राजकीय नेत्यांच्या आवेशात कार्यक्रमांचे आयोजन

राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आयोजित केले जाणारे उद्घाटन कार्यक्रम, शिबिरे, हारतुरे, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन असा सगळा थाटमाट ठाणेकरांनी यापूर्वी अनेकदा अनुभवला आहे. शनिवारी मात्र त्याच थाटात एका सनदी अधिकाऱ्याचा साजरा होत असलेला वाढदिवस सोहळा पाहून ठाणेकर अवाक झाल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी संपूर्ण शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयात दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील आमदार, खासदार, नगरसेवकांकडून जयस्वाल यांचा जंगी सत्कार करण्यात आला. ठाण्याच्या इतिहासात प्रथमच एका सनदी अधिकाऱ्याच्या वाढदिवसाला आणले गेलेले हे ‘उत्सवी’ रूप पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत होते.

ठाणे महापालिकेचे आयुक्तपद स्वीकारून जयस्वाल यांना तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे आयुक्त बदलीच्या उंबरठय़ावर आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असली तरी एकनाथ शिंदे हे मात्र जयस्वाल यांची अजून काही काळ बदली होऊ नये या मताचे असल्याचे बोलले जाते. ठाण्यात समूह विकास योजना आणि आणखी काही महत्त्वाचे ‘विकास’ प्रकल्प प्रत्यक्षात आणायचे असतील तर जयस्वाल यांची बदली करू नका, असा ठराव येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी नेत्यांच्या सहमतीने यापूर्वीच केला आहे. याशिवाय महापौर मीनाक्षी शिंदे यांचे आयुक्तांविषयीचे मत काहीही असले तरी एकनाथ शिंदे आणि जयस्वाल ही जोडगोळी सध्या ठाणे महापालिकेवर राज्य करत असल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसत आहे. जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीविषयी ठाण्यातील भाजप नेत्यांच्या मनात नाराजी आहे. स्वत जयस्वाल हे मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतले मानले जातात.

वाढदिवसाला उत्सवी रूप

ठाणे महापालिकेच्या  २५ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते उत्सुक होतेच, शिवाय या सोहळ्यासाठी जयस्वाल यांच्या वाढदिवसाची तारीख ठरवली गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र ऐन वेळेस मुख्यमंत्र्यांना दिल्लीत महत्त्वाची बैठक असल्याचे कारण पुढे आल्याने शनिवारचा शुभारंभ सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयुक्तांच्या कामाची पोचपावती!

* यासंबंधी आयुक्त जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

* आयुक्तांनी गेल्या सव्वातीन वर्षांत ठाण्यात केलेल्या विकासकामांमुळे ते ठाणेकरांना आपलेसे वाटू लागल्याने त्याची पोचपावती म्हणून हे कार्यक्रम आयोजित केले गेल्याची प्रतिक्रिया महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.