राजेंद्र गाडगीळ
गेले काही दिवस बातम्यांमध्ये महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण असो वा देशातील कोणताही भाग, निसर्गाचा प्रकोप स्पष्टपणे दिसतो आहे. कुठे ढगफुटीमुळे महापूर, तर कुठे कोरडा दुष्काळ यामुळे लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटा, थंडी आणि अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आज मराठवाड्यातील काळीज फाडणाऱ्या घटना आपल्याला इशारा देत आहेत की, तातडीने हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या सार्‍या व्यवस्था या हवामान-सहिष्णु (Climate Resilient) बनवण्याची अपरिहार्य गरज आहे.

हवामान बदल (Climate Change) आणि कारणीभूत घटक

मानवाच्या निसर्गात होणाऱ्या अशास्त्रीय हस्तक्षेपामुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची समस्या निर्माण झाली. जीवाश्म इंधनाचा अतिवापर, औद्योगिक प्रदूषण,रासायनिक शेती, खतांचा अतिरेकी वापर, एक-पीक पद्धतीचा (Monocropping) अवलंब, जंगलतोड (Deforestation), बेबंद शहरीकरण,काँक्रिटची उष्ण बेटे (Heat Islands) तयार होणे, अनियंत्रित बांधकामामुळे सुपीक जमिनीचा ऱ्हास, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलणे, वाळू उपसा, धरणांचे अशास्त्रीय व्यवस्थापन, अशस्त्रीय जमीन आणि पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचा अभाव. या सर्व घटकांमुळे जागतिक तापमान आणि हवामानामध्ये हानिकारक बदल घडून येत आहेत.यातून जे संकट निर्माण झाले आहे, त्यासाठी ‘हवामान सहिष्णु’ व्यवस्था निर्माण करण्याची अपरिहार्य गरज आहे.

हवामान सहिष्णुता म्हणजे काय?

‘हवामान-बदल-सहिष्णुता’ याचा सोपा अर्थ हवामानातील तीव्र बदलांमुळे (उदा. अतिवृष्टी, दुष्काळ, वादळे) निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्याची, त्यातून निर्माण होणारे नुकसान कमी करण्याची आणि पुन्हा वेगाने उभे राहण्याची क्षमता. ती आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसारखे असते. रोगप्रतिकारशक्ती आजार पूर्णपणे थांबवू शकत नसली तरी, आजारपणात शरीर लवकर बरे होण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, हवामान सहिष्णुता व्यवस्था महापूर किंवा दुष्काळ पूर्णपणे थांबवू शकत नाही, पण त्यामुळे होणारे नुकसान कमी करून समाज आणि पर्यावरणाला त्या धक्क्यातून लवकर सावरण्यास मदत करते.

हवामान लवचिकतेसाठी प्रमुख चार गोष्टी अमलात आणाव्या लागतील

  • अंदाजित करणे (Anticipation): धोक्यांचा अंदाज घेऊन तयारी करणे.
  • अनुकूलन (Adaptation): बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी उपाययोजना करणे.
  • सामावून घेणे (Accommodation): संकटाचा प्रभाव शोषून घेणे.
  • सावरणे / पुनर्प्राप्ती (Recovery): स्व-संघटन/पुनर्संघटन करून पूर्ववत होणे.

विविध क्षेत्रांना हवामान-सहिष्णू कसे बनवायचे?

या संकटावर मात करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये तातडीने बदल करणे आवश्यक आहे. या साठी जगभरात सुरू असलेले काही ठोस उपाय आणि प्रयोग अमvलात आणावे लागतील.

हवामान-सहिष्णू शहर रचना आणि गावे

शहरांमध्ये काँक्रीटचे जंगल वाढल्याने पाण्याचा निचरा होत नाही आणि ‘हीट आयलंड’ (Heat Island) परिणामामुळे तापमान वाढत आहे.

  • शोषक शहरे (Sponge Cities): चीनसारख्या देशात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यात शहरांमध्ये बागा, तलाव आणि पर्जन्यजल साठवण्याच्या प्रणालींचे जाळे उभारण्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरवले जाते. ज्यामुळे भूजल पातळी वाढते आणि पुराचा धोका कमी होतो.
  • हरित छत (Green Roofs): इमारतींच्या छतावर गवत किंवा छोटी झाडे लावून इमारती थंड ठेवणे आणि पावसाचे पाणी शोषून घेणे. पाणथळ जागांचे संरक्षण: नैसर्गिकरित्या पुराचे पाणी सामावून घेणाऱ्या तलाव आणि नाल्यांचे संरक्षण करणे.

