जी व्यक्ती हयात नाही तिच्याशी झालेल्या संभाषणातील असा भाग आता उद्धृत करावा का इतकाच काय तो औचित्याचा प्रश्न. तथापि त्याच्या वर्णनात शौरी न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरत नाहीत, हा मोठाच दिलासा..

गिरीश कुबेर

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
mahayuti, mumbai, mahayuti mumbai lok sabha marathi news
मुंबईतील तीन मतदारसंघांतील तिढ्याने उमेदवारांचा शोध सुरू
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

नरसिंह राव यांचा एक प्रसंग आठवतो. ‘द इनसायडर’ प्रकाशित झाल्यानंतरचा. मुंबईत ते काही पत्रकारांना अनौपचारिक गप्पांत भेटत. त्यात एकदा त्यांच्या राजकीय जीवनातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत विचारले असता त्यांनी हसत हसत आपल्या पोटाकडे बोट दाखवले आणि म्हणाले, ‘हे सर्व इथे आहे आणि ते माझ्याबरोबरच जळून जाणार.’ त्याआधी गोव्यात असताना गोविंदराव तळवलकर कामानिमित्त अनेकदा तेथे येत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी गप्पा होत. (मीरामार किनाऱ्यावरच्या एका अशा उत्तररात्र सत्रात तेव्हाचा सहकारी संजीव साबडेही सहभागी होता.) इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नाडिस, देवकांत बरुआ, राजीव गांधी, सोनिया गांधी, शरद पवार आदी अनेकांशी त्यांचा उत्तम स्नेह होता आणि अनेकांशी प्रत्यक्ष भेटीगाठीही होत. त्याचे अनेक अत्यंत महत्त्वाचे संदर्भ त्यांच्याकडून कळत. त्यातील काही तर सत्तांतर, खांदेपालट यांच्याशी निगडित होते. हे लिहीत का नाही, असे विचारल्यावर गोविंदरावांचे उत्तर असे: ‘‘हे सर्व खासगी संभाषण आहे. ते उघड करणे योग्य नाही. आणि ते करायचे म्हटले तर त्यात माझी बाजू येईल. पण त्यास समोरच्याचीही बाजू आहे. तीकडे दुर्लक्ष होईल. हे अयोग्य. संपादकांशी अनेक जण अनेक मुद्दय़ांवर विश्वासाने बोलतात. त्या विश्वासास तडा जाईल असे वागू नये.’’ ही ब्रिटिश व्यावसायिकता. ते ती पाळत.

अरुण शौरी यांचे ताजे ‘द कमिशनर फॉर लॉस्ट कॉजेस’ हे आत्मकथनात्मक पुस्तक वाचताना वरील दोन प्रसंग राहून राहून आठवले. सध्याच्या पत्रकारितेत शौरी यांचे स्थान निर्विवाद सर्वोच्च आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू शेरोशायरी, जागतिक तसेच देशी इतिहास, अर्थव्यवहार आदी अनेक विषयांवर त्यांच्याइतकी अधिकारी व्यक्ती नाही. बोलण्याची त्यांची मृदू शैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वास एक सोनेरी मुलामा देते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद ही एक शिकवणी असते. त्यात त्यांची एकवाक्यी सूत्रे. (‘‘आजचा भाजप म्हणजे काँग्रेस अधिक गाय’’, ‘‘एखाद्याचा इतकाही द्वेष करू नये; नंतरचा पर्याय आधीपेक्षा वाईट निघाल्यास मुकाट सहन करावे लागते’’ इत्यादी) शौरी यांनी आणीबाणीपासूनच्या भारतीय राजकारणाचा काळ सक्रियपणे अनुभवला. त्या काळास आकार देण्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पत्रकारितेचा मोठा वाटा आहे. या पत्रकारितेचे सुकाणू रामनाथ गोएंका- आरएनजी –  यांच्या हाती असे. शौरी यांना पत्रकारितेत आरएनजी यांनीच आणले. त्याआधी शौरी यांचा माध्यमांशी तसा काहीच संबंध नव्हता. पण पत्रकारितेत आल्यानंतर मात्र शौरी यांनी आपली मांड घट्ट केली आणि या व्यवसायासही नवीन आयाम दिले. शोधपत्रकारिता ही आता अगदी गल्लीबोळाच्या पातळीवर आली असली तरी शौरी आणि एक्स्प्रेस यांनी ती रुजवली.

त्यातूनच भागलपूर अंधकांड, देशभरातील तुरुंगातल्या कैद्यांची परिस्थिती, त्यासाठी अश्विन सरीन या पत्रकाराचे स्वत:स तुरुंगवास घडवणे, त्यानेच पुढे केलेली ‘कमला’ची खरेदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ उद्योग, त्यातून निर्माण झालेला न्या. लेंटिन आयोग अशी भारतीय पत्रकारितेस अभिमानास्पद अशी एकापेक्षा एक उत्तमोत्तम उदाहरणे घडून आली. या सगळय़ात शौरी यांचा मोठा वाटा होता. मुळात बातमीच्या पलीकडे जाण्याची त्यांची वृत्ती, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आणि बहुसंख्य ‘बातमीदारां’ना न दिसणारा व्यापक पट पाहण्याची क्षमता अंगी असल्याने शौरी यांनी बातमीदारीस काहीएक शिस्त दिली. या पुस्तकात यातील प्रत्येक प्रकरणाचा विस्तृत इतिहास शौरी यांच्या अप्रतिम शैलीत वाचायला मिळतो. आजच्या पन्नाशी-उत्तर पिढीच्या समाजकारणाच्या आकलनाची सुरुवातच मुळी आणीबाणीपासून होते. त्यानंतर ही सर्व देश हादरवून  टाकणारी पत्रकारिता आकारास आली. शौरी तिचे क्रियाशील सदस्य. त्यांच्या गोष्ट सांगण्याच्या हातोटीने हा सर्व काळ ते जिवंतपणे उभा करतात. ज्यांना तो माहीत आहे त्यांना त्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो आणि ज्यांस ठाऊक नाही त्यांना तो समजून घेता येईल. यातील काही प्रसंगाच्या वर्णनात ४०-४५ वर्षांपूर्वीचे संभाषण ते उद्धृत करतात, त्यातील अपशब्दांसह. त्या वेळी मात्र आश्चर्य वाटते. शौरी यांच्या स्मरणशक्तीविषयी शंकाच नाही. इतके सूक्ष्मातिसूक्ष्म त्यांना स्मरतही असेल. पण जी व्यक्ती हयात नाही तिच्याशी झालेल्या संभाषणातील असा भाग आता उद्धृत करावा का इतकाच काय तो औचित्याचा प्रश्न.

तथापि त्याच्या वर्णनात शौरी न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरत नाहीत, हा मोठाच दिलासा. ‘जसे घडले तसे सांगितले’ अशा पद्धतीनेच शौरी ही रसीली कहाणी वाचकासमोर तपशीलवारपणे उलगडत जातात. यातील अंतुले यांच्या गच्छंतीच्या प्रकरणाची कथा मराठी जनांस जवळची वाटेल. पुस्तकात दोन-अडीच प्रकरणांतून ती समोर येते. त्यांच्या या सक्रिय बातमीदारीमुळे अंतुले यांस राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काही प्रसंगांनी उभयतांस एकमेकांच्या समोर आणले. पण तरीही अंतुले यांच्या वागण्यात कोणताही कडवटपणा नव्हता. केंद्रात मंत्री झाल्यावर अंतुले यांनी एकदा शौरी यांना भोजनास बोलावण्यासाठी घरी फोन केला. ते नव्हते. फोन त्यांच्या पत्नीने घेतला. त्या वेळी ‘‘भाभी आप भी जरूर आना’’ असे आग्रहाचे निमंत्रण अंतुले यांनी केले. हे वाचताना त्याची आजच्या राजकारण्यांशी तुलना होणे अपरिहार्यच. टीकाकार हा शत्रू असे मानणाऱ्या आजच्या अनेक राजकारण्यांनी हे वाचायला हवे. असो.

