|| आशीष धनगर

वाहतूक सुसूत्रतेसाठी पालिकेचा निर्णय; सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात :- कल्याण-डोंबिवली या शहरांतील रस्ते वाहतुकीत सुसूत्रता यावी व वाहनचालकांची बेशिस्ती कमी करण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी वाहतूक विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जाहिरात हक्क वितरणाच्या मुद्दय़ावर गेल्या वर्षभरापासून रखडलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या मार्चअखेपर्यंत शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर सिग्नलद्वारे वाहतुकीचे नियमन होईल, अशी शक्यता पालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सिग्नल यंत्रणा नसल्याने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच शहरातील मुख्य चौकात वाहनचालक उलटय़ा दिशेने वाहने चालवत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शहरात सिग्नल यंत्रणा उभारावी यासाठी वाहतूक पोलीस आग्रही आहेत. १९ वर्षांपूर्वी शहरात सिग्नल यंत्रणा उभी करण्याचे काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या देखभाल दुरुस्तीमुळे शहरातील ही यंत्रणाच कालबाह्य़ ठरली. त्यानंतर गेल्या वर्षी शहरात अद्ययावत सिग्नल यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिकेतर्फे स्वारस्य निविदा काढण्यात आली होती. या निविदेनुसार शहरात ठेकेदारामार्फत सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार होती. त्या बदल्यात ठेकेदाराला सिग्नल यंत्रणेच्या फलाकांवरील  जाहिरात हक्क देण्यात येणार होते. या निविदेला एका ठेकेदाराने प्रतिसादही दिला होता. मात्र सिग्नल यंत्रणेच्या जाहिरात हक्कांबाबतच्या रकमेवरून  ठेकेदार आणि महापालिका यांच्यातील कारार रखडला होता. त्यानंतर ही संपूर्ण योजनाच बारगळेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांचे सर्वेक्षण सुरू केले होते. यापैकी आवश्यक असलेल्या ठिकाणांच्या सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यापुढील परवानगीसाठी या प्रकल्पाचा प्रस्ताव वाहतूक शाखेकडे देण्यात आला आहे. ही परवानगी येत्या काही दिवसांत मिळेल आणि सिग्नल यंत्रणेचे काम मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी सिग्नल यंत्रणा

दुर्गाडी चौक, लालचौकी, काबुलसिंग चौक, सहजानंद चौक, शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल, केसी गांधी चौक, गोविंदवाडी बायपास, आधारवाडी सर्कल, खडकपाडा सर्कल, संदीप हॉटेल चौक, पूर्णिमा चौक, सुभाष चौक, स्टेट बँक चौक, सुचक नाका, नेतीवली, चार रस्ता, गरडा सर्कल, मानपाडा, अक्षय हॉस्पिटल, मंजुनाथ, संत नामदेव चौक, इंदिरा चौक, टिळक चौक, एस. के. पाटील चौक, महात्मा फुले चौक, शेलार चौक, काटई चौक, रिजन्सी चौक, काटेमानवली नाका.

शहरात ज्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवायची आहे तेथील सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या पुढील परवानगीसाठी प्रस्ताव वाहतूक शाखेकडे देण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यावर लगेच कामाला सुरुवात होईल. – तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका.