विरंगुळ्याच्या कोणत्या क्षणी विडी तयार झाली असेल काय माहीत? आता विडी मागे पडली. तिची जागा सिगारेटने घेतली. धूम्रपान शरीराला घातक असल्याचा इशारा आता सिगारेटच्या पाकीटभर वाढला. तो धूम्रपान कमी करण्याच्या धोरणाचा एक भाग. विडीचा कट्टा रोडावत गेला. आता ई सिगारेट आली आहे. धूम्रपान आणि त्याचा ‘आनंद’ देणारे हात मात्र अनेक वर्षे पिचलेलेच आहेत. पण त्यांच्यातील जगण्याची ऊर्मी मात्र कमी झालेली नाही. ‘अॅस्पिरेशनल इंडिया’ चे जग वेगळेच आहे. त्यात ऊर्मी आहे आणि शोषणही…

विरंगुळ्याच्या कोणत्या क्षणी विडी तयार झाली असेल काय माहीत? आता विडी मागे पडली. तिची जागा सिगारेटने घेतली. धूम्रपान शरीराला घातक असल्याचा इशारा आता सिगारेटच्या पाकीटभर वाढला. तो धूम्रपान कमी करण्याच्या धोरणाचा एक भाग. विडीचा कट्टा रोडावत गेला. आता ई सिगारेट आली आहे. धूम्रपान आणि त्याचा ‘आनंद’ देणारे हात मात्र अनेक वर्षे पिचलेलेच आहेत. पण त्यांच्यातील जगण्याची ऊर्मी मात्र कमी झालेली नाही. ‘अॅस्पिरेशनल इंडिया’ चे जग वेगळेच आहे. त्यात ऊर्मी आहे आणि शोषणही…

सोलापूरच्या विनायकनगरमध्ये बहुतांशी घरे पत्र्यांची. म्हणजे चोहीबाजूने पत्राच. तशी ही घरे उभी. एक मोठी खोली आणि त्यावर पोटमाळा. वर जाण्यासाठी एक लोखंडी शिडी, ती खड्या पायऱ्यांची. वरच्या बाजूला दुसरी खोली. तसा या शहराचा स्वभावही तापटच, उन्हाप्रमाणे. आवाजातील उंच स्वर कानडी आणि तेलगू भाषेतून आलेला. अशा उंच पत्र्याच्या घरात चार-पाच जर्मनचे डबे. त्याच्या बाजूला एका रॅकमध्ये काही स्टीलचे डबे. सात दिवसांनी पाणी येत असल्याने भरून ठेवलेले पाण्याचे पिंप, शेजारी प्लास्टिकच्या घागरी. घरगुती वापराचा गॅस. असा सारा संसार. या भागातील महिलांच्या डोळ्यात पुढे जाण्याची आस कमालीची. ‘अॅस्पिरेशनल इंडिया’ची झलक.

भोवताली साऱ्या सुखसुविधा दिसत असताना त्या मिळविण्यासाठी झटणाऱ्या बहुतांश जणी विडी व्यवसायात. हातातील करंगळीला दोरा गुंडाळून विड्या वळणाऱ्या बहुतेक जणी विनायक नगरात राहतात. ज्यांना वेगात पुढे जायचे आहे त्यांनी विडीबरोबर आता शिलाई मशीनही घेतलं आहे. कोणाचा मुलगा आयटीआय झालेला तर कोणाचा वाहनचालक म्हणून नोकरी करणारा. वैष्णवी विनायक पोतू गेल्या १४ वर्षांपासून विडी वळण्याचे काम करतात. चार मुली आणि एक मुलगा. मुलगा शेवटचा. ‘मुलासाठी थांबलात का ?- त्या हसल्या, लाजल्याही. ‘हो ’ म्हणाल्या.

‘आता दवाखान्याला किती पैसे जातात?,’ जरा खोचकपणेच विचारलं तर त्यांनी सहजच उत्तर दिलं ‘एकाचं झालं की एक येतंच दुखणं. एका वेळी किमान ५०० रुपये.’ नड निर्माण झाली की, ‘सूर्योदय’ किंवा ‘बेल स्टार’सारख्या मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घ्यायचं. महिन्याला दोन टक्के व्याजाने. म्हणजे व्याजाचा वार्षिक दर २४ टक्के. हप्ता चुकला की ६५० रुपयांचा दंड. कर्ज फेडताना दंडाचा हिशेब स्वतंत्र. कर्ज घेणं आणि फेडणं यात कमावण्याचा हिशेब तो किती? हजार विड्या वळल्या की, २०० रुपये. कारखान्यातून ६५० ग्राम तेंदू पत्ता आणि २४० ग्राम तंबाखू आणायची आणि ११ तास हे काम करायचं. प्रश्न पडला, की विड्या वळणारा पुरुष का नसतो? – पुरुषी हौस नेहमी स्त्रियांच्या शोषणावरच पोसलेली.

भारतात अकबराच्या कालखंडात आली म्हणे विडी. मूळ कुठलं धूम्रपानचं याविषयी मात्र वाद आहेत. अमेरिका हे धूम्रपानाचं मूळ ठिकाण असल्याचा काही पुराविद्यांचा दावा. क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर प्रवासात होता. त्याच्या एका सहकाऱ्याला १४९२ मध्ये काही जण एका विचित्र झाडांची पानं वापरून त्याचा धूर पीत आहेत, असं चित्र दिसलं.

पुढे अनेक पुराविद्यांनी तंबाखूचं मूळ अमेरिकाच असल्याचं म्हटलं. तर काहींच्या मते चीन किंवा मंगोलियामध्ये पहिल्यांदा तंबाखूचा धूम्रपानासाठी उपयोग झाला असावा म्हणे. पण हा मतप्रवाह बहुतेकांनी पुढे नाकारला. भारतात पोर्तुगिजांनी तंबाखू आणला तो गुजरातमार्गे. पुढे त्याचा प्रचार दूरपर्यंत झाला. अकबराच्या काळात पहिल्यांदा चिलीम किंवा हुक्का पुढे आला. जहांगिरापर्यंत धूम्रपानाचे दुष्परिणाम दिसू लागले होते. पुढे वारंवार तंबाखू आणि धूम्रपानावर बंदीचे आदेश काढण्यात आले. पण बंदी घालणे म्हणजे बाजारपेठेच्या काळ्या बाजूला प्रोत्साहन. महाराष्ट्र सरकारचा गुटखाबंदीचा निर्णय आणि गुटख्याचा काळाबाजार सर्वांसमोर आहेच.

इतिहासातील तपशील काहीही असो, डोईवरचा पदर ढळू नाही द्यायचा. कुंकू ठसठशीत दिसलं पाहिजे. हातातल्या वायरच्या पिवशीतून एक मोठा गठ्ठा काढला. त्यातली एकेक सुटी विडी मोजायचा एवढा सराव होता, की एखाद मिनिटभरात तो गठ्ठा एका चौकोनी ‘ट्रे’मध्ये मोजला गेला. सकाळी अकरा-साडेअकराची वेळ असेल, जालन्याच्या सुभद्रानगर भागात राहाणाऱ्या उषाताईनी पुन्हा एकदा तंबाखू मोजून घेतला. तेंदुपत्त्याचा गठ्ठा बरोबर घेतला. त्या पुन्हा दिवसभर विडी वळणार होत्या.

देशभर विड्या वळणाऱ्यांची संख्या आहे ५० लाखांच्या घरात. नुसतं बसून राहण्यापेक्षा आयुष्याचा गाडा ओढणाऱ्या उषाबाईंसारख्या काही जणी थांबत नाहीत. त्यांचा संसार आता फुलला आहे. मुलं कामाधंद्याला लागली आहेत. घराला पूर्वीपेक्षा अधिक बरकत आली आहे. पद्माशाली समाजातील नव्याने लग्न झालेल्या, अविवाहित, मध्यमवयाच्या आणि अगदी म्हाताऱ्या बायकाही विडी वळतात. दिवसभरात कोणी १५० रुपये तर कोणी २०० रुपये पदरात पाडून घेतं. फेब्रुवारी – मार्चमध्ये या व्यवसायातील माणसं कावरीबावरी होतात.

हितेंद्रभाई शहांचा विडीचा कारखाना आहे. त्यांच्या मुलाचा लघुसंदेश आला-‘अर्थमंत्री निर्मला सीतारामन वस्तू सेवा कर परिषदेमध्ये विडी आणि सिगारेटवर भाववाढ करणार.’ इंग्रजी दैनिकांतील बातम्यांचा आधार होता त्या संदेशाला. विडी उद्याोगात तेव्हा अस्वस्थता होती. आता पुन्हा कर वाढला आणि तो २८ टक्क्यांवर गेला तर या विडी वळणाऱ्या बाईला पैसे द्यायचे कसे? विरंगुळ्याला कर नेहमीच जास्त असतो. पण असा कर वाढला की तंबाखूचे प्रमाण थोडेसे कमी करायचे, विडीची जाडी कमी करायची किंवा जमलेच नाही तर विडीची उंची कमी करायची. म्हणजे तंबाखू कमी बसतो. विडी पिणाऱ्याचा एक झुरका कमी.

विडीसाठी लागणारा तंबाखू कर्नाटक सीमेलगतच्या निपाणीच्या आसपास पिकतो. सांगलीमध्ये आणि जयसिंगपूर भागातही हाच तंबाखू येतो. सिगारेटसाठी लागणारा सारा तंबाखू गुजरातचा. आनंद दूध डेअरीचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रातला. कर्नाटकातल्या गुंटुरचा तंबाखूही सिगारेटमध्ये वापरतात. तंबाखूची वरची कोवळी पाने सिगारेटमध्ये आणि थोडी निबर विडीमध्ये. आजही एक रुपयाला एक विडी. २० रुपयांना गठ्ठा. ज्यामध्ये कमी तंबाखू किंवा ज्याची उंची कमी अशा गठ्ठ्याची किंमत २० रुपये. जसाजसा क्षयरोग प्रतिबंधाचा प्रसार वाढला तसतसे विडी पिणारे कमी होत गेले. आता अगदीच अंगमेहनतीचे काम करणारे किंवा उत्तर भारतीयांच्या व्याखेत ‘पिछडे – अतिपिछडे’ मंडळीच विडी ओढतात.

तेंदुपत्त्यावरही सरकारचं नियंत्रण आहे. बहर असतो तेव्हाच लिलाव होतात. तेंदुपत्ता मग विड्यांच्या कारखान्याला पुरवला जातो. तत्पूर्वी त्याची निविदा निघते. एकीकडून तंबाखू आणि दुसरीकडून तेंदुपत्ता असा व्यवहार जालना, नगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये मोठा. तंबाखू मोजणं आणि पानं मोजून दिल्यानंतर उषाबाईंसारख्या अनेक जणी तंबाखू भरण्यासाठी पुंगळ्या बनवतात.

१९८० च्या दशकात जेव्हा भांडवलदार विरुद्ध कामगार असे चित्रपट निघत होते तेव्हा कष्टकरी व्यक्ती चित्रपटांचा नायक होत्या. तेव्हा विडी चित्रपटातून दिसे. तेव्हा विडीची विक्रीही अधिक होती. आता सिगारेटची. एक आकडेवारी सांगते की, एक मिनिटाला सात लाख सिगारेट तयार होतात. खरे तर गेल्या काही वर्षांत धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. २००३ पासून तंबाखू प्रतिबंधात्मक कायद्याच्या कारवाईचा वेग वाढला. किमान लहान मुलांना तंबाखू, विडी, सिगारेट विकू नका, असे बजावण्यात आले.

२०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात १३ लाख व्यक्तींचा तंबाखू सेवनाने मृत्यू होतो. आता धूम्रपान आणि तंबाखू चघळणारी मंडळी कमी झाल्याची आकडेवारी सरकारदरबारी आहे. पण धूम्रपान करणाऱ्यांपैकी सात टक्के लोक अजूनही विडी पितात. त्यामुळे देशभरात ५० लाखांहून अधिक कामगार विडी व्यवसायात आहेत. विडी व्यवसायातील उलाढाल २० लाखांपेक्षा अधिक होत नाही तोपर्यंत करामध्ये सवलत देण्याची सरकारची भूमिका आहे. तंबाखूवर २८ टक्के वस्तू व सेवा कर मात्र आहेच. पण हे असे कर आणि त्याचे व्यवस्थापन याची गणिते सोलापूर, जालना, अहिल्यानगरसारख्या भागातल्या विडी वळणाऱ्या महिला कशाला करत बसतील. पण कर वाढला की विडीची तब्येत खालावते.

विडी वळणाऱ्यांच्या वस्तीमध्ये धूम्रपान वाईट वगैरे मानलं जात नाही. येथे देशी दारूचं राज्य. कधी कोण पिऊन येईल. कोणात्या बाईवर हात उगारला जाईल हे सांगता येत नाही. ज्या घरात व्यसनाधिनता कमी त्या घरात चार स्टीलची भांडी अधिक असतात. एक पत्र्याचं कपाट येतं. एखादी सायकल दिसते. कोणी तरी हप्त्यावर दुचाकी घेतं किंवा एखादी ऑटो रिक्षाही येते. मिक्सर घेणं हे स्वप्न असतं एखाद्या बाईचं. मध्यंतरी या कामगारांना घरकुल देण्याची एक योजना तयार करण्यात आली. पण त्यातही नोंदणीकृत कामगारांनाच ती घरं मिळतील.

पण तेंदुपत्ता कापण्यापासून विडी बनविण्याचं काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा नाही. तशी ही माणसं भाषिक अर्थाने मात्र श्रीमंत. पूर्वज कधी तरी तेलंगणामधून आल्याने त्यांना तेलगू भाषा येते. सोलापूरसारख्या जिल्ह्यात कानडी कळणाऱ्यांची संख्याही जास्त. हिंदी, मराठी या दोन भाषांतील व्यवहार अधिक असल्याने किमान चार भाषा प्रत्येकाला येतात. त्यांची ही श्रीमंती लक्षात आल्यानंतर उगीच वृत्त अलंकार आठवत राहिला- ‘गणपत वाणी बिडी पिताना’, हवेतले इमले बांधण्याचे स्वप्न पाहणारा मध्यमवर्गीय माणूस त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असल्याची जाणीव वाढत जाते. आता मध्यमवर्ग बदलला आहे. पण गणपत वाणी ते बिडी जलैले.. पर्यंत खूप स्वप्नं अडकली आहेत. या साऱ्या ‘लाडक्या बहिणी’ आहेत. पिवळ्या रेशनकार्डाचा रंग बदलण्यासाठी धडपडणाऱ्या.. !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhas.sardeshmukh @expressindia.com