डोंबिवली : आम्ही तुम्हाला मुंबईत प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो, असे सांगून मुंबईत राहत असलेल्या चार जणांनी संगनमत करून डोंबिवलीत न्यू आयरे रस्ता भागात राहत असलेल्या नागरिकाकडून घराच्या रकमेच्या बदल्यात १९ लाख ६८ हजार रूपये उकळले. त्यानंतर गेल्या चार वर्षाच्या कालावधीत म्हाडाचे घर नाहीच, पण घरासाठी घेतलेले पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या नागरिकाने गुरूवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

प्रसाद सुरेश सामंत (३२) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या कालावधीत म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन माध्यमातून तक्रारदार सामंत यांनी गुन्हा दाखल इसमांना पैसे पाठविले आहेत.

तक्रारदार सामंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईत प्रभादेवी सेंच्युरी बाजार, प्रभादेवी रस्ता परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गियांच्या सोसायटीत राहत असलेल्या पती, पत्नी आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात साहाय्य करणाऱ्या तीन जणांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत प्रसाद सामंत यांनी म्हटले आहे, गुन्हा दाखल इसमांनी आपणास मुंबईत प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो असे आश्वासन दिले. त्यांनी आपला विश्वास संपादन केला. या प्रकारानंतर मुंबईत म्हाडाचे घर मिळते म्हणून गुन्हा दाखल इसमांनी दिलेल्या बँक खात्यावर आपण ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या मागणीप्रमाणे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत टप्प्याने १९ लाख ६८ हजार रूपये भरणा केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घराची रक्कम भरणा करून झाल्यानंतर तक्रारदाराने गुन्हा दाखल इसमांमध्ये घराचा ताबा मिळण्याची मागणी सुरू केली. त्यावेळी त्यांना विविध कारणे देऊन उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. घर नाही पण आपले मूळ पैसे परत देण्याची मागणी करूनही इसम त्यालाही प्रतिसाद देईनासे झाले. त्यामुळे प्रभादेवी येथील पती, पत्नी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी आपली घर खरेदीच्या माध्यमातून फसवणूक केली आहे याची खात्री पटल्यावर तक्रारदार सामंत यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पौैर्णिमा कावळे याप्रकरणाचा तपास करत आहेत. मागील दोन ते तीन वर्षात म्हाडाचे घर मिळवून देतो सांगून अनेक मध्यस्थांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.