महापालिकेने सुशोभित केलेल्या तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वसई : वसई विरार शहरात पालिकेने  सुशोभित करण्यात आलेल्या तलावांच्या देखभालीकडे पालिकेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने तलावांच्या संरक्षक भिंतीची पडझड  होऊ लागली आहे. मागील १५ दिवसात शहरात दोन ठिकाणच्या तलावांची संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्याने तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वसई विरार शहरात असलेली अनेक जुनी व ऐतिहासिक तसेच निसर्गसौंदर्य असे तलाव आहेत. या तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिका तलावांचे पुनरुज्जीवन तसेच चांगल्याप्रकारे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये तलावातील गाळ काढणे, तलावाच्या सभोवताली संरक्षण भिंत बांधणे काही तलावाच्या ठिकाणी लहानमुलांना खेळण्यासाठी खेळणी, बसण्यासाठी बाकडे, तलावामध्ये कारंजे, विद्युत रोषणाई, सुशोभित झाडे अशा विविधप्रकारे या तलावाचे सुशोभीकरण करून तलाव निसर्गसंपन्न करण्यात आली आहेत.

यासाठी पालिकेने कोटय़ावधी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र इतका खर्च करूनही  तलावांच्या संरक्षक भिंतीचे काम योग्य रित्या झाले नसल्याचे चित्र दिसून आले आहे.  नुकतेच २३ जुलै रोजी नालासोपारा पूर्वेतील आचोळे तलावाची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली होती.

त्यापाठोपाठ ४ ऑगस्ट रोजी झालेल्या दमदार पावसामुळे विरार पश्चिमेतील आगाशी येथील भवानी शंकर तलावाची  संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. अवघ्या १५ दिवसाच्या आतच दोन तलावांच्या संरक्षक भिंती कोसळून गेल्या आहेत.

हळूहळू या कडेचे बांधकाम कमकुवत होत असल्याने बाजूचा परिसरही खचून जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तलावांच्या तपासणीची मागणी

वसई विरार महापालिकेने शहरातील १३८ तलावांचे सुशोभीकरण केले आहे. मागील काही दिवसात संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी  इतर ठिकाणच्या तलावांचेही स्ट्रॅर तपासणी होणे गरजेची आहे. त्या ठिकाणी जर काही अडचणी आढळून येतील त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टाळेबंदीमुळे दुर्घटना टळली

पालिकेने सुशोभित केलेल्या तलाव पालीवर मोठय़ा संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. तर लहान मुले ही या भागात खेळण्यासाठी येत असतात. परंतु सध्या करोनाच्या संकटामुळे टाळेबंदी असल्याने पालिकेची उद्याने बंद असल्याने नागरिकांचा वावर ही बंद झाला आहे. या बंदीच्या काळातच संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

मी नव्यानेच वसई-विरार महापालिकेचा पदभार स्वीकारला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने जे तलाव उभारले आहेत. त्याची पाहणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देऊन त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. या संदर्भात निकृष्ट बांधकाम असल्यास कारवाई होईल.

— संतोष देहेरकर , अतिरिक्त आयुक्त महापालिका