पाकिस्तानवर २२ धावांनी विजय; मार्टिन गप्तील विजयाचा शिल्पकार
वर्षभरापूर्वी एकदिवसीय क्रिकेटची अंतिम फेरी गाठून सर्वानाच अचंबित करणाऱ्या किवींनी ट्वेन्टी-२० विश्वचषकातही उपांत्य फेरीत झेप घेण्याची किमया साधली. मार्टिन गप्तीलच्या तडाखेबंद फटकेबाजीने मंगळवारी न्यूझीलंडच्या विजयाचा अध्याय लिहिला. भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल प्रतिस्पध्र्याना हरवणाऱ्या न्यूझीलंडने सलग तिसऱ्या विजयावर मोहर उमटवताना पाकिस्तानला २२ धावांनी हरवले.
मार्टिन गप्तीलने वेगाने फटकेबाजी करीत ४८ चेंडूंत ८० धावांची खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडला ५ बाद १८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर पाकिस्तानला निर्धारित षटकांत ५ बाद १५८ धावाच करता आल्या.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर २९ वर्षीय गप्तीलने आपल्या फटक्यांनी क्रिकेटरसिकांची मने जिंकली. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. गप्तीलने पहिल्या विकेटसाठी केन विल्यमसनसोबत ६२ धावांची
भागीदारी केली. मोहम्मद इरफानने विल्यमसनला (१७) बाद करून ही जोडी फोडली. कॉलिन मुन्रो (७) अपयशी ठरला. मग गप्तीलने कोरे अँडरसनसोबत पाच षटकांत ५२ धावांची भागीदारी केली. अँडरसनने १४ चेंडूंत तीन चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले. अखेर १५व्या षटकात मोहम्मद समीने गप्तीलचा त्रिफळा उडवला. उत्तरार्धात रॉस टेलरने २३ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या.
पाकिस्तानला शार्जील खान आणि अहमद शेहझाद यांनी ५.३ षटकांत ६५ धावांची सलामी नोंदवून दिली. शार्जीलने २५ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या, तर शेहझादने ३० धावा केल्या. मात्र शार्जीलला अॅडम मिलनेने बाद केले, तर शेहझादचा अडसर मिचेल सँटनरने दूर केला. त्यानंतर मात्र पाकिस्तानची धावांची गती खालावली. उमर अकमल (२४), शाहिद आफ्रिदी (१९) आणि शोएब मलिक (नाबाद १५) यांनी अखेरच्या षटकांमध्ये पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद १८० (मार्टिन गप्तील ८०, रॉस टेलर नाबाद ३६; मोहम्मद सामी २/२३, शाहिद आफ्रिदी २/४०) विजयी वि. पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १५८ (शार्जील खान ४७, अहमद शेहझाद ३०; अॅडम मिलने २/२६, मिचेल सँटनर २/२९)
सामनावीर : मार्टिन गप्तील.