१६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ठीक ३ वाजून ३० मिनिटांनी चौदा डब्यांची हिंदुस्थानातली पहिली रेल्वे गाडी ४०० उतारूंसह बोरीबंदरहून निघाली आणि १ तास १५ मिनिटांच्या प्रवासानंतर ठाण्यास पोहोचली. ही घटना हिंदुस्थानच्या भावी इतिहासाच्या दृष्टीने अति महत्त्वाची होती, याची ग्वाहीच जणू त्या वेळी दिल्या गेलेल्या २१ तोफांच्या सलामीने दिली होती. आजमितीला देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय रेल्वेचे अफाट जाळे पसरले आहे. लोकल ट्रेन्स, तसेच लांबपल्ल्याच्या काही हजार मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ा अहोरात्र धावत असतात. एका झऱ्याच्या रूपाने सुरुवात झाली आणि आज १६१व्या वर्षी त्याचे अक्षरश: महासागरात रूपांतर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या बदलाचे हे एक धावते शब्दचित्र.
भारतातील, आजमितीला सर्वात लांब पल्ल्याची गणली जाणारी ‘विवेक एक्स्प्रेस’ आसामातील दिब्रूगढ येथून निघून तमीळनाडूमधील कन्याकुमारी येथे सुमारे साडेतीन दिवसांच्या प्रवासाअंती पोहोचते. सर्वात लांब पल्ल्याच्या जगातल्या १० गाडय़ांपैकी ही एक आहे. या गाडीच्या मार्गावरचे भारतातील सर्वात लांबलचक नाव असलेले एक रेल्वे स्टेशन येते त्याचे इंग्रजीत नाव श्एठङअळअ ठअफअरकटऌअ फअखवश्अफकढएळअ  असे आहे. अठ्ठावीस अक्षरी हे नाव आहे. हा एक योगायोग आहे, असे म्हणावे लागेल!
रेल्वेगाडीचे स्वरूप आज अंतर्बाह्य़ पार बदलले आहे. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होण्याअगोदरच्या गाडय़ांचे बदलते स्वरूप आठवले, की आज गंमत वाटते. गाडीच्या सुरुवातीला इंजिन, तर शेवटी गार्डचा डबा असे. प्रत्येक थांब्याला गार्ड आपल्या डब्यातून खाली उतरे. थोडा दूर जाऊन मग तो जोराने शिट्टी फुंके. हातात धरलेला हिरवा बावटा पाच-सात वेळा तो हवेत फडकवीत असे, मग मोठी (प्रदीर्घ) शिट्टी फुंकून मोटरमन गाडी सुरू करी. (गाडीला वेग घ्यायला बराच वेळ लागे.) मग गार्ड लगबगीने येऊन आपल्या डब्यात चढत असे आणि गाडीचा वेग वाढायला सुरुवात होई.
रेल्वेमार्गाचे क्रमश: विद्युतीकरण झाल्यानंतर ही परिस्थिती हळूहळू बदलली. रेल्वे गाडीचे एकूणच मानचित्र पार बदलून गेले. आता गार्डने प्रत्येक थांब्याला खाली उतरण्याची गरज राहिली नाही. कारण सर्व डब्यांचा परस्परांशी संपर्क प्रस्थापित होण्यासाठी आतूनच ‘वीजवाहक’ जोडणीने ते जोडले गेले. गार्डचा छोटा स्वतंत्र डबा नाहीसा झाला व तो गाडीच्या एकसंध जोडणीत सामावला गेला. गार्ड ते मोटरमन असा संदेशवहनाचा मार्ग विजेच्या जोडणीद्वारे प्रस्थापित झाला. गाडी सुटण्यापूर्वी प्रत्येक थांब्यावर ‘ट्रिंगट्रिंग’ असा आवाज होणाऱ्या घंटीचे बटण दाबून मोटरमनला आपल्या जागेवरच बसल्या बसल्या संदेश देता येईल, अशी रचना करणे शक्य झाले. सुरुवाती-सुरुवातीला गार्ड-मोटरमन यांनी परस्परांना हिरवा झेंडा दाखविण्याची पद्धतही त्यामुळे पुढे बंद झाली.
