे झाले. आपण म्हणजे कोणी हरिश्चंद्राचा अवतार आहोत, अशा थाटात वाहय़ात बडबड करीत हिंडणारे अरविंद केजरीवाल आणि त्यांची अन्य पिलावळ यांना रोखणे गरजेचे होते. ते काम मतदारांनी चोख केले. त्याचप्रमाणे मुलायम, लालू वा मायावती, जयललिता आणि ममता अशा अनेक गणंगांनाही मतदारांनी चांगलाच हिसका दाखवला. भारतीय लोकशाही प्रौढ होत असल्याचे हे लक्षण म्हणावयास हवे. या सर्व भुरटय़ा नेत्यांनी आपापली राज्ये म्हणजे खासगी जहागिऱ्या करून टाकल्या होत्या. या सर्वाच्या भडभुंजी राजकारणावर नाचायची वेळ मोदी यांच्यावर आता येणार नाही.     
बाकी या निवडणुकीचा सरळ अर्थ आहे तो काम करा अथवा घरी जा, हा. मतदारांना आता राजकीय पक्षांची वैचारिक गाठोडी वाहण्यात वा नेत्यांच्या कौटुंबिक त्यागाच्या कहाण्या वागवण्यात काडीचाही रस नाही. भारतीय लोकशाही वयात येत असेल तर तरुण मतदारांना रस आहे तो सकारात्मक काही घडण्यात. आपण ते घडवू असे मोदी यांचे अभिवचन होते आणि त्यांची गुजरातेतील कामगिरी त्या वचनाचा आधार होती. त्यामुळे मतदारांनी त्यांना एकहाती कारभार करण्याइतके मताधिक्य दिले. अकार्यक्षमतेस कोणतेही कारण यापुढे त्यांना देता येणार नाही, याचीच सोय मतदारांनी केली आहे. ना-लायकांचे निर्दालन हा या निकालाचा अर्थ आहे. तो ध्यानात ठेवतच मोदी यांना आपली पावले टाकावी लागतील.

ही सदरे नाहीत
निवडणूक निकालांनंतरच्या खास पानांमुळे आजच्या अंकात ‘बुकमार्क’ हे दर शनिवारचे पान, तसेच ट्विप्पणी, कुतूहल, मनमोराचा पिसारा, प्रबोधनपर्व ही सदरे नाहीत. दरररोजचे शब्दकोडे, सुडोकू, नेट-बिंब  आजच्या अंकात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 1:19 am

Web Title: the great defeat of inefficiency
Next Stories
1 गोल भोक.. चौकोनी खुंटी
2 करोगे याद तो..
3 रणांगण तेलांगण
Just Now!
X