News Flash

‘हे तर माझे जय आणि वीरू’!

भाजप नेत्यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मुखभंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग

पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांवर मुख्यमंत्र्यांचा कौतुकवर्षांव

एकनाथ शिंदे यांचीही स्तुती केल्याने भाजपच्या नेत्यांत अस्वस्थता

ठाणे, कळवा, दिवा भागातील रस्त्यांची झालेली चाळण, वादग्रस्त प्रस्ताव आणि निविदांमुळे आरोपांच्या फे ऱ्यात सापडलेली प्रशासकीय व्यवस्था, शहरातील मोक्याची क्रीडा संकुले ठरावीक संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याच्या संशयास्पद कार्यपद्धतीविरोधात आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या ठाण्यातील भाजप नेत्यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मुखभंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील पोलीस ठाण्यांच्या लोकार्पणासाठी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा उल्लेख ‘जय-वीरू’ असा केलाच, शिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही राज्य सरकारचे ‘सलामीचे फलंदाज’ असा किताब बहाल करून टाकला.

ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात चार महिन्यांपूर्वी समेट घडून आला. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही गेल्या काही महिन्यात पालकमंत्र्यांसोबतचा ‘संवाद’ दृढ बनल्याची चर्चा आहे. मात्र, या मनोमीलनानंतर पालिकेचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मे महिन्यातील सर्वसाधारण सभेत सुमारे ४०० कोटी रुपयांची कंत्राटे विनाचर्चा मंजूर करताना शहरातील मोकळी मैदाने बिल्डरांना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही शिवसेनेने आवाजी मतदानाने मंजूर केला. याशिवाय कळवा येथील चौपाटी वादग्रस्त कंत्राट, खाडीच्या पाण्याचे विक्षारण करण्याचा अजब प्रकल्प याच कालावधीत विनाचर्चा प्रशस्त करून घेण्यात आला आहे. या सर्वाना सत्ताधारी शिवसेनेची साथ असून यामागे मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. शहरात जागोजागी पडलेले खड्डे, मैदाने बिल्डरांना भाडेतत्वावर देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव तसेच चौपाटीची निविदा मंजूर करू नये यासाठी भाजपचे नगरसेवक उपोषणाला बसले. आमदार संजय केळकर यांनी क्रीडासंकुले ठरावीक संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यास हरकत घेतली असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिंदे यांच्यासह जयस्वाल व परमबीर सिंग यांची तोंडभरून स्तुती केल्याने भाजप नेत्यांची पंचाईत झाली आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्यायला मुख्यमंत्रीच तयार नसतील तर दाद कुणाकडे मागायची अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:27 am

Web Title: cm devendra fadnavis praise tmc chief sanjeev jaiswal commissioner parambir singh
Next Stories
1 विघ्नहर्त्यांच्या राखणीला खासगी सुरक्षारक्षक
2 श्वान निर्बिजीकरण बंद!
3 काय..कसं काय वाटलं पोलीस ठाणं तुम्हाला?
Just Now!
X