जतीन देसाई jatindesai123@gmail.com

हिंदू-मुस्लीम दंगली थांबवण्याच्या प्रयत्नात एक पत्रकार शहीद झाला, त्याला आज बरोबर ९१ वर्षे झाली. ‘प्रताप’ नावाचे वर्तमानपत्र चालवणाऱ्या आणि स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या गणेश शंकर विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या काळातही फार हवेसे आहे. 

शहीद भगतसिंग यांचे मित्र असलेले आदर्श पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गणेश शंकर विद्यार्थी २५ मार्च १९३१ रोजी हिंदू-मुस्लीम समाजात झालेल्या दंगली थांबवण्याचा प्रयत्न करताना कानपूर येथे शहीद झाले. त्याच्या दोनच दिवस आधी ब्रिटिशांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर येथे फाशी दिली होती. विद्यार्थी यांचे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्याशीदेखील अतिशय जवळचे संबंध होते. ते स्वत: काँग्रेसचे नेते होते पण स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांशीही त्यांचे खूप जवळचे संबंध होते. क्रांतिकारी नेत्यांना मदत करण्यास ते नेहमी पुढे असत.

गणेश शंकर विद्यार्थी एक आदर्श पत्रकार होते. त्यांनी आपल्या लेखणीचा उपयोग चंपारण येथील नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, कानपूर येथील कापड उद्योगातील कामगारांसाठी, अत्याचार सहन करत असलेल्या रायबरेलीतील शेतकऱ्यांसाठी तसेच अन्य लोकांसाठी केला. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्यांनी १९१३ मध्ये कानपूर येथून साप्ताहिक ‘प्रताप’ सुरू केलं. तेव्हा ते अवघे २३ वर्षांचे होते. १९२० मध्ये त्याचं रूपांतर दैनिकात करण्यात आलं. फार थोडय़ा काळात ‘प्रताप’ लोकप्रिय झालं. सामान्य माणसांच्या प्रश्नांना ‘प्रताप’मध्ये स्थान मिळत असे. त्यांनी स्वत:ला मात्र पत्रकारितेपुरते मर्यादित ठेवले नाही. १९२८ मध्ये त्यांनी ‘कानपूर मजदूर संघा’ची स्थापना केली. विद्यार्थी यांनी स्वातंत्र्य आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली. संयुक्त प्रांताच्या विधान परिषदेचे ते सभासद होते. परंतु, गांधीजींच्या सांगण्यानुसार त्यांनी १९२९ मध्ये त्याचा राजीनामा दिला. संयुक्त प्रांताचे ते काँग्रेसचे अध्यक्ष होते.

ब्रिटिश साम्राज्याच्या काळात पत्रकारिता सोपी नव्हती. पण त्यासाठी कुठलीही किंमत चुकवायची विद्यार्थी यांची तयारी होती. त्यांना त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे ४-५ वेळा तुरुंगात जावे लागले होते. १९३० च्या मे महिन्यात त्यांना अटक करण्यात आली. ही त्यांची शेवटची धरपकड होती. महात्मा गांधी आणि इरविन कराराअंतर्गत त्यांची व इतर अनेकांची सुटका करण्यात आली. त्यापूर्वी  १९२० मध्ये रायबरेली येथील शेतकऱ्यांच्या बाजूने सातत्याने लिखाण करण्याबद्दल त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. १९२२ ला सुटल्यानंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली परत त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

भगतसिंग आणि विद्यार्थी यांची ओळख झाली आणि लगेच ते मित्रही झाले. भगतसिंग यांनी काही काळ ‘प्रताप’मध्ये कामदेखील केलं होतं. बलवंत सिंग या टोपण नावाने भगतसिंग त्यात लिहीत. क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबरही विद्यार्थी यांचे घनिष्ठ संबंध होते. स्वत:ची आर्थिक परिस्थिती बेताची असतानादेखील क्रांतिकारी नेत्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असत. पोलिसांपासून वाचण्यासाठी काही क्रांतिकारकांनी नाव बदलून ‘प्रताप’मध्ये कामदेखील केलं होतं. काकोरीकांडनंतर असफउल्ला खान यांना पोलीस शोधत असताना विद्यार्थी यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. रामप्रसाद बिस्मिल यांचे चरित्र विद्यार्थी यांनी प्रसिद्ध केलं होतं. काही क्रांतिकारी वेगवेगळय़ा महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचा सल्ला घेत.

महात्मा गांधी आणि विद्यार्थी यांची सर्वप्रथम भेट झाली ती १९१६ मध्ये लखनऊ येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात. गांधीजींमुळे ते प्रभावित झाले. ‘प्रताप’मध्ये या अधिवेशनाचा तपशीलवार वृत्तांत येत असे. बिहारच्या एका शिष्टमंडळाने लखनऊ येथे गांधीजींना भेटून चंपारणला येऊन निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. गांधीजींनी सुरुवातीला त्यांना नकार दिला कारण त्यांना चंपारणबद्दल फारशी माहिती नव्हती. १ जानेवारी १९१७ ला गांधी कानपूरला आले तेव्हा ते ‘प्रताप’च्या कार्यालयात थांबले होते. तेथेच त्यांनी बिहारच्या शिष्टमंडळाला सांगितले की मार्च-एप्रिलनंतर मी चंपारणला येऊ शकेन. हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय होता. एप्रिलमध्ये गांधीजी चंपारणच्या मोतिहारी आणि बेतियाला गेले. शेतकऱ्यांचा विजय झाला आणि त्यांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व देशात उभं राहिलं. गांधीजींच्या चंपारण दौऱ्याचा वृत्तांतही ‘प्रताप’मध्ये तपशीलवार प्रसिद्ध व्हायचा. गांधीजींच्या दौऱ्यामुळे नीळच्या शेतीच्या मालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. ते ब्रिटिश होते. ‘प्रताप’च्या ४, ११ आणि २८ जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या चंपारण येथील शेतकऱ्यांवरील अत्याचाराच्या लेखांवर प्रशासनाने आक्षेप घेतला. मात्र अशा गोष्टींचा विद्यार्थी यांच्या कामावर परिणाम होत नव्हता.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश साम्राज्याने दिलेल्या फाशीच्या विरोधात संपूर्ण देश संतापाने पेटून उठला. लोकांनी रस्त्यावर उतरून ब्रिटिशांना विरोध केला. विद्यार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ मार्चला कानपूरमध्ये संप जाहीर केला. विद्यार्थी यांना २६ मार्चपासून कराची येथे होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाला जायचं होतं. पण परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी तो दौरा रद्द केला. ब्रिटिशांना कानपूर येथे धार्मिक दंगली घडवून आणण्यात यश आलं.  हिंदू-मुस्लीम समाजात दंगल उसळली. ४०० हून अधिक लोक त्यात मारले गेले. विद्यार्थी आणि त्यांचे सहकारी दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन करत होते. दोन्ही समाजांतील काही हजार लोकांना त्यांनी वाचवलेदेखील. पण २५ तारखेला दंगल अधिक पसरली. ते दोन्ही समाजांतील दंगली करणाऱ्या लोकांमध्ये जाऊन त्यांना शांततेचे आवाहन करत होते. आपल्याला कोणी काही करणार नाही, असा त्यांना विश्वास होता. पण तसं झालं नाही. दंगलीत माणसं आपल्या परिचित लोकांचीदेखील हत्या करतात. तेव्हा त्यांच्या डोक्यात धर्माधता असते. अशा लोकांकडूनच विद्यार्थी यांची हत्या झाली. आपली हत्या होऊ शकते, याची कदाचित त्यांना जाणीवही असेल पण त्यांच्या दृष्टीने हिंदू-मुस्लिमांमध्ये एकता निर्माण होणे जास्त महत्त्वाचे होते. अहिंसा महत्त्वाची होती. कराचीत ही बातमी पोहोचली तेव्हा गांधी, नेहरू, सरदार पटेल आणि इतर सगळय़ांमध्ये शोककळा पसरली.  

महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’मध्ये १९ एप्रिल १९३१ रोजी लिहिलेल्या मृत्युलेखात म्हटलं होतं की, ‘गणेश शंकर विद्यार्थी यांचा मृत्यू हा सर्वाना स्पृहणीय वाटावा असा होता. त्यांचे रक्त हे अखेरीस दोन धर्माच्या लोकांना एकत्र सांधणार आहे. गणेश शंकर विद्यार्थी यांनी जे धैर्य दाखविले, तसे धैर्य अखेरीस दगडासारखी अंत:करणे वितळवणार आहेत आणि दोघांना एक करणार आहेत. पण हे विष इतके खोलवर भिनले आहे की, गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासारख्या  मोठय़ा त्यागी आणि अत्यंत शूर माणसाचे रक्त ते विष धुऊन टाकण्यास आज पुरेसे पडणार नाही. हे थोर उदाहरण आपणा सर्वाना तसाच प्रसंग आल्यास, तसेच प्रयत्न करण्यास उत्तेजित करील.’

गणेश शंकर विद्यार्थी यांचं संपूर्ण आयुष्य प्रेरणा देणारं आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ति- स्वातंत्र्यासाठी त्यांचा सत्तेबरोबर सतत संघर्ष केला. अहिंसेवर त्यांचा विश्वास असला तरी क्रांतिकारकांशी त्यांची मैत्री असे. आज गरज आहे विद्यार्थी यांच्यासारख्या पत्रकारांची!

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून भारतीय उपखंडातील शांततेसाठी लोकसंघटनात सक्रिय आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.