मित्रांनो, २०१६ सालच्या पूर्वपरीक्षेला अद्याप अवकाश आहे. २०११ ते २०१५ वर्षांच्या ‘पूर्वपरीक्षेच्या इतिहास’ या उपघटकाचा विचार केल्यास, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर फारच कमी प्रश्न विचारले गेले आहेत. सर्वात जास्त प्रश्न हे आधुनिक भारत आणि भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावर विचारले गेले आहेत. यूपीएससी मुख्य परीक्षेचा विचार केल्यास, मुख्य परीक्षेला आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्योत्तर भारत हा उपघटक अभ्यासावा लागतो. याकरता पूर्वपरीक्षेची तयारी करताना पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेच्या पुढील घटकांची तयारी एकत्र करता येते.

प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत रणनीती :

मित्रांनो, प्राचीन भारताचा व मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकावर पूर्व परीक्षेत फारच कमी प्रश्न विचारले जातात. म्हणून मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन अभ्यास केल्यास, कमीत कमी वेळेत या उपघटकाची तयारी करता येते.

मात्र, या घटकाची तयारी करताना जर प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास अभ्यासला तर मुख्य परीक्षेच्या पेपर- १ मधील महत्त्वाचा भाग पूर्व परीक्षेलाच तयार होतो. मुख्य परीक्षेतील सांस्कृतिक इतिहास पुन्हा अभ्यासण्याचे दडपण कमी होते.

काही विद्यार्थ्यांना इतिहास हा उपघटक कठीण

का भासतो?

इतिहासाचा अभ्यास करताना काय अभ्यासावे आणि काय अभ्यासू नये हे कळणे महत्त्वाचे असते. कोणत्या घटकाला किती वेळ द्यावा, कोणते पुस्तक अभ्यासावे हे बऱ्याचदा समजत नाही, त्यामुळे हा सोपा असणारा उपघटक अनेक विद्यार्थ्यांना कठीण भासतो.

तयारी कशी कराल?

१) सर्वप्रथम मागील पाच वर्षांच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक अभ्यासाव्यात म्हणजे कोणत्या घटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले गेले आहेत हे समजते, अभ्या  साला नेमकी दिशा प्राप्त होते आणि यूपीएससीच्या महासागरात आपले जहाज भरकटत नाही.

२)     जर नव्यानेच अभ्यासाला सुरुवात केली असेल तर, सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंत सीबीएसईच्या पुस्तकांचे वाचन सर्वप्रथम करावे. त्यानंतर पूर्व आणि मुख्य या दृष्टीने पुढील पुस्तकांचे वाचन अवश्य करावे.

३) जगाचा इतिहास (हा उपघटक फक्त मुख्य परीक्षेलाच आहे)- यासाठी जगाचा इतिहास- अर्जुन देव किंवा जगाचा इतिहास- जैन आणि माथुर. या पुस्तकाचे मराठी भाषांतरही उपलब्ध आहे.