पुरेशा कामगारांअभावी काम पूर्ण करण्यात अडथळे

कल्याण : मागील दीड वर्षांपासून रखडलेला पत्रीपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला होता. परंतु काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा कामगारवर्ग नियमित उपलब्ध होत नसल्याने पत्रीपुलाचे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या पुलाचे काम पूर्ण करण्याची शक्यता जवळपास मावळली असून टाळेबंदी उठताच हे काम पूर्ण भराने सुरू करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मागील दीड वर्षांच्या काळात तीन ते चार वेळा पूल सुरू होण्याचे दावे पालकमंत्री, खासदार, आमदारांनी केले होते. कामाचा अंदाज घेऊन ऑगस्टपर्यंत पूल सुरू होऊ शकतो, असे महामंडळातर्फे अलीकडे स्पष्ट करण्यात आले होते. कामगारांच्या अनुपलब्धतेमुळे महामंडळाचा आता नाइलाज झाला आहे. टाळेबंदीच्या तीन महिन्यांच्या काळात पुलाचे काम ठप्प होते. टाळेबंदीत मे महिन्यात शिथिलता मिळाल्यानंतर पुलाचे काम सुरू करण्यात आले. या कामावर यापूर्वी जो कुशल परप्रांतीय कामगार होता, तो करोनाच्या भीतीने आपल्या प्रांतात निघून गेला. त्यामुळे ठेकेदाराला अनुभवी कामगार मिळेनासे झाले. कामगारांची जुळवाजुळव करून ठेकेदाराने तुटपुंज्या कामगारांमध्ये काम सुरू केले. काम जलदगतीने होण्यासाठी बांगलादेशातून काही कुशल कारागीर ठेकेदाराने आणले.

जूनमध्ये वेगाने पूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली. गेल्या दोन आठवडय़ांपासून ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरात कडक टाळेबंदी लागू झाली. पुलाच्या कामासाठी येणारा मजूर कामगार आपल्या वस्त्यांमध्ये अडकून पडला. त्याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने तो घराबाहेर पडू शकत नाही. विखुरल्या पद्धतीने हे कामगार राहत असल्याने जागोजागी पोलीस वाहनांची तपासणी करत असल्याने ठेकेदार त्यांना दररोज वाहन नेऊन आणू शकत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ज्या वस्तीमध्ये हे कामगार राहतात, त्या वस्तीमधील रहिवासी या कामगारांना वस्तीमधून बाहेर पडणार असाल तर परत वस्तीमध्ये येऊ नका. तुम्ही कामाच्या ठिकाणीच राहा म्हणून दमदाटी करतात. काही दिवस कामगार काम करून संध्याकाळच्या वेळेत घरी परतले, तेव्हा वस्तीमधील काही रहिवाशांनी त्यांना वस्तीत येणास नकार दिला होता. याशिवाय कामाच्या ठिकाणी येण्यास कामगारांना वाहतुकीसाठी कोणतेही साधन मिळत नाही. घरापासून कामाच्या ठिकाणी दररोज पायी येणे आणि पायी घरी जाणे कामगारांना शक्य होत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

शक्तिमान पोकलेन सज्ज

पत्रीपुलाजवळील गोविंदवाडी रस्त्याच्या कडेला महामंडळाने शक्तिमान पोकलेन आणून ठेवल्या आहेत. यासंदर्भात महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले, रेल्वे मार्गिकेवरील गर्डर ठेवण्याचे टप्पे मोठे आहेत. या लोखंडी टप्प्यांची जुळवाजुळव करून त्यावर गर्डर ठेवण्याची व्यवस्था करण्यासाठीचे काम सध्या सुरू आहे. लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.