कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवरून टीका; महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने शहरातील विकासकामांच्या जाहिराती जागोजागी झळकवल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवर टोलेबाजी केली. कल्याणमधील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांनी ‘कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही’ असे सांगत अप्रत्यक्षपणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर हेदेखील उपस्थित होते.

कल्याण येथील एका लोकप्रतिनिधीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धाच्या शुभारंभप्रसंगी आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या वेळी आव्हाडांनी कल्याणमधील खराब रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ‘कल्याणमध्ये कधीही यावे.

या शहरातील रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही. राज्याच्या कोणत्या भागात नसतील असे रस्ते या शहरात पाहण्यास मिळतात,’ असा टोला आव्हाडांनी लगावला. येथील तरुणांनी ‘चांगले रस्ते दाखवा’ अशी पण एखादी स्पर्धा ठेवली पाहिजे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल असे जाहीर केले होते. नवी मुंबईतही महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असून येथील विकासकामांच्या मुद्दय़ावरून खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांनी जोरदार प्रचाराची तयारी सुरू केली आहे. अशा वेळी आव्हाडांच्या टीकेने शिवसेनेत चलबिचल निर्माण झाली आहे.

मनसेकडून स्वागत

आव्हाडांच्या वक्तव्याचे मनसेने स्वागत केले आहे. आमदार प्रमोद पाटील यांनी आव्हाड योग्य तेच बोलले, अशी प्रतिक्रिया दिली. २३ वर्षे पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे; पण खड्डेमुक्त शहर करण्यात, चांगले रस्ते देण्यास सत्ताधारी कमी पडले असाच रोख आव्हाड यांचा होता, असे आमदार पाटील म्हणाले. आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी शिवसेनेत अस्वस्थता असली तरी याविषयी जाहीर प्रतिक्रिया पक्षातून व्यक्त झालेली नाही.

नवी मुंबईवरूनही अस्वस्थता

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपमधील गणेश नाईक समर्थकांना शिवसेनेने आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. यापैकी काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. असे असताना फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेनेने राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या तक्रारी पक्षनेत्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. वाशी येथील एक कट्टर नाईक समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची चाहूल लागताच शिवसेना नेत्यांनी या नगरसेवकांसाठी लाल गालिचा अंथरला होता, अशी चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेतेही शिवसेनेच्या या पवित्र्याविषयी सावध झाले आहेत.