डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीत राहत असलेल्या अर्णव अभिषेक वैद्य या बालकाने गीतेचे अध्याय मुखोद्गत केले आहेत. श्री गुरुकुलम न्यास या संस्थेच्या पुढाकाराने अर्णव याने श्रृंगेरी येथे जाऊन आचार्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बिनचूक गीता पठण स्पर्धेत यश संपादन केले. याबद्दल त्याचा तेथे शंकराचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.

अर्णव हा आपल्या कुटुंबीयांसह डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागात राहतो. तो एमआयडीसीतील दर्शना सामंत यांच्या ओंकार शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. एक पाठी, तल्लख बुध्दीचा असलेल्या अर्णव वैद्यला श्रीगुरूकुलम न्यास संस्थेच्या अध्यक्षा मंजिरी फडके आणि संथा वर्गातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाले. घरात आजी साधना वैद्य, आई यांचे मार्गदर्शन होत होते. आजी साधना वैद्य याही अर्णव सोबत गीता पठण करत आहेत. काही अध्याय त्यांचे मुखोद्गत आहेत. वयपरत्वे काही अडचणी असल्याने त्या घर बसल्या गीता अध्याय पठणाला महत्व देत आहेत.

संथा वर्गात शिक्षक आणि घरी आई, आजीचे मार्गदर्शन यामुळे अर्णव याने गीता पठणात मोठा पल्ला गाठला आहे. घरात आजी साधना आणि नातू अर्णव यांच्यात गीता अध्याय म्हणण्यावरून जुगलबंदी होते. त्यात अर्णव बाजी मारतो. अर्णवचे गीतेचे अध्याय पाठ असल्याने न्यासातर्फे घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत तो यशस्वी झाला होता. त्यानंतर न्यासातर्फे त्याला श्रृंगेरी येथे गीता अध्याय पठण स्पर्धेसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेत तो यशस्वी झाला. शालेय अभ्यासतही तो हुशार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रृंगेरी येथील गीता पठण स्पर्धेत आचार्यांच्या उपस्थितीत त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अर्णवने गीतेचे अध्याय बिनचूक म्हणून दाखविले. या यशाबद्दल अर्णवचा श्रृंगेरी येथे प्रमाणपत्र, बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. मागील दहा वर्षाच्या काळात कल्याण, डोंबिवली परिसरातील काही नागरिकांनी गीता पठण स्पर्धेत श्रृंगेरी येथे जाऊन यश संपादन केले आहे.