बदलापूर : काँक्रिट रस्त्यांच्या नावाने मोठा गाजावाजा करत ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू झालेल्या कामांची रखडपट्टी सुरूच असून दीड वर्षांंनंतरही काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. बदलापूर पूर्वेतील शिरगाव भागात अशाच रस्त्यांची कामे रखडले असून दोन रस्त्यांमधील भाग अर्धवट राहिल्याने चिखल आणि पाण्यामुळे येथून चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

गेल्या तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांसाठी बदलापूर पालिकेला कोटय़वधींचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता. दोन वर्षांपूर्वी  एमएमआरडीएचा निधी मिळवण्याची जणू स्पर्धाच तत्कालिन नगराध्यक्ष आणि आमदार यांच्यात सुरू होती. मात्र या स्पर्धेमुळे शहराच्या झोळीत कोटय़वधींचे रस्ते पडले, त्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण होते. शहरातील विविध भागात या रस्त्यांचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. यात शिरगाव भागातील काथोडवाडी ते सह्याद्री चौक पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कार्यादेश एप्रिल २०१७ मध्ये देण्यात आले होते. दोन कोटी ८० लाख रुपयांचे हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर सहा महिन्यांची मुदत देऊनही आजतागायत हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी एक मोरी होती. मात्र त्या मोरीची जागा बदलून ती दुसऱ्या ठिकाणी बांधल्याने पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नाही. त्यामुळे पाणी जमा होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक अरूण सुरवळ यांनी केला आहे.

याबाबत गेल्या महिन्यात मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, स्थानिक देखरेखीवर असलेले पालिकेचे अभियंते यांनाही पत्राद्वारे याबाबत माहिती दिली होती. मात्र आजवर पालिकेकडून कोणत्याही प्रकारचे काम येथे करण्यात आली नसून पालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोप सुरवळ यांनी केला आहे.