पालिकेचा नवा उपक्रम

शहरातील बकालपणा कमी करण्यासोबत स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर भर देणाऱ्या ठाणे महापालिकेने आता शहरातील भिंती हिरव्यागार करण्याचा वसा घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत महापालिकेतर्फे ठाण्यातील सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर ‘वॉल गार्डनिंग’पद्धतीने झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणात घट होण्यासोबतच परिसरही सुशोभीत होणार आहे.

काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक आणि पूलांखालच्या भिंतींवर युवा कलावंतांनी रंगरंगोटी केली होती. मात्र, अल्पावधीतच या भिंती पानतंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगून गेल्या. आता या भिंती खराब झाल्याने आता पालिकेने त्यांच्यावर हिरवळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. भिंतीवरील या हिरवळीमुळे शहरातील प्रदुषणाचे प्रमाणही कमी होईल, असे महापालिकेचे नगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले. छोटय़ा कुंडय़ा, प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून छोटय़ा आकारच्या वनस्पतींची भिंतींवर लागवड करण्यात येईल. तसेच या कुंडय़ांमध्ये मातीऐवजी काथ्याचा वापर केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रीन वॉल योजनेसाठी निविदा काढण्यात आली आहे. महिन्याभरानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन हे काम सुरू होईल. प्रामुख्याने शहरातील पुलाखाली तसेच रस्त्यावरील मोकळ्या भिंतींवर हा प्रकल्प राबविण्यात येईल. त्यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडेलच, शिवाय प्रदुषणाचे प्रमाणही कमी होईल.

अनिल पाटील, महापालिका , नगर अभियंता.