शिघ्र प्रतिजन चाचणीला सुरुवात

मीरा-भाईंदरकरांसाठी महानगरपालिका १ लाख संच विकत घेणार

मीरा-भाईंदरकरांसाठी महानगरपालिका १ लाख संच विकत घेणार

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांची चाचणी करून त्यावर उपचार करण्याची गरज निर्माण झाल्यामुळे पालिकेमार्फत शिघ ्रप्रतिजन (अँटिजेन डिटेक्शन) चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काळात पालिका एक लाख अँटिजेन किट विकत घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. सोमवारी समोर आलेल्या अहवालानुसार एकूण ५ हजार ७४६ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे, तर १९९ रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. टाळेबंदी शिथिलतेनंतर शहरातील रुग्णवाढीचा वेग प्रति दिवस १५० ते १६० इतका वाढला आहे. त्यामुळे करोना चाचणीचा वेग वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिवाय आता करण्यात येणाऱ्या कोविड चाचणीचे अहवाल प्राप्त होण्यास ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे रुग्णाचे हाल होत असल्याची तक्रार सातत्याने समोर येत होती. त्यामुळे महानगरपालिकेमार्फत रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या चाचणीचा उपयोग करून शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात आणि झोपडपट्टी परिसरात नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर ठरणार आहे.

महानगरपालिकेला काही दिवसांपूर्वी चार हजार किट राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात आले होते. या किटमार्फत चाचणी करण्यास उपयुक्त ठरत असल्यामुळे आता महानगरपालिका एक लाख किट खरेदी करणार आहे. शिवाय या किटच्या पहिल्या टप्प्यात १० हजार किटची मागणी करण्यात आली असून पुढील किट लवकरच खरेदी करण्याकरिता राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करण्याची पावले उचलण्यात आली आहेत.

केवळ अर्ध्या तासात तपासणी अहवाल

या चाचणीमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेऊन अँटिजेन शोधण्यात येतात. या एका किटची किंमत ४५० रुपये असून एखादा व्यक्ती बाधित असल्यास, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तीच्या तपासण्या करण्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे. मीरा-भाईंदर रुग्णांचे अहवाल येण्यास साधारण दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे या किटच्या माध्यमातून केवळ अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त करून बाधित रुग्णावर तातडीने उपचार होण्यास मदत होऊ  शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Antigen testing begins soon in mira bhayandar zws

ताज्या बातम्या