लोकलचा डबा आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ा यांच्या बाह्य़ रूपातही काळाच्या ओघात अनेक बदल झाले. सुरुवाती सुरुवातीला लांबपल्ल्याच्या गाडय़ांचे डबे लोकलच्या डब्यांच्या मानाने सुबक चेहऱ्याचे वाटत. लोकलचा काहीसा ओबड-धोबड वाटणारा डबा अगदी समोरून पाहिला, तर एखाद्या व्रतस्थ साधूचा गंभीर-डोळे मिटलेला चेहरा मन:पटलासमोर उभा राही. आजच्या ‘मेट्रो’ डब्यांचा चेहरा या पाश्र्वभूमीवर अगदी अनोखा- एखाद्या टणटणीत तरुणाचा चेहरा दिसावा असा भासतो. सुरुवातीच्या स्थानिक, तसेच लोकलगाडय़ांच्या डब्यांना प्रत्येक दाराशी चढण्या-उतरण्यासाठी दोन-तीन फारशा रुंद नसलेल्या पायऱ्यांचा जिना बसवलेला असे.
रेल्वेच्या डब्यांना असलेला विशिष्ट चॉकलेटी रंग हा लोकलगाडय़ा तसेच लांबपल्ल्यांच्या गाडय़ा या सर्वाचाच एक ब्रँड बनून राहिला होता. कालांतराने लांबपल्ल्यांच्या गाडय़ांचा रंग काही अंशी बदलला. काही डबे फिकट निळ्या रंगाने रंगविले जाऊ लागले. डेक्कन क्वीनचा तर काही वर्षे हा रंग ‘ब्रँड रंग’ बनला होता. लांबपल्ल्याच्या गाडीचा उल्लेख होताच आणखी एक- आज गमतीशीर व अविश्वासार्ह वाटावा- असा मुद्दा आठवतो. देशभर रेल्वेचे जाळे पसरू लागताच ‘लोकल सव्‍‌र्हिस’च्या जोडीला लांबपल्ल्याच्या गाडय़ाही मोठय़ा प्रमाणात धावू लागल्या. या संबंधात लोकांच्या एका गमतीशीर मागणीचा रेल्वे प्रशासनाकडे आलेल्या अर्जाचा एक किस्सा (पण सत्य) आहे. इ.स. १८७०च्या मागेपुढे कधी तरी घडलेला हा प्रसंग आहे. लांबपल्ल्याच्या गाडय़ा जेव्हा इगतपुरीमार्गे नाशिकच्या दिशेने पुढे जाऊ लागल्या, त्या काळात हिंदू प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे एक अर्ज सादर केला होता. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी गाडी इगतपुरीला साधारणत: सकाळच्या जेवणाच्या सुमारास येई. ‘स्नान झाल्याशिवाय आम्हाला जेवण घेता येत नाही. सबब इगतपुरी स्टेशनात गाडी एक तास थांबवावी- जेणे करून हिंदू प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उतरून स्नान उरकून मग जेवण घेता येईल,’ अशा अर्थाचा अर्ज अनेकांच्या सह्य़ा घेऊन रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आला होता. अर्थात् प्रशासनाने मंजुरी देण्याचे नाकारले हे सांगायला नको.
दूरदूर अंतराच्या प्रवासी गाडय़ांची क्रमाक्रमाने योजना होत गेली आणि मग वैयक्तिक व ‘ग्रुप’ पर्यटन या संकल्पनेला मोठीच चालना मिळाली. भारतातील विविध पर्यटन स्थळे पाहण्याची रेल्वे प्रशासनाने योजना तयार केली. त्यानुसार रेल्वे डब्यांमध्ये चार-चार, सहा-सहा लोकांच्या गटांसाठी रेल्वेने सोयी-सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. ही योजना स्वातंत्र्योत्तर काळातही काही वर्षे चालू राहिली.
या योजनेनुसार रेल्वेच्या विहित वेळापत्रकानुसार ठिकठिकाणी जाणाऱ्या (नागपूर, मद्रास, कलकत्ता इ. इ.) गाडय़ांना खास ‘प्रवासी डबे’ जोडण्यात येऊ लागले. त्यासाठीचे पूर्ण आरक्षण (प्रवास चहा-नाश्ता-जेवण यासह) प्रवासी गटांना दिले जात असे. सहलीच्या ठिकाणांनुसार १ आठवडा, २ आठवडे, ३ आठवडे व ४ आठवडे अशा सोयीस्कर कालावधीसाठी या डब्यांचे आरक्षण केले जाई. प्रमुख ठिकाणी ‘प्रवासी डबा’ गाडीपासून वेगळा करून यार्डात उभा केला जाई. ठरावीक मुदतीनंतर तो डबा पुढील योग्य त्या गाडीला जोडला जाऊन पुढील प्रवास सुरू होई. या डब्यात आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी जेवण-चहाची, स्नान करण्याची, झोपण्याची अशी उत्तम सोय ठेवण्यात येत असे. या गाडीची- डब्याच्या अंतर्भागाची कल्पना लेखासोबत दिलेल्या आकृत्यांवरून सहज
येईल.
अरुण जोशी