उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात वीज वितरण व्यवस्था कोलमडली

अंबरनाथ: अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहराला चांगलाच फटका बसला असून तिन्ही शहरांतील जवळपास १२० पेक्षा अधिक विजेच्या खांबांची पडझड यात झाली आहे. तसेच १५ रोहित्र निकामी झाले असून ६० पेक्षा अधिक ठिकाणी झाड किंवा झाडांच्या फांद्या पडल्याने विजेच्या तारा तुटल्याचेही समोर आले आहे.

गेल्या ४८ तासांपासून अधिक काळ या भागातील महावितरणाचे आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी आहेत. मात्र यंदाच्या वादळात वीजपुरवठय़ाच्या व्यवस्थेला मोठा फटका बसला.

तौक्ते चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्याला बसला. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात त्याची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले. बदलापूर शहराच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसात उच्चदाब वाहिनीचे १२ खांब पडल्याचे समोर आले. तर थेट बारवी धरणाच्या पायथ्यापर्यंत पसरलेल्या महावितरणाच्या क्षेत्रात ३० हून अधिक ठिकाणी झाड किंवा झाडाच्या फांद्य पडल्याने विजेच्या तारा तुटल्या होत्या. बदलापूर पूर्व भागातही ३० हून अधिक विजेच्या खांबांची पडझड  झाली असून त्यातील ३ खांब उच्चदाब वाहिनीचे आहेत. पूर्व भागात ५ रोहित्रेही नादुरूस्त झाली असून त्यांच्याही दुरुस्तीचे काम सुरू आहे. बदलापुरात महावितरणाची यंत्रणा मोठय़ा संख्येने कोलमडल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ पूर्व, पश्चिम आणि उल्हासनगरांत  उच्च दाबाचे १५ विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. तर ३० हून अधिक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे कोसळले. शहरात ३ ठिकाणी रोहित्रांमध्ये बिघाड झाला असून २८ पेक्षा अधिक फिडर बंद पडले, अशी माहिती उल्हासनगरचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी दिली आहे.

वीजपुरवठय़ाचे काम तीन ते चार दिवस

गेल्या ४८ तासांपेक्षा अधिक काळ महावितरणाचे विविध शहरांतील ३०० हून अधिक कर्मचारी आणि सुमारे ३० अभियंते वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी उभे आहेत. सध्याच्या घडीला तीन्ही शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्पुरती यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र ही दुरूस्ती कायमस्वरूपी करण्याची प्रक्रिया पुढील तीन ते चार दिवस सुरू राहील अशी माहिती ठिकठिकाणच्या अभियंत्यांनी दिली आहे.

उल्हासनगरची मुख्य वाहिनी कोसळली

उल्हासनगर शहराला वीजपुरवठा करणारी आणि अंबरनाथ शहरातून जाणारी टाटा वीज प्रकल्पाचा मोठा टावर अंबरनाथमध्ये सोमवारी कोसळला. त्याच्या दुरूस्तीसाठी महावितरणातर्फे सोमवारीही काम केले जाते होते. मोहोने येथील औद्योगिक क्षेत्रातून विजेची पर्यायी यंत्रणा सुरू करून शहराला तात्पुरता पुरवठा करण्यात आल्याची माहिती महावितरणातर्फे देण्यात आली आहे.