कृषी परिसंस्था

अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि तापमानातील बदलांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी खालील उपाय केले पाहिजेत.

  • पीक वैविध्य (Crop Diversification): दुष्काळ-प्रतिरोधक वाणांसह विविध प्रकारची पिके लावल्यास, अति हवामान बदलामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका कमी होतो.
  • हवामान-अनुकूल बियाणे: सुधारित, पूर-सहिष्णु किंवा दुष्काळ-प्रतिरोधक पिकांचे वाण वापरून उत्पन्नात वाढ करणे. उदा. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) तशी वाण विकसित केली आहेत.
  • जल व्यवस्थापन: पावसाचे पाणी साठवणे (Rainwater Harvesting),कार्यक्षम सूक्ष्म सिंचन (ठिबक/तुषार) आणि आच्छादन (Mulching) यांसारख्या पद्धतींचा वापर करणे.
  • मृदा संवर्धन: नांगरणी न करता (No-till farming),पीक फेरपालट आणि सेंद्रिय खते वापरून मातीची सुपीकता टिकवण्यास मदत होते त्यामुळे मातीची संरचना आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • कृषी-वनिकी (Agroforestry): झाडे, पिके आणि पशुधन यांचे मुळे परिसंस्थेची लवचिकतेत वाढण्यास मदत होते.

क्लायमेट रिझिलियन्स ऊर्जा निर्मिती आणि उद्योग

कोळशावर आधारित वीज निर्मितीमुळे होणार्‍या हवामान बदलांचे परिणाम औद्योगिक वसाहतींना सोसावे लागतात. यासाठी खालील उपाय केले पाहिजेत.

  • विकेंद्रित सौर आणि पवन ऊर्जा: मोठ्या प्रकल्पांऐवजी गावोगावी छोटे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणे. यामुळे सुरक्षित ऊर्जा निर्मिती होते.
  • भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. त्याची अंलबाजवणी झाली पाहिजे.
  • ‘वापरा आणि फेका’ऐवजी कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण (Reduce, Reuse, Recycle) या तत्त्वाचा अवलंब करणे.
  • पाण्याचे नियोजन (Zero Liquid Discharge – ZLD): औद्योगिक वसाहतींमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करणे.
  • संरक्षित पायाभूत सुविधा: पूर पातळीचा अभ्यास करून औद्योगिक युनिट्स आणि गोदामे उंच ठिकाणी बांधणे.

लोक-वैज्ञानिक पर्याय आणि नागरिकांची भूमिका महाराष्ट्रातील याची उत्तम उदाहरणे पुढीलप्रमाणे.

  • हिवरे बाजार: लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकास साधून पाण्याची टंचाई दूर केली.
  • राळेगणसिद्धी: जलसंधारणाचे महत्त्व ओळखून लोकसहभागातून कायापालट केला.
  • नागरिक म्हणून आपली भूमिका: जागरूक नागरिक म्हणून आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर ‘हवामान-सहिष्णु’ व्यवस्थेचा आपल्या विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी दबाव आणा.
  • स्थानिक पातळीवर सहभाग: आपल्या सोसायटीत, गावात पर्जन्यजल संधारण आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प सुरू करा. वैज्ञानिक दृष्टिकोन: पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन शेतीत आणि जीवनशैलीत बदल करणे.

हवामान बदल हे एक कठोर वास्तव आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या दारापर्यंत पोहोचले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी आपली शहरे, गावे, शेती आणि उद्योगधंदे अधिक शाश्वत आणि भविष्यासाठी सुरक्षित बनवण्याची गरज आहे. सर्व राजकीय पक्ष, शासन, शास्त्रज्ञ, विविध संस्था, संघटना आणि नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन हवामान-सहिष्णु व्यवस्था कशी उभी करता येईल, याचे लोक-वैज्ञानिक नियोजन केले पाहिजे. तर चला!, आपल्या पुढच्या पिढीला एक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य देण्यासाठी आजच कृती करूया.

लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.
gadgilrajendra@yahoo.com