ठाणे महापालिकेमध्ये आघाडीतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या असतानाच गुरुवारी झालेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचे अर्ज मागे घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू होता. तसेच या समितीसोबतच महापालिका विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते पद सोडण्यास नकार देत मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपद काबीज केले आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने काँग्रेस नेते आघाडीतून फारकत घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी साजीया अन्सारी यांची आठ महिन्यांपूर्वी निवड झाली होती. मात्र, वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण होण्यास चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे या पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक अशरफ पठाण यांनी तर काँग्रेसतर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादीचे दहा, काँग्रेसचे सहा, शिवसेनेचे तीन आणि मनसेचा एक, अपक्ष एक असे २१ नगरसेवक आहेत. पक्षीय संख्याबळ पाहता राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्याचे चित्र होते. यामुळे आघाडीत ठरल्याप्रमाणे काँग्रेस उमेदवाराला उर्वरित चार महिन्यांचा कार्यकाळ मिळावा, अशी मागणी करत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे उमेदवार मागे घेण्याचा आग्रह धरला होता. तसेच महापालिका विरोधी पक्षनेते पदही देण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून यावेळी करण्यात येत होती. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उमेदवाराचा अर्ज मागे घेतला नाही. तसेच विरोधी पक्षनेते पदही सोडण्यास नकार दिला.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. असे असतानाच गुरुवारी झालेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीचे उमेदवार अशरफ पठाण यांना राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांची एकूण १२ मते मिळवून काँग्रेसच्या उमेदवार रेश्मा पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना सहा मते मिळाली तर शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मात्र निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस नेत्यांनी आघाडीतून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आघाडीत बिघाडी..
लोकशाही आघाडी गटातून बाहेर पडून स्वतंत्र गट तयार करण्यासाठी काँग्रेसने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे काँग्रेस वेगळी चूल मांडण्यासाठी आधीपासूनच आग्रही आहे. मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपद सहा-सहा महिन्यांकरिता देण्याचे ठरलेले असतानाही त्यांनी नऊ महिने हे पद स्वत:कडे ठेवले. तसेच काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी सांगितले. या निवडणुकीमुळे आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची भूमिका, यासंबंधीचा एक सविस्तर लेखी अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांची भूमिका पाहता दोन्ही पक्षांच्या आघाडीत दुफळी माजण्याची शक्यता आहे.