scorecardresearch

विक्रीकर विभागाची ९३ लाखांची फसवणूक; अज्ञात व्यापाऱ्यावर कल्याणमध्ये गुन्हा दाखल

झमझम एन्टरप्रायझेस या नावाने अज्ञात व्यापाऱ्याने जब्बार यांची बनावट कागदपत्र वस्तू व सेवा कर विभागाकडे परतावा मिळविण्यासाठी दाखल केली.

वस्तू व सेवा कर विभागाची ९३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यापाराविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यापाऱ्याने बनावट कागपत्रे विभागात दाखल करून ९२ लाख ७९ हजारांचा परतावा घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.

कोणताही व्यवसाय, आर्थिक उलाढाल न करता एका अज्ञात व्यापाऱ्याने जब्बार हसन शेख यांच्या व्यवसायाची व आर्थिक उलाढालीची माहिती ऑनलाईन पध्दतीने बनावट मार्गाने मिळवली. झमझम एन्टरप्रायझेस या नावाने अज्ञात व्यापाऱ्याने जब्बार यांची बनावट कागदपत्र वस्तू व सेवा कर विभागाकडे परतावा मिळविण्यासाठी दाखल केली. वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची पडताळणी करून हा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची जागा, त्याच्या आर्थिक उलाढालीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जब्बार शेख यांच्या व्यवसायाची बनावट कागदपत्र तयार करून ती अज्ञात व्यापाऱ्याने वस्तू व सेवा कर विभागाकडे दाखल केली. त्यानंतर ९२ लाख ७९ हजार रूपये परतावा मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले.

बनावट कागदपत्र्यांच्या आधारे फसवणूक होत असल्याचा प्रकार वस्तू व सेवा कर विभागाच्या निदर्शनास आले. या विभागाचे साहाय्यक आयुक्त अमित पाठक यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात व्यापाऱ्याचा तपास सुरू केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case file aginest unknown trader in kalyan for fraud of the sales tax department dpj