आपल्याला आज अशाश्वत अशा भौतिकाचं अखंड भान आहे, अशाश्वताचं अखंड प्रेम आहे, अशाश्वताचंच अखंड स्मरण आहे, अशाश्वताचं क्षणोक्षणी अनुसंधान आहे. पाहा बरं, उपासना ‘करावी लागते’ आणि प्रपंच सहजपणे होतच असतो! उपासनेत प्रपंचाचं क्षणमात्र विस्मरण झालं तर त्याला आपण भान हरपणं मानतो, इतकं प्रपंचभान सहजपणे जागं आहे. प्रपंचात सर्वत्र प्रेम विखुरलं आहे, पण एका परमात्म्याच्या वाटय़ाला मात्र ते येत नाही. या अशाश्वत भौतिकात वावरण्याचा एकमेव स्थूल आधार म्हणजे माझा हा देह. हा प्रपंचात नुसताच वावरत नाही तर राबतोही. या देहभावामुळेच अखंड चिंता आहे. चिंता आहे म्हणून चित्तात सर्व प्रकारचं संसारदु:ख भरून आहे. चित्तात विषयप्रेमाचं विष आहे. त्यामुळे देहासक्तीतून भौतिकाचीच तहान-भूक सदोदित वाढत आहे. या तहानभुकेमुळे त्या चित्तात, त्या हृदयात प्रसन्नता नाही. सदोदित न्यूनताच आहे. देहभावातीत साधकाची अवस्था सांगणारा स्वामी स्वरूपानंद यांचा एक अभंग आहे. त्यात ते म्हणतात : ‘‘देह नव्हे ऐसा केलों गुरु-रायें। देखिली म्यां सोये स्व-रूपाची।। जन्म-मरणाची संपली ते वार्ता। दूर ठेली चिंता संसाराची।।’’ (संजीवनी गाथा, अभंग क्र. २५९चे पहिले दोन चरण). आजवर देहाला सांभाळण्यात, देहाची सोय पाहण्यात अनंत जन्म गेले. सद्गुरूंनी काय केलं? ‘देह नव्हे ऐसा केलों’ देह आहे, पण सद्गुरूंच्या बोधानुरूप जगणं साधल्यानं देहभावनाच निमाली आहे. मग तेव्हा केवळ आत्म्याचीच सोय पाहिली जाणार ना? मग तिथे ‘क्षुधातृषेचा अडदरू’ उरेल का? श्रीसद्गुरू एकदा म्हणाले, ‘‘आज मला अमुक करायचंय, उद्या तमुक करायचंय, परवा अमकी गोष्ट केलीच पाहिजे, पुढच्या आठवडय़ात तमकी गोष्ट साधलीच पाहिजे ; अशा स्वप्नांमध्ये जो-तो दंग आहे. स्वप्नावस्थेच्या पहिल्या पायरीवरच जो-तो अडकला आहे. मध्यमा-सुषुप्ती-तुर्या तर किती दूर राहिल्या!’’
खरंच आपल्या जगण्यातली ही स्वप्नावस्था कधी संपतच नाही. जागं व्हावं, असं वाटतंच नाही. झोपेबद्दल आमची तक्रार नसते, स्वप्नं पडतात त्याबद्दलही आमची तक्रार नसते. केवळ स्वप्नं चांगली असावीत, अशी आमची इच्छा असते. ही स्वप्नं सुधारून द्या, हीच सद्गुरूंकडे आमची एकमेव प्रार्थना असते. बरं, ती करून आम्ही निवांत होत नाही, तर आमच्या परीनं आमचं स्वप्न सुधारत राहाण्याचा प्रयत्नही करतोच. मग एक स्वप्न संपलं, दुसऱ्यात रमतो, ते संपलं की तिसरं स्वप्न आहेच. जन्म-मरण-जन्म ही वार्ता कधी संपतच नाही.
 पण जेव्हा देहभाव मावळतो आणि आत्मभाव जागा होतो तेव्हाच, ‘जन्म-मरणाची संपली ते वार्ता’ ही स्थिती येते. ती आली की मगच, ‘दूर ठेली चिंता संसाराची’ ही स्थिती येते. मग अशाश्वताची चिंता का उरेल? अशाश्वतासाठीची वणवण, लाचारी कशाला उरेल? माउलीही विचारतात, ‘‘येऱ्हवी तरी माझिया भक्तां। आणि संसाराची चिंता। काय समर्थाची कांता। कोरान्न मागे।।’’ माझ्या भक्ताला संसाराची चिंता कुठली? राजाची राणी काय भीक मागून पोट भरेल का? अर्थात हा भक्त अनन्य मात्र हवा!