ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
वसई : वसईतील वीज ग्राहकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे, आज ‘लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. या वेळी वीज समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. नालासोपारा पूर्वेला तुळिंज येथील दामोदर सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
वसई-विरार शहरातील वीज ग्राहक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढीव वीज बिले ग्राहकांना येत आहेत. त्याचा भरुदड ग्राहकांना सहन करावा लागतो. अनेक ग्राहकांचे वीज मीटर सदोष आहेत. शहरातील वीज वितरण व्यवस्थाही सदोष झाली आहे. जागोजागी रोहित्रे उघडी आहेत. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. भारनियमन नसल्याचा दावा महावितरण करत असली तरी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. दुसरीकडे वीजचोरीने महावितरणही त्रस्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून वीज समस्यांमुळे महावितरण कार्यालयावर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे मोर्चे निघत आहेत. या पाश्र्वभूमीवर वसईतील वीज ग्राहकांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’ करणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या वेळी वसई विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्याची संधी या वेळी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाला वीज ग्राहकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात महावितरणचे एकूण नऊ विभाग आहेत. वसई-विरार शहराचा समावेश कल्याण विभागात होतो. वसईत दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पूर्व व पश्चिम आणि वाडा यांचा समावेश आहे. तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, पश्चिम व आचोळे यांचा समावेश आहे.
काय?
वसईतील वीज ग्राहकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण
कधी?
आज, २८ जून सायंकाळी ६ वाजता.
कुठे?
दामोदर सभागृह, तुळींज, नालासोपारा (पूर्व)