विजू खोटे हे नाव तोंडावर आले तरी गब्बरच्या तोंडून निघालेला तेरा क्या होगा कालिया? आणि त्याला उत्तर म्हणून चाचरतच आलेला कालियाचा संवाद.. ‘सरदार, मैंने आप का नमक खाया है सरदार’ हे आठवल्याशिवाय राहत नाही. हा संवाद काय किंवा ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील रॉबर्टचे ‘गलती से मिश्टेक हो गया’ हे वाक्य, यांत काही नाटय़ नव्हते. पल्लेदार संवाद, भारदस्त व्यक्तिरेखा असे काहीच नव्हते, तरी केवळ सहज अभिनय आणि अचूक टायमिंग याच्या जोरावर आपण साकारत असलेली छोटय़ातील छोटी भूमिकाही लोकांना लक्षात राहील, अशी साकारण्याची ताकद विजू खोटे नामक अवलिया कलाकाराकडे होती.

साधासरळ चेहरा असलेला हा कलाकार. अभिनयाचा वारसा त्यांच्या घरातच होता, पण म्हणून केवळ त्या जोरावर इंडस्ट्रीत कलाकार होता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे नेमकी काय कला आहे, हे समजून घेऊन आपल्याकडे आलेल्या भूमिकांमध्ये आपले काय देता येईल, याचा विचार करत ते रंगवण्याची प्रतिभा असावी लागते. खोटे यांच्याकडे ती होती. त्यामुळे हिंदी, मराठी अशा तब्बल ४४० चित्रपटांमधून काम करत त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून स्वत:चे नाणे खणखणीत वाजवले. विजू खोटे यांनी केलेल्या भूमिका तुलनेने खूप छोटय़ा होत्या, मात्र त्यातल्या अनेक भूमिका कायम लक्षात राहिल्या. सुरुवातीला केवळ छोटय़ा खलनायकी भूमिकांमधून काम केल्यानंतर त्यांनी योग्य क्षणी विनोदी भूमिकांकडे आपला मोर्चा वळवला. त्यांच्यातील विनोदी कलाकार कायमच प्रेक्षकांना भावला, पण शेवटपर्यंत ‘कालिया’ हीच त्यांची खरी ओळख राहिली. त्यामुळे ‘शोले’बद्दल गप्पा निघाल्या की ते त्यात रंगून जात. या भूमिकेसाठी त्यांना केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळाले होते. त्यावेळी इतक्या छोटय़ा भूमिकेतील कलाकारांसाठी चित्रपटाचा खास खेळ ठेवला जात नसे. त्यामुळे त्यांनी स्वत: मिनव्‍‌र्हामध्ये तिकीट काढून चित्रपट पाहिला. कालिया म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर मात्र त्यांना लोकांचा कायम गराडा पडायचा. विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे यांनी १९६४ साली ‘या मालक’ चित्रपटाची निर्मिती केली होती, त्या चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर पाच दशके त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांसह इंग्रजी नाटकांमधूनही काम केले. दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना भूमिकेसाठी वाट न बघत राहता, येईल ती भूमिका निभावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ते अखेपर्यंत कार्यरत राहिले.

खाणे, खिलवणे आणि मनमोकळ्या गप्पा यांचे वेड असलेला हा कलाकार गिरगावात जन्मला आणि कायम गिरगावकर म्हणून वावरला.