मजूर आणि कारागिरांचाही अभाव

वसई : मुद्रण व्यवसायावरही करोनाचे संकट घोंगावू लागले आहे. टाळेबंदीचे नियम सैल करण्यात आल्याने वसईतील अनेक मुद्रणालये सुरू झाली असली तरी सध्या कोणतीही कामे नसल्यामुळे यंत्रांच्या आवाजाने सतत धडधडणाऱ्या मुद्रणालयांमध्ये शांतता आढळून येते. परिणामी मुद्रण व्यावसायिकांपुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

वसईच्या नवघर, वालीव, सातिवली येथील औद्योगिक वसाहतीत मोठय़ा प्रमाणात मुद्रण व्यवसाय चालतो. मोठमोठय़ा कंपन्यांचे अहवाल, स्टिकर्स, बोधचिन्ह, औषध कंपन्यांची तसेच खाद्यपदार्थाची वेष्टने यांसह शाळा-महाविद्यालयांची स्टेशनरी, बँका तसेच सहकारी संस्थांची कागदपत्रे, अहवाल, दैनिके, नियतकालिके इत्यादींची छपाई या ठिकाणी होते. दिवसरात्र औद्योगिक वसाहतीतील मुद्रणालयात यंत्रांची धडधड सुरू असते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यापासून ही धडधड थांबली आहे.

टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर अनेक मुद्रणालये सुरू झाली असली तरी मुद्रणालयांमध्ये २० टक्केही कामे येत नसल्याची व्यथा मुद्रण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ‘वर्षभरात जानेवारी ते जूनपर्यंत लहानमोठे विवाह मुहूर्त असायचे, त्याचबरोबर छोटेमोठे कार्यक्रम, उद्घाटन सोहळे, माहितीपत्रके, शैक्षणिक छपाईची कामे असायची, मात्र टाळेबंदीमुळे ही सर्व कामे बंद राहिल्याने मुद्रण व्यावसायिकांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत, वीजवापर मर्यादित असतानाही वीजबिल अवाच्या सवा आलेय, ते भरण्यासाठी मुद्रण व्यावसायिकांना महावितरणकडून दमदाटी केली जात आहे’, अशी माहिती मॅन्युएल प्रिंटिंग प्रेसचे मालक मॅन्युएल डाबरे यांनी दिली.

करोनामुळे मुद्रण व्यावसायिक अडचणीत आलेले असतानाच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या ऑफसेट प्रिंटिंग, बाइंडिंग, स्क्रीन प्रिंटिंग तसेच कटिंगच्या यंत्रावर काम करणारे कारागीर तथा अन्य कर्मचाऱ्यांचाही रोजगार हिरावला गेल्याने त्यांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.

डीटीपी व्यावसायिकही अडचणीत

बेरोजगारीवर मात करण्यासाठी वसईतील अनेक तरुणांनी डीटीपीचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केलाय. यासाठी विविध सहकारी संस्था तथा पतसंस्थांमधून कर्ज घेऊन व्यवसायाकरिता दाटीवाटीच्या ठिकाणी छोटेखानी जागा भाडय़ावर घेतली. मात्र, टाळेबंदीमुळे कामे नसल्यामुळे डीटीपी व्यावसायिकांपुढे व्यवसायाकरिता घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि जागेचे भाडे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे डीटीपी व्यावसायिक संदीप मोरे यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या आधी छपाईसाठी घेतलेली कामे टाळेबंदीमुळे रखडली आहेत. आता ही कामे करायची तर कारागीर आणि मजुरांचाही अभाव आहे. खासगी, शासकीय तथा निमशासकीय यंत्रणांकडून घेतलेली कामेही अपूर्ण आहेत.

– किरण बांग, प्रतीक प्रिंटर, वसई