वाहतूक बदल वाहनांसाठी तापदायक; कोंडी होण्याची शक्यता

वसई आणि दहिसरदरम्यान असलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा खाडीपुलाच्या बांधकामासाठी या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मनोर-वाडा-भिवंडी, शिरसाट फाटा-वज्रेश्वरी-भिवंडी आणि चिंचोटी-अंजूर फाटा- भिवंडी या तिन्ही मार्गाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील नवीन खाडीपुलाच्या दुरुस्तीसाठी सोमवारपासून वाहतूक बदल लागू करण्यात येणार होते. मात्र पालघर आणि ठाणे जिल्हा प्रशासनांमधील समन्वयाच्या अभावामुळे सोमवारपासून दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नाही. पालघर जिल्हा प्रशासनाने आठवडाभरापूर्वी पुलाच्या दुरुस्तीच्या कालावधीत मुंबई-ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना तीन पर्यायी मार्ग सुचवले आहेत. मात्र या पर्यायी मार्गावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई अहमदाबाद मार्गावरून मनोर, शिरसाट फाटा आणि चिंचोटीमार्गे भिवंडीतून वळविण्यात येणाऱ्या जड अवजड वाहनांसमोर या रस्त्यांवरील खड्डय़ांचे मोठे विघ्नच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पर्यायी मार्गापैकी चिंचोटी-भिवंडी मार्ग हा अरुंद असून या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता, चिंचोटी महामार्ग पोलिसांकडून भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाला चिंचोटी ते भिंवडी रस्ता तातडीने दुरुस्त करा, असे निवेदन देण्यात आले आहे. तसेच मनोर ते भिवंडी याही मार्गाची दुरुस्ती करा, असे निवेदन मनोर महामार्ग पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा यांना देण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

तीनही पर्यायी मार्गावरून मुंबई ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांची संख्या ही अधिक असेल अशी शक्यता वाहतूक यंत्रणेकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नारपोली वाहतूक पोलिसांतर्फे भिवंडीतील कल्वर येथील दोन मोठय़ा गोदामांच्या आवारात दिवसभर जड अवजड वाहने थांबवण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने ही वाहने गोदामातून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने सोडण्यात येणार असल्याचे नारपोली वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भमे यांनी सांगितले. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता नारपोली परिसरातील रस्त्यावर पडलेले मोठे खड्डेदेखील बुजवण्याचे काम नारपोली पोलीसच करत असल्याचे भमे यांनी सांगितले.

भिवंडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला चिंचोटी ते भिवंडी हा मार्ग दुरुस्त करावा असे निवेदन देण्यात आले आहे. चिंचोटी महामार्ग पोलीस वाहतूक बदलाविषयी सजग असून, वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

– नंदकिशोर चौगुले; पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस चिंचोटी (प्रभारी अधिकारी)