शौरी यांच्या पत्रकारितेचे वैशिष्टय़ म्हणजे एकाच वेळी त्यांच्यात एक सजग बातमीदार आणि य. दि. फडकेसदृश इतिहासकार सदैव जागे असतात. दोघेही एकाच वेळी कामात मग्न असतात. त्यामुळे त्यांच्यातला बातमीदार उद्याचा मजकूर देत असताना फडके-सदृश इतिहासकार लगेच त्याचे ऐतिहासिक तपशील धुंडाळतो, आवश्यक तेथे अवतरणे देतो आणि तसे करताना बातमीस कालातीत वेष्टनात गुंडाळतो. शौरी यांची ही पत्रकारिता शैली त्या वेळी स्वीकारणे प्रस्थापितांस जड गेले. त्यात प्रमुख म्हणजे शौरी यांचे संपादक एस. निहाल सिंग आणि बी. जी. व्हर्गिस. शौरी हे कार्यकारी संपादक होते तर सिंग आणि नंतर व्हर्गिस हे मुख्य संपादक. त्यांचे आणि शौरी यांचे संबंध तितके हृद्य नव्हते. त्याबाबतचे शौरी यांचे वर्णन उदार म्हणता न येणारे आहे. सिंग यांनी आपल्या बातमीदारीत कसा खोडा घालायचा प्रयत्न केला त्याचे अनेक दाखले शौरी पुस्तकात देतात. सिंग आता हयात नाहीत. आणि आरएनजीही नाहीत. त्यामुळे याची सत्यासत्यता करता येणे अशक्यच. टाइम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन संपादक गिरीलाल जैन यांच्या मतभेदांचाही दाखला शौरी देतात. ते वाचताना तत्कालीन ‘सुपर रिन’च्या जाहिरातीतील कुडत्यांच्या स्वच्छतेची तुलना करणारे आठवतात.

दुसरे असे की शौरी हे क्रियाशील पत्रकार. म्हणजे पत्रकाराची व्यवसाय चौकट त्यांस मान्य नव्हती. असे झाले की पत्रकार मंडळी आपल्या वृत्तविषयाच्या पाठपुराव्यासाठी रस्त्यावर उतरतात आणि चळवळे बनतात. तेथे पत्रकारिता संपते आणि राजकारण सुरू होते. पत्रकारितेच्या व्यावसायिक नीतिनियमांचा येथे भंग होतो असे प्रस्तुत लेखकाचे मत. पत्रकारितेची दोन घराणी आहेत.  प्रसंगी क्रियावंत होणाऱ्यांचे एक आणि आपल्या स्तंभाची मर्यादा पाळणाऱ्यांचे दुसरे. शौरी कोणत्या घराण्याचे हे सांगण्याची गरज नाही. या घराण्यातील पत्रकारांस स्वत:कडे नायकत्व घेण्याचा आणि इतरांच्या गळय़ात खलनायकाचा बिल्ला अडकवण्याचा मोह आवरत नाही. शौरी यांनी तो बहुतांशी आवरला असला तरी संपूर्ण पुस्तकभर त्यांना हे साध्य झाले आहे असे म्हणता येणार नाही.

पत्रकार हा इतिहास घडतानाचा जिवंत साक्षीदार असतो हे खरेच. पण तरीही त्यास जे दिसते ते एकाच कोनातील असते. त्यास अंतिम सत्य मानायचे नसते. कारण अंतिम सत्य असे काहीच नसते. अनेक सत्ये असतात आणि ती सर्व तितकीच खरी असतात. त्यातील काही सत्यांची एका ज्येष्ठ संपादकाने आणि उत्कृष्ट लेखकाने केलेली ही मांडणी अत्यंत वाचनीय आहे हे निर्विवाद.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber