ठाणे : जिल्ह्यातील सर्वच शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची सात उंची वाढविण्यात आली असून या प्रकल्पात बाधित झालेले २८ पैकी २३ प्रकल्पग्रस्त ठाणे महापालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. तर उर्वरित पाच जण तांत्रिक कारणामुळे प्रतीक्षा यादीत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाची उंची २०१६ मध्ये ७२.६० मीटरपर्यंत वाढवण्यात आली असून यामुळे धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ३४७.४८ दशलक्ष घनमीटर एवढी झाली आहे. बारवी धरणातून जिल्ह्यातील सर्वच शहरांना पाणी पुरवठा करण्यात येत असून हे धरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येते. या विभागाने पाण्याच्या कोट्याप्रमाणे बारवी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्ह्यातील पालिकांना यादी पाठवली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेला २८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची यादी मिळाली होती. या संदर्भातील पत्र पालिकेला जुन महिन्यात प्राप्त झाले होते. त्यानुसार २२ जुलै रोजी पालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली होती.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २६० एड्सचे रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ ऑगस्ट रोजी या प्रकल्प बाधीतांना पालिकेने बोलावून त्यांच्याकडून कागदपत्रांची पुर्तता करून घेतली होती. तसेच शोक्षणानुसार त्यांना पालिकेतील कोणत्या सेवेत दाखल करुन घ्यावे याची तपासणी सुरु केली होती. हि तपासणी पूर्ण होताच पालिकेने २८ पैकी २३ प्रकल्पग्रस्त सेवेत रुजू करून घेतले आहे. त्यातील सहाजणांची लिपिक पदावर तर उर्वरित १७ जणांची शिपाई आणि बिगारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर उर्वरित २८ पैकी ५ जण तांत्रिक कारणामुळे प्रतीक्षा यादीत आहेत. तीनजण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना नोकरीत सामावून घेणे शक्य झालेले नाही. दोन जण अभियंते आहेत. परंतु अभियंता पदासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनाही नोकरी देणे पालिकेला शक्य झालेले नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.