गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलेल्या याचिकेत काहीही अर्थ नाही, असे बजावून मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि कोल्हापूरचा ‘जयप्रभा स्टुडिओ’ जिंकला! हा स्टुडिओ खरे तर लतादीदींच्याच मालकीचा. न्यायालयात जो काही खटला होता, तो लतादीदी (आणि त्यांचा जयप्रभा स्टुडिओ) विरुद्ध राज्य सरकार असा होता. या न्यायालयीन वादात लौकिकार्थाने राज्य सरकारची बाजू खरी ठरली असली, तरी यातून झळाळून उठले ते ‘जयप्रभा’बद्दलच्या लोकभावनेचे सच्चेपण! या निकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार आहे. तो विकण्याची, पाडला जाण्याची आणि तेथे भलतीच कुठली इमारत उभी राहण्याची शक्यता आता जवळपास संपली आहे.
जवळपास संपली म्हणण्याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावून ‘ स्टुडिओ माझा- मी त्याचे काहीही करेन ’ असे म्हणण्याचा अधिकार लतादीदींना आहेच. त्यांच्यासाठी दिल्लीत निष्णात आणि नामवंत वकिलांची फौजही उभी राहू शकते. मात्र तसे झाल्यास हे वकील कोणता मुद्दा मांडणार, हा प्रश्न आहे. भालजी पेंढरकर यांच्याबद्दलच्या आदराचे वलय या स्टुडिओला प्रथमपासूनच आहे. १९३४ सालापासूनचा इतिहास असलेला हा स्टुडिओ गांधी-हत्येनंतर जाळला गेला, म्हणून पुन्हा नव्याने त्याची उभारणी झाली. या पुनर्बाधणीच्या मुद्दय़ावर आधी लतादीदींच्या बाजूने युक्तिवाद झाले होते. स्टुडिओ जुना नाहीच, मग त्याला वारसा कसा ठरवता, या मुद्दय़ावर एकदा भांडून झाले. मग उच्च न्यायालयात, हा स्टुडिओ ‘वारसा’ म्हणून जाहीर करताना विहित सरकारी प्रक्रिया पाळली गेली नाही, असाही मुद्दा मांडून झाला. दोन्ही मुद्दे निष्प्रभ ठरले आहेतच. मग यापुढे कोणत्या मुद्दय़ावर भांडणार?
एकंदर ११ एकरांवर पसरलेल्या या स्टुडिओची सात एकर जागा आधीच विकली गेल्यामुळे सध्या प्रश्न आहे तो चारच एकर जागेचा आणि त्यावरील बांधकामाचा. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर, शोभना समर्थ आणि तनुजा अशा दोन गत पिढय़ांना या स्टुडिओबद्दल ममत्व होते. दादा कोंडकेंसारख्यांनी तर अख्खा स्टुडिओ परत पूर्वीच्या गतवैभवाला नेऊन ठेवण्याच्या ईर्षेने तो विकत घेण्याचीही तयारी चालविली होती. हा गतेतिहास हे खरे; पण वारशाचे महत्त्व इतिहासानेच तर खुलत असते. विझून गेलेली स्पंदने पुन्हा जेथे जाणवतात, तोच वास्तुवारसा. कोल्हापूरकर कलाप्रेमी आणि मराठी चित्रपट महामंडळ हे हा स्टुडिओ वाचवण्यासाठी उभे राहिले होतेच, पण या स्टुडिओचे ‘आत्मवृत्त’ लिहिण्याचे काम भालजींचे दिवंगत सुपुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी केले होते. या साऱ्याच प्रयत्नांचा अर्थ, ‘ जयप्रभा’ च्या जागेवर भालजींच्या कार्याचे उचित स्मारक व्हावे, असाच होतो हे वेगळे सांगायला नको.
पण म्हणून स्मारक होईलच असे नाही. सध्या ही जागा कुणा भलत्यासलत्याच्या घशात जाणार नाही, एवढेच नक्की झाले आहे. काळाचे घाव सोसत ‘जयप्रभा’ उभाच आहे, पण तेथे स्मारक होऊ द्यायचे की नाही, हे ठरवण्याचा हक्क मालकांकडे सुखरूप आहे. स्मारकासाठीची लढाई एकटे कोल्हापूरकरच लढणार की त्यांना महाराष्ट्राची साथ मिळणार, हे अद्याप अनिश्चित आहे.