सरस्वती मंदिर शाळेसमोर कडोंमपा कर्मचाऱ्यांकडून प्रकार

कल्याण-मुरबाड या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील सरस्वती मंदिर शाळेजवळ ‘पुढे शाळा आहे’चा फलक लावण्याची विनंती केल्यानंतर महापालिकेने चक्क शाळेसमोरच फलक लावल्याने येथून रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून शाळेसमोर गतिरोधक आणि शाळेचा दिशादर्शन करणारा फलक लावण्याची मागणी केली जात होती. अखेर एक महिन्यापूर्वी महापालिकेने या भागात एक फलक उभारला असून हा फलक चक्क शाळेच्या समोरच उभारल्याने हा फलक नेमका कोणासाठी? असा प्रश्न स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थी वर्गाकडून विचारला जाऊ लागला आहे.

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या भागात नेहमीच वाहनाची गर्दी असते. या रस्त्यावरच रेल्ड चाइल्ड संस्थेची सरस्वती मंदिर शाळा असून शाळेसमोर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शन करणारे फलक, गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग नसल्याने तेथून रस्ता ओलांडणे विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे याविषयी पाठपुरावा करण्यात आला. या संदर्भात पत्रव्यवहार करून या भागात गतिरोधक आणि पुढे शाळा असल्याचा फलक लावण्याचा विनंती केली होती.  सुमारे आठ ते नऊ महिने पाठपुरावा केल्यानंतर आता हे फलक उभारण्यात आले असून गतिरोधक बसवण्यात आला आहे. मात्र हा फलक शाळेच्या अगदी समोरच उभारल्याने त्याचा फायदा काय असा प्रश्न विचारला जात आहे.

कल्याण शहरातील अनेक रस्त्यांवर दिशादर्शनाचे फलक लावण्यात आले नसून अनेक शाळांजवळ असे फलक लावले जात नाही. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना याचा त्रास होत असून हे फलक शाळेपासून थोडय़ा आधीच्या अंतरावर लावल्यास वाहने सावकाश चालवली जाऊन विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे सोईचे होईल. मात्र महापालिकेने दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करताना ठेकेदार सामान्य नियमही पाळत नसल्याचे आश्चर्य वाटते. असे फलक सगळ्याच शाळांसमोर उभारण्यात येणे गरजेचे आहे.

– योगेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते