येथील तीन हात नाका बस थांब्यावर सोमवारी सायंकाळी मुंबईतील पवई आणि अंधेरी भागात जाणाऱ्या बेस्टच्या बसगाडय़ा येत नसल्यामुळे प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तासभर ताटकळत उभे असलेले प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला आले होते. गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे बसची वाट पहात उभे रहावे लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करत खासगी कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्यास परवानगी दिली असली तरी त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलेली नाही. त्याचबरोबर बेस्ट बसगाडय़ांच्या फेऱ्या वाढविल्या नाहीत.

खासगी कर्मचाऱ्यांना कार्यालयांत जाण्याच्या दृष्टीकोनातून प्रवासाची सोय  करण्यात आलेली नाही. या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने त्यांच्यापुढे प्रवासासाठी बेस्ट बसचा एकमेव पर्याय आहे. सुरुवातीला बेस्ट बसवर सरकारी आणि खासगी कर्मचारी असा दुहेरी भार होता. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे वाहतूक सुरू  झाल्यानंतर हा भार काहीसा कमी झाला होता. परंतु आता खासगी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरीही बेस्टच्या फेऱ्या वाढविण्यात आलेल्या नाहीत.

प्रवासी मिना यांनी सांगितले की, बस थांब्यावर तासभर बस येत नाही आणि  आल्यानंतर उभे राहून तासभर प्रवास करावा लागतो. जूनपासून हा त्रास  सहन करीत आहोत. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यात भर पडली आहे.

बसमधील एका आसनावर एकाच प्रवाशाला बसण्यास मुभा दिली जाते.  उभे राहून प्रवास करण्यासाठी मात्र कोणतीच बंधने  नाहीत. फेऱ्या वाढवाव्यात, किंवा एका आसनावर दोन प्रवाशांना बसू द्यावे, अशी सूचना अन्य एका प्रवाशाने केली.

सध्या ३३७६ बस धावत असून आणखी किती  वाढवायच्या असा प्रश्न आहे.  तांत्रिक कारणास्तव काही बस चालविणे शक्य नाही.  टाळेबंदी शिथिलीकरणामुळे खासगी कार्यालय कर्मचारी उपस्थितीही वाढली असून  बसमध्ये गर्दी होत आहे. बस उपलब्ध नसणे, वेळेत न येणे, होणारी गर्दी यासंदर्भात आम्हालाही अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसात बेस्ट महाव्यवस्थापक आणि संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल.  आसपासच्या शहरांतील स्थानिक परिवहन सेवांकडूनही सहकार्य मिळणे गरजेचे आहे.  एसटी महामंडळशीही चर्चा केली जाईल.

-अनिल पाटणकर, अध्यक्ष, बेस्ट समिती