विजया जांगळे
साथरोगांविषयी वेगवेगळ्या काळात जगाची मानसिकता दोनपैकी एका टोकाची असते. एकतर भयगंड तरी असतो, नाहीतर बेफिकीरी तरी दिसते. यातील पहिले टोक आपण कोविडच्या निमित्ताने अनुभवले आणि आता हळूहळू आपण सारेच पुन्हा दुसऱ्या टोकाच्या दिशेने प्रवास करू लागलो आहोत. मात्र आरोग्य क्षेत्राने या साथीतून एक महत्त्वाचा धडा घेतला. तो म्हणजे संभाव्य साथींना तोंड देण्याची सज्जता आणखी वाढवावी लागेल आणि जगालाही त्यादृष्टीने सज्ज करावे लागेल. त्यामुळेच जो अद्याप केवळ अंदाजाच्या स्तरावर आहे, जो उद्भवलेलाही नाही, जो कधी-कुठे-कशामुळे उद्भवेल, याविषयीही काही निश्चित माहिती हाती आलेली नाही, त्या डिसीज-एक्सविषयी गदारोळ सुरू झाला आहे. या प्रश्नी सामान्यांतूनही व्यक्त होणारी चिंता ही सज्जतेची पहिली पायरी म्हणावी लागेल.

सध्या या आजाराविषयी सुरू असलेल्या चर्चेला कारण ठरले आहे, ब्रिटिश आरोग्यतज्ज्ञ केट बिंगहॅम यांचे वक्तव्य. त्यांच्या मते हा आजार कोविडपपेक्षा सातपट अधिक संसर्गजन्य असेल. त्याची संसर्गक्षमता गोवरपेक्षाही अधिक असेल आणि त्याचा मृत्यूदर इबोलाएवढा प्रचंड असेल. या साथीमुळे १९१८-१९मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लूच्या भीषण महासाथीपेक्षाही अधिक मृत्यू होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या केट मे ते डिसेंबर २०२० या कालावधीत ब्रिटनमधील कोविड लसीसंदर्भातील टास्कफोर्सच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांच्या मताला महत्त्व आहेच. सध्या चर्चाचे कारण केट यांचे वक्तव्य असले, तरीही ‘डिसीज- एक्स’ ही संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ साली, म्हणजे कोविडसाथीच्याही आधी मांडली होती. सध्यातरी ही अनेक वैज्ञानिक आणि गणिती पुराव्यांचे विश्लेषण करून मांडण्यात आलेली संकल्पना आहे. प्रत्यक्षात अद्याप अशा साथीस कारणीभूत ठरू शकणारा कोणताही विषाणू वा जीवाणू आढळलेला नाही. ही साथ एखादा विषाणू, जीवाणू किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यापैकी नेमका कोणता घटक कारणीभूत ठरेल, तो कोणत्या जैविक वर्गातून येईल, त्याचे किती उपप्रकार असतील, लक्षणे कोणती असतील, जगाच्या कोणत्या भागातून अशा साथीची सुरुवात होईल वगैरे माहिती अद्याप हाती आलेली नाही. त्यामुळेच याला ‘डिसीज- एक्स’ हे नाव देण्यात आले आहे.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

‘द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस’ या आरोग्यविज्ञानविषयक जर्नलमध्ये २०२० साली ‘डिसीज एक्स – भविष्यातील साथींवरील उपाययोजनांचा विकास’ या शीर्षकाखाली एक निबंध प्रकाशित करण्यात आला होता. त्यात ‘डिसीज- एक्स’ला कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकाला ‘पॅथोजेन एक्स’ म्हणून संबोधण्यात आले होते. जगाने या संभाव्य साथरोगाच्या प्रतिबंधासाठी सज्ज राहिले पाहिजे. त्याच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतील अशी उत्पादने विकसित केली पाहिजेत, असे मत मांडण्यात आले होते.

थोडक्यात, हा संभाव्य आजार ही एकप्रकारे धोक्याची घंटा आहे. एखाद्या साथीचा उद्रेक होत असल्याचे वेळीच ओळखणे, त्यावर तातडीने विलगिकरण, उपचारादी उपाययोजना सुरू करणे, संभाव्य साथीचा प्रतिबंध करण्यासाठी लसीवर संशोधन सुरू ठेवणे, साथ सुरू झाल्यानंतर लसीला लवकरात लवकर मान्यता देणे, ती अन्य देशांना उपलब्ध करून देणे, तिच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठीच्या सुविधा निर्माण करणे हा या सज्जतेमागचा हेतू आहे. डिसीज- एक्ससाठीची तयारी ही अद्याप अज्ञात असलेल्या साथरोगाच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि उपाययोजनांची तयारी आहे.

‘कोएलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन’चे रिचर्ड हॅशे यांच्या मते, “डिसीज एक्स ही सध्या एखादी कपोलकल्पित रंजक वैज्ञानिक संकल्पना भासू शकते, मात्र त्यासाठी जगाने सज्ज राहणे अपरिहार्य आहे.” आपल्या या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी इबोला साथीचे उदाहरण दिले आहे. आफ्रिकेच्या पश्चिम भागात २०१४ मध्ये इबोलाचा उद्रेक झाला होता. ती साथ नियंत्रणात आणण्यात यशही आले होते. मात्र २०१८ मध्ये तिचाच नवा उपप्रकार पुढे आला आणि साथ पुन्हा सुरू झाली. अशी पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. २०२०मध्ये कोविडसाथ अनेक देशांत पसरल्यानंतर जगातील काही नामांकित वृत्तपत्रांत ‘२०१८ साली अंदाज वर्तवण्यात आलेला डिसीज- एक्स हाच’ असा दावा करणारे लेखही प्रकाशित झाले होते. मात्र नंतर हा सार्स वर्गातील विषाणू असल्याचे स्पष्ट झाले.

अंदाजाला आधार काय?

जगातील विविध देशांत संभाव्य साथींवर आणि सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या साथींच्या संभाव्य उपप्रकारांवर सदैव संशोधन सुरू असते. उपलब्ध विदेच्या आधारे गणिती आणि सांख्यिकी सूत्रे विकसित करून त्याआधारे अधिक अचूक अंदाज वर्तवणे उपयुक्त ठरू शकते, मात्र तेवढेच पुरेसे नाही. आजवरचे बहुतेक साथरोग हे वन्य प्राणी-पक्ष्यांकडून माणसाकडे संक्रमित झाले आहेत. ही संक्रमाणाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि आडाख्यांच्या पलीकडची आहे. ही प्रक्रिया जगात अक्षरश: कुठेही आणि कधीही घडू शकते. तिची निश्चित व्याख्या करणे शक्य नाही. त्यातच वन्य प्राण्यांप्रमाणेच पाळीव प्राण्यांतूनही अनेक रोग संक्रमित होतात. मांसाहार व्यर्ज करणे शक्य नाही आणि व्यवहार्यही नाही. एकतर तो अनेकांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि दुसरे म्हणजे तो एक प्रचंड मोठी उलाढाल असणारा व्यवसाय आहे. पाळीव प्राण्यांवर बंदीही योग्य नाही. अशा स्थितीत साथरोगांच्या संक्रमाणाचे अगणित मार्ग असू शकतात. त्यापैकी नेमक्या कोणत्या मार्गाने जीवाणू वा विषाणू मानवी शरीरात शिरकाव करेल, याचा आदमास बांधणे सध्या तरी अशक्य कोटीतील आहे.

अशा स्वरूपाच्या संशोधनांसाठी प्रदीर्घ काळ, सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी मोठे आर्थिक पाठबळही आवश्यक असते. कोंबड्या, डुकरे इत्यादी पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित आणि उंदरांसरख्या मानवी अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासासाठी आर्थिक तरतूद केली जाते, मात्र वटवाघुळांसारख्या वन्यजीवांच्या अभ्यासासाठी मिळणारे आर्थिक पाठबळ कोविडसाथीचा उद्रेक होईपर्यंत अगदी तुटपुंजे होते. त्यात वटवाघुळे अंधारात बाहेर पडणारी, त्यामुळे त्यांच्या विश्वात काय सुरू आहे, याचा पत्ता कोणालाच लागत नसे. एखाद्या दुर्गम ठिकाणी शेकडो वटवाघुळे मृत्युमुखी पडली, तरी त्यांची माहिती मिळण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. आता या परिस्थितीत सुधारणा होत आहे. हे झाले प्राणी-पक्ष्यांतून मानवात होणाऱ्या संक्रमाविषयी, मात्र मानवाच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांनाही संसर्ग होण्याची आणि आजारास कारणीभूत विषाणू त्यांच्या शरिरात उत्परिवर्तित (म्युटेट) होऊन अधिक घातक होण्याची भीतीही असते. संशोधकांना त्यावरही लक्ष ठेवावे लागते.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि तथाकथित विकासामुळे माणूस जंगलांच्या आणि पर्यायाने वन्य प्राण्यांच्या अधिक जवळ जाऊ लागला आहे. जागतिकीकरण आणि दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे जग जवळ येऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात साथी नित्याच्याच होण्याची शक्यता कोविडकाळापासून वर्तवण्यात येत आहे. डिसीज- एक्सचा उद्भव होण्यापूर्वीच त्याच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी सुरू झालेली धडपड महत्त्वाची ठरते, ती यासाठी!

vijaya.jangle@expressindia.com