विकास आराखडय़ानुसार आरक्षित जागांवरील अतिक्रमणे दिवाळीनंतर हटवणार

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

ठाणे महापालिकेच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. महापालिकेच्या विकास आराखडय़ात रस्त्यांसाठी आरक्षित असलेल्या अनेक जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या जागा मोकळ्या करून घेण्यासाठी दिवाळीनंतर अतिक्रमण मुक्तीची मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांत विकास आराखडय़ात ठरविल्याप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर रस्तेबांधणी मोहीम राबवली. त्यासाठी शेकडो बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही रुंदीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. विकास आराखडय़ाप्रमाणे रस्त्यांचे नियोजन न झाल्याने ही शहरे कोंडीत अडकून पडली आहेत, असे आयुक्त गोविंद बोडके यांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबविताना सुटसुटीत रस्त्यांना प्राधान्य आहे. त्यामुळे आयुक्तांनी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी यांना विकास आराखडय़ातील वर्दळीच्या भागांतील रस्त्यांची लांबी-रुंदी किती आहे, रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्या इमारतींची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संबंधित इमारत मालकांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर अशा इमारतींवर कारवाई करण्याचा कार्यक्रम पालिकेला जाहीर करेल, असे उपायुक्त जोशी यांनी सांगितले.

विकास आराखडय़ाच्या अंमलबजावणीचे आव्हान

* महापालिका हद्दीत सुमारे १२०० आरक्षित भूखंड आहेत. त्यापैकी सुमारे ५०० हून अधिक भूखंडांवर भूमाफियांनी २० ते २५ वर्षांत अतिक्रमण केले आहे. उर्वरित भूखंड पालिकेकडून विकसित न झाल्याने तिथे विकासकांनी इमले उभारले आहेत. त्यांची माहिती संकलित करण्याचे काम नगररचना विभागामार्फत सुरू आहे.

* ज्या आरक्षित भूखंडांवर सध्या बांधकाम सुरू आहे, ते दिवाळीनंतर जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, असे उपायुक्त सुनील जोशी यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवली ते टिटवाळा ‘बाह्यवळण’ रस्त्याचे काम या रस्त्यामधील बेकायदा इमारती, चाळींमुळे रखडले आहे. या मार्गातील बेकायदा कामे हटविण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे.

* रस्त्यांसाठी आरक्षित असलेल्या ज्या भूखंडावरील इमारतींमध्ये रहिवास आहेत, त्यांच्या संदर्भात आयुक्त, महासभा, शासन निर्णय घेईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे जोशी यांनी स्पष्ट केले. दुर्गाडी, माणकोली उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. शिळफाटा भागात नवीन रस्ते प्रस्तावित आहेत. या रस्त्यांमुळे वाहनांची संख्या वाढणार आहे. त्याचा ताण कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर येणार आहे. कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलल्याचे जोशी यांनी सांगितले.

विकास आराखडय़ात रस्त्यांसाठी असलेल्या अनेक ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आयुक्त गोविंद बोडके यांनी वाहतुकीला अडथळा ठरणारे बेकायदा ईमले तोडण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच कारवाई सुरू होईल.

– सुनील जोशी, उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभाग