नवी मुंबईत आघाडीसाठी आग्रही शिवसेनेचा नगरपालिकांत मात्र विरोध

जयेश सामंत, ठाणे

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (पॅनेल) रद्द करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर वेगाने सूत्रे हलत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या सर्व ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जागावाटपाची समीकरणे आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवी मुंबईत महाविकास आघाडीचा प्रयोग होणे निश्चित असताना अंबरनाथ, बदलापुरात मात्र स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला भाजपकडून जोरदार आव्हान देण्यात आले होते. ही निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्यात आली असती तर २७ गावे तसेच डोंबिवलीतील काही प्रभागांमधून भाजपला अधिक यश मिळाले असते असे निरीक्षण स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविले होते. हा अनुभव लक्षात घेऊन मुंबई, नागपूर वगळता ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पॅनेल पद्धतीने घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या पद्धतीचा फायदा भाजपला बऱ्यापैकी मिळाला. राज्यात नुकताच सत्ताबदल झाल्यानंतर ही पद्धत रद्द केली जावी असा आग्रह दोन्ही काँग्रेेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरण्यात आला. नवी मुंबईतील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मध्यंतरी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली होती. येत्या चार महिन्यांत नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या सर्व ठिकाणी दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेची मोठी ताकद आहे. असे असले तरी नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपचे तर औरंगाबाद शहरात भाजप आणि एमआयएम अशा दोन पक्षांचे आव्हान शिवसेनेपुढे आहे.

या चारही शहरांची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना स्वतंत्रपणे रणनीती आखण्यास सुरुवात केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्या ठिकाणी आघाडी करायची तसेच जागावाटपाचा फॉम्र्युला कसा ठरवायचा याची चाचपणीही सुरू आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेत कॉग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा निर्णय पक्का करण्यात आला असून यासंबंधी दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकाही सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला दिली.  असे असले तरी अंबरनाथ आणि बदलापूरात मात्र आघाडी करु नका असा आग्रह स्थानिक शिवसेना नेत्यांनी धरला आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे.  बदलापूरात भाजपचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे आहे. याठिकाणी किसन कथोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे बदलापूरात राष्ट्रवादीला सोबत घेऊन जागा वाटपाचे गणित बसविता येईल का याचीही चाचपणी देखील केली जात आहे, अशी माहिती शिवसेनेतील सुत्रांनी दिली.