scorecardresearch

५०१. भयातीत निश्चिन्त

सद्गुरू कसा आहे? तो अत्यंत आदराने रामरूपामागे लपला आहे!

सद्गुरू कसा आहे? तो अत्यंत आदराने रामरूपामागे लपला आहे! परमात्म्याला पुढे करून, परमात्म्याच्या भक्तीत स्वत: लीन होऊन स्वत:कडे मनुष्याचा सामान्यपणा घेऊन तो जगात वावरत आहे. तो भयातीत आहे. सहज निर्भयता हे त्याचं मुख्य लक्षण आहे. त्यातही विशेष म्हणजे, काय होईल, याबाबत आपल्याला खात्री नाही म्हणून आपण चिंता करतो, तर कधी कधी आपल्या बाबतीतही विपरीत होईल, हे जाणूनदेखील ते निश्चित असतात! एक उदाहरण सांगतो. पारतंत्र्यात अनेक संस्थानांमध्ये अंतर्गत कलह, जीवघेणी कटकारस्थानं वगैरे प्रकारही चालत. त्यातल्या सात्त्विक प्रवृत्तीच्या काही संस्थानिकांचे श्रीगोंदवलेकर महाराज यांच्याकडे येणे-जाणे असे. श्री महाराजांच्या कृपेमुळे आपण या संस्थानिकाचे काही वाकडे करू शकत नाही, म्हणून त्याच्या विरोधातील काहींचा महाराजांवरही राग होता. औंध संस्थानच्या एक राणीसरकार श्रीमहाराजांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही महत्त्वाची कृती करीत नसत, म्हणून ब्रिटिश अधिकारीच महाराजांवर नाराज होते. त्यामुळे विषप्रयोगाने महाराजांना मारण्याचा कट त्यांनी आखला. त्यासाठी ज्या माणसाला पाठवावे त्याने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्यांचेच होऊन जावे, असा प्रकार दोनदा घडला. अखेर जेकब नावाचा अधिकारीच तयार झाला. सरकारी कामानिमित्त तो चारेक दिवसांसाठी गोंदवल्यास येऊन राहिला. दुसऱ्याच दिवशी त्याने श्रीमहाराजांचे दर्शन घेतले आणि आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी श्रीमहाराजांनी भोजनास यावे, अशी आग्रहाची विनंती केली. त्याच्या पुढील दिवशी महाराजांनी यायचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी त्याने राममंदिरात प्रसाद म्हणून थोडे भोजन पाठवले. ते महाराजांनी जमिनीत खोलवर पुरायला सांगितले. कुणालाही बरोबर यायची परवानगी दिली नाही. अन्नात विष आहे, म्हणाले. अनन्य भक्त भाऊसाहेब केतकर यांनी न राहवून विचारले की, तुम्ही तरी का जाता? तर म्हणाले, ‘मी गेलो नाही तर त्याचे मन दुखावेल!’ तिथून आले तर प्रचंड दमा लागलेला आणि अंगाची आग आग होत होती. मूठ-मूठभर वेलच्या खाल्ल्या तेव्हा काही तासांनी आग शांत झाली. मग त्या जेकबला रात्री भोजनासाठी बोलवायला म्हणून माणूस पाठवला तेव्हा कळले की, महाराजांवर विषप्रयोगाचा काहीही परिणाम झाला नाही, हे कळल्यावर घाबरून तो गोंदवले सोडून गेला होता. दुष्कृत्य क्षालनाचा मोठा योग त्याने गमावला होता. असो. तर सद्गुरू असा भयातीत असतो.. आणि त्याचे प्रत्येक वर्तन, प्रत्येक कृती ही स्वस्वरूपाचेच भान देणारी, स्वरूपाकडे वळवणारीच असते. जनांमध्ये पाहू जाता तो वेगळेपणाने जाणीवपूर्वक उठून दिसणार नाही. स्वत:चा बडेजाव करणार नाही. याचे कारण जाणीवपूर्वक वेगळे दिसण्याची भावना अहंपणातूनच निर्माण होते. जो सदा परमतत्त्वाशी ऐक्य पावला आहे तो भिन्नभावाने राहतच नाही. भिन्नभावात कधी वसतच नाही आणि म्हणूनच भिन्नत्वात जगणाऱ्या, भेददृष्टीने वावरत असलेल्याला तो गवसतही नाही! म्हणूनच समर्थ सद्गुरूचे वर्णन करताना म्हणतात : ‘लपावें अतीआदरें रामरूपीं। भयातीत ये स्वस्वरूपीं। कदा तो जनीं पाहतांही दिसेना। सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना।। १८५।।’’

हा सद्गुरू मग कुठे आहे? समर्थ सांगतात, तो सदासर्वदा सन्निध आहे. हे मना सज्जनांशी योग साधून त्या सत्यस्वरूप सद्गुरूचा शोध घे. (मना सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधून पाहे।). त्या सद्गुरूचा योग साधला की चराचराला व्यापून उरलेल्या परमतत्त्वाची अखंड भेट होईल. पण तो योग येण्यासाठी हे मना, या वियोगाला कारणीभूत असलेल्या मीपणाचा त्याग कर. (अखंडित भेटी रघूराजयोगु। मना सांडि रे मीपणाचा वियोगु।। १८६।।).

 

मराठीतील सर्व मनोयोग ( Manoyog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या