पालिकेच्या रुंदीकरण मोहिमेला व्यापाऱ्यांचा विरोध; ‘मार्जिनल स्पेस’ ताब्यात घेण्यास शिवसेनाही अनुत्सुक

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला जुन्या ठाण्यातच खो बसण्याची चिन्हे आहेत. राम मारुती रोड, गोखले मार्ग, खोपट, पाचपाखाडी या अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी त्या त्या भागांतील इमारती तसेच दुकानांसमोरील मोकळ्या जागा (मार्जिनल स्पेस) ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध कायम असताना सत्ताधारी शिवसेनेनेही व्यापाऱ्यांना न दुखवता रुंदीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्य शहरातील रस्ता रुंदीकरणाचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून जयस्वाल यांनी शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या विकास आराखडय़ात नमूद असलेल्या रस्त्यांच्या विकासासाठी विशेष धोरण आखण्यात आले असून वर्तकनगर, कळवा, घोडबंदर अशा विविध भागांत रस्ते रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. हे करत असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजी पथ तसेच सुभाष पथसारख्या रस्त्यांचेही महापालिकेने रुंदीकरण केले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या बेकायदा तसेच वाढीव बांधकामांवर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्ता रुंदीकरणाचा धडाका सुरू असला तरी जुन्या ठाण्यातील अरुंद रस्त्यांमुळे ठाणेकरांपुढे वाहतूक कोंडीचे विघ्न अजूनही कायम आहे.

हे दुखणे दूर व्हावे यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खोपट, राम मारुती रोड, गोखले मार्ग तसेच पाचपाखाडी परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दीड वर्षांपूर्वी आखला होता. या संपूर्ण भागातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी फारशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुकाने तसेच इमारतींसमोरील मोकळ्या जागा ताब्यात घेऊन रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्याची जयस्वाल यांची योजना होती. यासाठी महापालिका अधिनियमातील कलम २१०चा आधार घेण्याचे ठरविण्यात आले होते.

तशा स्वरूपाचा प्रस्तावही जयस्वाल यांनी स्थायी समितीपुढे मांडला. मात्र, मूळ शहरातील व्यापारी मतदार दुखावले जातील या भीतीने तत्कालीन स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. दरम्यान, महापालिका निवडणुकीत जुन्या ठाण्यातील मतदारांनी शिवसेनेला वाकुल्या दाखवत भाजपच्या पारडय़ात मते टाकली.

त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने पुन्हा सत्तेवर येताच जुन्या ठाण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मार्जिनल स्पेस ताब्यात घेण्याचा आग्रह धरला होता. परंतु, आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वर्ष-दोन वर्षांत येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेनेने या प्रश्नी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

जुन्या शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण व्हावे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. मात्र रुंदीकरण करताना व्यापारीवर्गाला विश्वासात घ्यावे लागेल. व्यापाऱ्यांनी शहराच्या विकासात नेहमीच हातभार लावला आहे आणि ते यापुढेही लावतील असा शिवसेनेला विश्वास आहे. आयुक्त जयस्वाल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावतील याची खात्री आहे.

नरेश म्हस्के, सभागृह नेते

जुन्या शहरातील रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव गुंडाळलेला नाही. मात्र यामधील अडचणी कशा दूर करता येतील यावर विचार सुरू आहे. जुन्या ठाणे शहराला रुंदीकरणाशिवाय पर्याय नाही. ठाणेकरांच्या व्यापक हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

संजीव जयस्वाल, आयुक्त