डोंबिवली – सर्वाधिक प्रवासी वर्दळीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील विस्तारित फलाट क्रमांक चारवर कल्याण दिशेला मागील चार वर्षापासून पंखे आणि इंडिकेटर नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रवासी संघटना, प्रवाशांनी वेळोवेळी या गैरसोयी विषयी रेल्वेच्या वरिष्ठ, स्थानिक अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्याची दखल घेण्यात येत नाही.
पंधरा, बारा डब्याच्या लोकल थांबण्यासाठी मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांमधील फलाटांचे विस्तारिकरण करण्यात आले. या विस्तारिकरणाच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकातील सर्वच फलाटांचे विस्तारिकरण करण्यात आले. फलाट क्रमांकवरील कल्याण बाजुकडील फलाटाचे रेल्वे प्रशासनाने विस्तारिकरण केल्यानंतर या विस्तारित भागात १२, १५ डबा लोकल थांबू लागल्या. फलाटाच्या या विस्तारित भागात मागील चार वर्षापासून पंखे, इंडिकेटर नाहीत. दहा डबे उभे राहतात त्या भागात पंखे, इंडिकेटर नसल्याने प्रवाशांना या गैरसोयींचा सामना करावा लागतो.
फलाट क्रमांक चारवर दिवा बाजुकडील दिशेने इंडिकेटर, पंखे आहेत. ही सुविधा कल्याण बाजुकडील विस्तारित भागात देण्यात आलेली नाही. पाऊस सुरू असला तरी लोकल पकडण्यासाठी धावपळ करत असलेला प्रवासी घामाघूम झालेला असतो. तो पंखा फलाटावर आहे का ते बघतो. पण त्याला पंखा कोठेही दिसत नाही. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत फलाट क्रमांक चारवर चढ, उतर करणाऱ्या प्रवाशांचे इंडिकेटर, पंखा सुविधा नसल्याने सर्वाधिक हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने फलाटांचे विस्तारिकरणाचे काम जलदगतीने पूर्ण केले. त्याच पध्दतीने विस्तारित केलेल्या फलाटाच्या भागावर पंखे, इंडिकेटर बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर दिवा बाजुकडील दिशेने अशा प्रकारच्या सुविधा नव्हत्या. प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनेच्या रेट्यामुळे रेल्वेला याठिकाणी इंडिकेटर, पंख्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली होती.
बारा, पंधरा डब्यांच्या लोकल उभ्या राहण्यासाठी सर्वच फलाटांचे रेल्वेने विस्तारिकरण केले आहे. आता या भागात पंखे, इंडिकेटर, बसण्यासाठी बाकडे तेवढ्याच तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा. रेल्वे प्रवासी संघटना, प्रवासी तक्रार करतील तेव्हाच या सुविधा द्यायच्या हे रेल्वेचे धोरण चुकीचे आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील विस्तारित भागात तातडीने इंडिकेटर, पंखे, बाकडे बसविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.