कल्याणमधील करोना रुग्णवाढीची साखळी तोडण्याचा मानस

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने मंगळवार (ता. ७ जुलै) सकाळपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती कल्याण जिल्हा विभागातर्फे विविध वस्त्यांमधून करोनासंसर्ग रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात संघ, जनकल्याण समिती, विविध स्तरातील १५० सामाजिक कार्यकर्त्यांची तुकडी मैदानात उतरणार आहे. येत्या आठवडाभरात अधिकाधिक वस्त्यांमध्ये करोना संशयित, लक्षणे, बाधित रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करून शहरातील करोना रुग्ण वाढीची साखळी तोडण्याचा मानस पालिका आणि समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिका हद्दीतील ७२ वस्त्यांमधून अंदाजे ७२ हजार रहिवाशांचे सुमारे ५०० कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महिनाभर रुग्ण शोध मोहीम राबविण्याचे नियोजन समिती पदाधिकाऱ्यांनी केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या सहकार्याने आमदार रवींद्र चव्हाण, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नीलेश काळे, कल्याण जिल्ह्याचे संघचालक डॉॅ. विवेक मोडक, विभागीय अध्यक्ष अविनाश जोशी यांच्या समन्वयातून ही योजना आकाराला आला आहे.

जनकल्याण समिती, संघाचे कल्याण, डोंबिवलीतील २० ते ४० वयोगटांतील कार्यकर्ते, विविध क्षेत्र, मंडळांचे, अनेक पक्षीय, सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमात हिरिरीने सहभागी झाले आहेत. वस्तीमधील संख्या पाहून १० ते २० संख्येने तुकडय़ा करून कार्यकर्ते वस्तीमध्ये जातील. त्यांच्या सोबतीला पालिकेचे डॉक्टर, परिचारिका, साहाय्यक कर्मचारी, वस्तीमधील स्थानिक डॉक्टर असतील. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी ही शोध मोहीम दुपारी दोन वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर आढळलेले रुग्ण, त्यांच्यावर उपचार, विलगीकरण या प्रक्रिया तातडीने प्रशासनाकडून पार पाडल्या जातील, असे जनकल्याण समितीचे नीलेश काळे यांनी सांगितले.

आठवडाभराचा हा उपक्रम कार्यकर्त्यांच्या उपलब्धतेप्रमाणे करोनाची शहरातील साखळी तुटेपर्यंत किमान महिनाभर राबविण्याचे नियोजन आहे, असे विभाग अध्यक्ष अविनाश जोशी यांनी सांगितले.

जनकल्याण समितीच्या माध्यमातून पालिका प्रशासन अशाप्रकारचा कार्यक्रम राबवीत आहे. या उपक्रमाचे नियोजन आणि त्याची प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती देणे उचित होईल.

– डॉ. प्रतिभा पानपाटील साथरोग नियंत्रण अधिकारी कडोंमपा

नि:स्वार्थी भावनेतून हा उपक्रम संघप्रणीत जनकल्याण समितीने हाती घेतलाय. संसर्ग आजारातून शहाराला मुक्त करणे या उद्देशातून सुरू केलेल्या या उपक्रमात अधिकाधिक शहरातील उमद्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. शहर निरोगी, आरोग्यसुदृढ करण्यासाठी जास्तीत प्रयत्न पालिकेच्या सहकार्याने केले जाणार आहेत.

-नीलेश काळे, जिल्हा कार्यवाह, जनकल्याण समिती

आवाहन

सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या २० ते ४० वयोगटातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवकांची या उपक्रमाला गरज आहे. कोणताही आजार नसलेल्या कार्यकर्त्यांंनी काळे यांच्याशी ९८२०१०८०४९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन जनकल्याण समितीतर्फे करण्यात आले आहे.