ठाणे : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी संबंधित मतदारांना आस्थापनाने भरपगारी सुट्टी द्यावी किंवा ते शक्य नसल्यास दोन तासांची सवलत द्यावी, असे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच सुट्टी किंवा सवलत दिली नाही आणि मतदार वंचित राहिल्याचे समोर आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठाणे जिल्ह्यामधील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ जागांसाठी निवडणुका होत आहेत.या निवडणुकीसाठी आज, शुक्रवार १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक विभागही सज्ज झाला आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या काळात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स या ठिकाणी काम करणाऱ्या मतदारांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कामगार, शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि विविध आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीत भरपगारी सुट्टी देणे शक्य नसेल तर त्यांनी मतदारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी. याबाबत योग्य ती दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहे.