ठाणे : मी कधी कधी विसरतो मी राष्ट्रवादीत आहे. मी शिवसेनेत असल्यासारखा वागतो. मला एक-दोन वेळा आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. तुम्ही आता राष्ट्रवादीत आहात असे वक्तव्य भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केले. या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली. भिवंडी लोकसभेत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव करत बाळ्या मामा हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बाळ्या मामा हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भिवंडी ग्रामीण क्षेत्रातील शिवसैनिकांनी कोणत्याही आदेशाची वाट न बघता माझ्या प्रचाराच्या कामास सुरूवात केली होती असे बाळ्या मामा म्हणाले. मी बऱ्याच ठिकाणी विसरतो. मी राष्ट्रवादीत आहे. मी शिवसेनेत असल्यासारखाच वागतो. तसाच बोलतो. कारण वयाच्या १७ व्या वर्षापासून मी शिवसेनेत काम करत होतो. मला एक -दोन वेळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे लागले. तुम्ही राष्ट्रवादीत आहात, बाळ्या मामांच्या या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये हशा पिकली. हेही वाचा : कल्याणमध्ये आयडियल शाळेतील विद्यार्थ्याची शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्याकडून जो उमेदवार जाहीर केला जाईल. त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत असे आश्वासनही बाळ्या मामा यांनी दिले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : ठाण्यात उद्धव यांच्यावरील मनसे हल्ल्याला कोणाचे छुपे समर्थन? बाळ्या मामा यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरेश म्हात्रे यांनी राजकीय प्रवासाला सुरूवात केली. १९९६ साली शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली. २००० साली ते शिवसेनेचे विभागप्रमुख झाले आणि २००४ साली भिवंडी तालुका उपाध्यक्ष झाले. २००९ मध्ये त्यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०११ मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून २०१४ सालची लोकसभा निवडणुक लढविली होती. या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. २०१५ साली पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख पदाची सुत्रे सांभाळत असतानाच त्यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवून विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य, गटनेते, बांधकाम सभापती अशी पदे त्यांनी भुषविली. यानंतर सेनेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.