ATS Raid in Padgha : राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पडघा येथील बोरीवली गावात साकीब नाचण याच्यासह काही संशयितांच्या घरी छापे मारी केली आहे. बोरीवली गावात सुरक्षेच्या कारणास्तव २०० हून अधिक पोलिसांचा बंंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु आता साकिब नाचण हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकिब नाचण याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून पडघा, साकीब नाचण आणि बोरीवली गाव नेहमीच चर्चेत राहिले.
राज्याच्या दहशदवादी विरोधी पथकाने सोमवारी सकाळपासूनच पडघा येथील बोरीवली भागात संशयितांच्या घरामध्ये छापेमारी केली आहे. यामध्ये साकिब नाचण याच्या घरामध्येही छापेमारी झाल्याचे कळते आहे. या कारवाईचा तपशील समोर आला नसला तरी बोरीवली गावात सकाळपासून २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. बोरीवली येथे कारवाई झाल्यास साकीब नाचण याचे नाव अनेकदा समोर येत असते. आता पुन्हा एकदा साकीब नाचण याचे नाव पुढे आले आहे.
नाचण याला २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाली होती. तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्याची बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने त्याची पाच महिने १३ दिवस आधीच सुटका केली होती. ठाणे कारागृहातून बाहेर पडताच, त्याला भेटण्यासाठी पडघ्यातील जेष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती.
त्यापूर्वी मार्च २००३ मध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे यांचे विशेष पथक साकिब नाचण याला अटक करण्यासाठी गेले होते. साकिबला पोलीस घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर काही ग्रामस्थ साकिबच्या घराजवळ दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या पथकाला साकिबला नेण्यापासून विरोध केला होता. साकिबला पोलिसांच्या वाहनामध्ये बसविल्यानंतर पथकावर हल्ला झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी साकिबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हाताने परताने लागले होते.
त्याने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केल्याचा आरोप त्याच्यावर होता. केंद्रीय तपास यंत्रणांने संशयावरून त्याता २०२३ मध्ये ताब्यात घेतले होते. अल -शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सीरिया त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता असाही संशय त्याच्यावर होता. आता पुन्हा साकीब याच्या घरावर छापेमारी झाल्याचे कळत असल्याने पडघा आणि साकीब नाचण पुन्हा एकदा चर्चेत आला.