बदलापूर – रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच बदलापुरात होत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरूवारी वाढ नोंदवली गेली. गुरूवारी दुपारच्या सुमारास पाणी पातळीत वाढ झाली होती. दुपारी १२च्या सुमारास पाण्याची पातळी १४.९० मीटरपर्यंत पोहोचली होती. सायंकाळी पाणी पातळीत किंचीत घट झाली. मात्र बदलापूर पश्चिमेतील चौपाटी परिसर पाण्याखाली गेला होता.
मे महिन्यात पूर्व मोसमी पावसाने राज्याला झोडपून काढले होते. कधी नव्हे ते बदलापुरसारख्या शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. २६ मे रोजी बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर जून महिन्याच्या सुूरवातील पावसाचा जोर कमी झाला. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही अंशी रेंगाळलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे. काही भागात काही मिनिटात जोरदार पाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याचे अनेकदा घडले आहे.
गुरूवार शेजारच्या रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊ कोसळला. याच रायगड जिल्ह्यातील माथेरान, नेरळ, कळंब, कर्जत, खोपोली या भागात पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. पुढे उल्हास नदीतही पाण्याची पातळी वाढते. उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरूवारीही वाढ झाली.
हेही वाचा
गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १४.९० मीटरवर पोहोचली होती. त्यावेळी बदलापूर शहर आणि आसपासच्या परिसरातही पाऊस सुरू होता. रायगड जिल्ह्यात पाऊस होत असल्याने यात वाढ होण्याची भीती होती. मात्र दुपारच्या सत्रात बदलापूर आणि आसपासच्या परिसरात पाऊस थांबला. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.
सायंकाळी पाचच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १४.७५ मीटर इतकी नोंदवली गेली. या काळात बदलापूर पश्चिमेतील उल्हास नदी किनारी असलेला चौपाटी परिसर पाण्याखाली गेला होता. येथे फेरफटका मारण्यासाठी असलेला मार्ग, लहान मुलांची खेळणी पाण्याखाली गेली होती. मात्र पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसत होते.
खबरदारीचा उपाय म्हणून येथे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान उपस्थित होते. पाऊस आणि नदीचे पाणी पाहण्यासाठी येथील पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या नागरिकांना येथून हटवण्यात येत होते.
रायते पुलाखालीही पाणी वाढले
दुपारच्या सुमारास कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील रायते गावाजवळी उल्हास नदीवरील पुलाखाली पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. यावर स्थानिक पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष ठेवून होते. मात्र दुपारनंतर पाणी पातळी कमी झाली.